Tuesday, July 14, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयास शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे भेट दिली. त्यांच्यासमवेत तांत्रिक अधिकारी तथा कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सचिन मोरे हे होते.  यावेळी त्यांनी महाविद्यालयातील कायमस्वरूपी प्रदर्शनी, संग्रहालय, आहार चिकित्सालय तसेच विविध प्रयोगशाळांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संवादादरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडीलबंधूंनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केल्यामुळे सन १९८२ पासून त्यांचा या महाविद्यालयाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. या महाविद्यालयाने व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले असून, या संस्थेशी असलेल्या संपर्कामुळे आपले व्यक्तिमत्त्व साधे, सरळ आणि स्वच्छ घडले, हीच आज आपली खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येकाला आयुष्यात संधी मिळत असते. त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. समाधानाने कार्य करण्याची सवय असल्यास प्रकृती निरोगी राहते आणि आनंदी जीवन जगता येते, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयात परस्पर सहकार्याच्या भावनेतून सांघिक पद्धतीने कार्य केल्यास अधिक चांगले परिणाम साध्य होतात, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

नवीन अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सामुदायिक विज्ञान क्षेत्रात कार्य करणारे आपण सर्व भविष्यातील सक्षम आधारस्तंभ आहात. त्यामुळे प्रत्येकाने शिस्तबद्ध राहून नियम व वेळेचे काटेकोर पालन करावे. तसेच नैतिक मूल्ये जपावीत, मोठ्यांचा आदर व सन्मान करावा आणि ही मूल्ये आपल्या आचरणातून जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.

हे महाविद्यालय कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाशी निगडित असल्याने सेवाभाव, सहकार्य, शिस्त आणि नैतिकता हे गुण प्रत्येकाच्या अंगी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास आपल्या पाल्य प्राध्यापकांच्या माध्यमातून अथवा महाविद्यालयाच्या प्रशासनामार्फत माझ्यापर्यंत संपर्क साधू शकता. आवश्यक असल्यास थेट माझ्याशीही संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.

आपल्या पूर्वीच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी नुकताच लातूर कृषि महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या 'वनश्री पुरस्काराची' यशोगाथा सांगितली. या पुरस्कारानिमित्त त्यांच्या मूळ गाव बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे उंदरी येथील मित्रांनी त्यांचे तसेच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यासाठी परभणी येथे येऊन भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या मूळ गावी येथे भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी दिल्याचा उल्लेख केला.

यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा व सद्यस्थितीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना उपाध्यक्ष तथा विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.