रासायनिक, यांत्रिक व जैविक उपायांचा समन्वय साधून तण व्यवस्थापन करा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
खरीप हंगामात तण नियंत्रण हे पीक उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या
उद्देशाने सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित
कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “खरीप हंगामातील एकात्मिक तण व्यवस्थापन” या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १४
जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आला.
मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी, कृषि पदवीधर तसेच कृषि
क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त
सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि हे होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले की, खरीप हंगामात पावसामुळे तणांची वाढ झपाट्याने होते. वेळेवर
आणि योग्य पद्धतीने तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात २० ते ४० टक्क्यांपर्यंत घट
होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक, यांत्रिक, सांस्कृतिक व जैविक उपायांचा समन्वय साधून एकात्मिक तण व्यवस्थापनाचा
अवलंब करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार
यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यापीठ
तण व्यवस्थापन विषयावर सातत्याने संशोधन करत असून, नवीन
तंत्रज्ञान, तणनाशकांचा शास्त्रोक्त वापर तसेच शेतीतील
यांत्रिकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. तण व्यवस्थापन करताना पीक-तण स्पर्धेचा
महत्त्वाचा कालावधी लक्षात घेऊन सुरुवातीच्या अवस्थेतच तण नियंत्रण करणे आवश्यक
आहे. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या तण व्यवस्थापन ॲपचा अधिकाधिक वापर
करण्याचे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले. तणनाशकांचा वापर नेहमी
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. बाबू येवले, कृषि तज्ज्ञ, ग्लोबल विकास ट्रस्ट, परळी यांनी तण व्यवस्थापनासंदर्भात सविस्तर व उदाहरणाधारित मार्गदर्शन
केले.
कार्यक्रमात तणांचे विविध प्रकार – गवताळ, रुंदपर्णी व इतर तणांची ओळख तसेच तणांचा प्रसार – बियाणे, हवा, पाणी व शेती अवजारांद्वारे होणारा प्रसार,
याबरोबरच तणांचे दुष्परिणाम – अन्नद्रव्ये, पाणी व
सूर्यप्रकाशासाठी पिकांशी होणारी स्पर्धा तसेच कीड व रोगांना मिळणारा आश्रय, एकात्मिक
तण व्यवस्थापन – प्रतिबंधात्मक, सांस्कृतिक, यांत्रिक, जैविक व रासायनिक उपाययोजनांचा समन्वित
वापर. तणनाशकांच्या वापरातील दक्षता – योग्य वेळ, मात्रा व
सुरक्षितता उपाय. तण व्यवस्थापनातील यांत्रिकीकरण – कोळपणी, खुरपणी
यंत्रे व आधुनिक अवजारांचा वापर यावर चर्चेमध्ये भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे
आयोजन डॉ. आनंद गोरे, प्रमुख अन्वेषक यांनी केले, तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष
परिश्रम घेतले. शेवटी शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांच्या
विविध शंकांचे शास्त्रीय व समाधानकारक उत्तरे देवून निरसन केले.



