विद्येचे माहेरघर घडविण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्न शासकीय कृषि महाविद्यालय, नांदेड येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा रविवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे
होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ.
श्रीमती श्रीजया चव्हाण, विधानसभा सदस्य मा. आ.श्री.बालाजी कल्याणकर हे होते. प्रमुख
मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील माननीय अपर जिल्हाधिकारी श्री. पी. एस. बोरगावकर
हे उपस्थित होते. व्यासपीठावर कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. जनार्दन
कातकडे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, प्रभारी
अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना
प्रेरित करताना सांगितले की, आपण स्वयंस्फूर्तीने या महाविद्यालयाची
निवड केली आहे, ही आपल्या जीवनातील एक सुवर्णसंधीच आहे. या संधीचे
सोने करून आपण केवळ आपल्या भविष्याची दिशा बदलणार नाही, तर समाजाला
आणि राष्ट्राला नवीन उंचीवर नेणार आहात. त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीत सातत्य ठेवले
तर यश नक्कीच मिळते. अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, चारित्र्य,
नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण
आत्मसात करणे आवश्यक आहे. केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे हे शिक्षणाचे ध्येय नसून,
जीवन जगण्याची कला आत्मसात करणे, समाजाला दिशा
देणे आणि नव्या संधी निर्माण करणे हेच खरे शिक्षण आहे. माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना
आवाहन केले की, आपल्या ज्ञानाचा प्रकाश स्वतःपुरता मर्यादित ठेवू
नका. तो कुटुंब, समाज आणि शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या
यशामुळे महाविद्यालयाचे, कुटुंबाचे आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल
व्हावे. शेवटी त्यांनी आशावादी शब्दांत म्हटले
की, हे महाविद्यालय भविष्यात ‘विद्येचे माहेरघर’ ठरावे आणि येथे
शिकलेला प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञान, विज्ञान आणि संस्कारांचा
दीपस्तंभ होऊन समाजास प्रकाशमान करावा.
माननीय आ. श्रीमती श्रीजया चव्हाण यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करून
सांगितले की, महिला ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण शक्ती
आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील शिक्षणाचा उपयोग करून आपले सबलीकरण साधावे,
असे आवाहन त्यांनी केले.
माननीय आमदार श्री बालाजी कल्याणकर यांनीही मार्गदर्शन करताना हे महाविद्यालय
नांदेड येथे सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. श्री जनार्दन कातकडे
यांनी हे महाविद्यालय सुरू व्हावे म्हणून अनेक दिवस प्रयत्न झाले असून अखेर त्याला
यश मिळाले, असे सांगितले. तसेच हे महाविद्यालय कृषी शिक्षणाच्या दृष्टीने
नांदेड जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच मा. श्री भागवत देवसरकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठाने नवे शैक्षणिक धोरण अवलंबल्याचे
सांगितले. या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धी होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट
केले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठातील संशोधनाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी
भविष्यात उत्कृष्ट शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
अपर जिल्हाधिकारी श्री पी. एस. बोरगावकर यांनी कृषी शिक्षणाचे महत्त्व विशद
करताना सांगितले की, प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ३५
ते ४० टक्के अधिकारी हे कृषी पदवीधर आहेत. ते अतिशय उत्कृष्टरीत्या जनतेची सेवा करतात.
त्यामुळे विद्यार्थ्यांनीही शेतीसोबत उद्योजकता व प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी
स्वतःला तयार ठेवावे, असे त्यांनी नमूद केले.
प्रस्ताविकात डॉ. राजेश कदम यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेविषयी सविस्तर माहिती
दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यप्रणालीचा आढावा
घेतला तसेच महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा, नव्या उपक्रमांची माहिती दिली. शिस्त आणि नियमावली यांचे महत्त्व पटवून देताना
त्यांनी विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून घडण्याचे आवाहन केले. महाविद्यालय
हे केवळ शिक्षणाचेच नव्हे तर चारित्र्य, संस्कार आणि सर्वांगीण
विकासाचे केंद्र आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मअनुशासन,
वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची जाणीव ठेवून प्रगतीकडे वाटचाल करण्याचे
मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थी भावेश जोशी आणि प्रणाली बिल्लेवाड यांनी आपली मते व्यक्त
केली, तर पालक प्रतिनिधी म्हणून श्री. कच्छवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी समीक्षा पोकळे आणि निकिता कदम यांनी केले,
तर आभार प्रदर्शन डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. पवन ढोके, डॉ. देवकुळे, डॉ.
सुजाता धोतराज, प्रा. संजय पवार, प्रा.
सिंगरवाड, कृष्णा वारकळ, जाधव, माधवी कल्याणकर तसेच महाविद्यालयातील इतर कर्मचारी, पालक
आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)