वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे
नवनियुक्त शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी बदनापूर येथील कृषि
महाविद्यालयास दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयातील
शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थी विकासाशी संबंधित विविध
उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राध्यापक, अधिकारी,
कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत
समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण यशाबद्दल आणि परिसरात
राबविण्यात येणाऱ्या वृक्षसंवर्धन उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
भेटीदरम्यान डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी महाविद्यालयात अनुभवातून शिक्षण (ELP) अंतर्गत यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या मधुमक्षिका पालन
व कुक्कुटपालन प्रकल्पांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या
प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, कौशल्य विकास
आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतीय
कृषी अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या मान्यतेने
महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या आळंबी उत्पादन व प्रशिक्षण प्रकल्पाच्या बांधकामाची
पाहणी करून त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित
करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर डॉ. ठोंबरे यांच्या हस्ते
वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि पर्यावरण
संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे सांगून त्यांनी हरित परिसर निर्मितीसाठी महाविद्यालयाने केलेल्या
प्रयत्नांचे कौतुक केले.
यानंतर त्यांनी महाविद्यालयातील बीजोत्पादन कार्यक्रम, पीक प्रात्यक्षिके, मुलांचे व
मुलींचे वसतिगृह, विविध अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच इतर
शैक्षणिक सुविधा यांची पाहणी केली. उपलब्ध सुविधा, प्रयोगशाळा
आणि प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व कौशल्याधारित शिक्षण मिळत असल्याचे
त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. ठोंबरे म्हणाले की, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन
आणि नवोपक्रमांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील
उपलब्ध सुविधा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि प्रयोगाधारित शिक्षणाचा
पुरेपूर लाभ घेत स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, संशोधन तसेच कृषी उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा. ज्ञानाबरोबरच कौशल्य,
नवोन्मेषी विचार आणि सामाजिक बांधिलकी जोपासल्यास भविष्यात सक्षम कृषी
व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता येईल.
महाविद्यालयातून दरवर्षी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, पदव्युत्तर शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रासाठी मोठ्या
संख्येने विद्यार्थ्यांची निवड होत असल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे व
प्राध्यापकांचे विशेष अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाची सातत्यपूर्ण शैक्षणिक
गुणवत्ता आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम हे इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी
असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यापीठाचे बियाणे सहयोगी संचालक तथा कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख
डॉ. हिराकांत काळपांडे तसेच तांत्रिक अधिकारी तथा कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.
सचिन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांनी
प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन
व विस्तार कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक
डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,
अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.


.jpeg)



