Wednesday, July 15, 2026

मराठवाड्यातील हवामान बदल व पावसाच्या खंडाच्या पार्श्वभूमीवर वनामकृवित पत्रकार परिषद

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब ही काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मराठवाड्यात सध्या हवामान बदल व पावसाच्या खंडामुळे उद्भवलेल्या विविध कृषि समस्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रगती, संशोधन, विस्तारकार्य आणि दैनंदिन कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही पत्रकार परिषद विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम सभागृह (हॉल क्र. १८) येथे संपन्न झाली.

पत्रकार परिषदेस संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पावसाच्या खंडकाळात हवामान अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. हवामान बदलामुळे पावसाचे वितरण अनियमित होत असून, अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडण्याची परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींबरोबरच हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य पीक व्यवस्थापनाद्वारे पिकांवरील ताण कमी करून उत्पादनातील संभाव्य घट टाळता येऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळेवर कोळपणी व निंदणी करून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. त्यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, तणांचे नियंत्रण होते, मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा भुसभुशीत थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो.

सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष अथवा काडीकचऱ्याचे आच्छादन (मल्चिंग) केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून मातीचे आरोग्य सुधारते. ओलाव्याच्या ताणाचा परिणाम कमी करण्यासाठी १ टक्का पोटॅशियम नायट्रेट (KNO) द्रावणाची फवारणी करावी. त्यामुळे पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, पाने अधिक काळ हिरवी राहतात, प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा अन्य जलस्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी पावसाच्या खंडकाळात संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा. ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. तसेच जलसंधारणासाठी सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरविणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास, त्याची शास्त्रीय पडताळणी आणि प्रभावी प्रसार आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधन, प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाच्या माध्यमातून विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांचे शेत हीच खरी प्रयोगशाळा असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, तेथे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. १५ ते २० जुलैपर्यंत पेरणी झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी आणि सूर्यफूल ही पिके घेता येतील. त्यानंतरही पावसास विलंब झाल्यास तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, कारळ आणि तीळ यांसारख्या दुष्काळसहिष्णू पिकांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

जोखीम कमी करण्यासाठी बाजरी + तूर, एरंडी + धने आणि एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे उत्पादनाची जोखीम कमी होते, जमिनीतील उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि शेतकऱ्यांना अधिक स्थिर व शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या प्रगती, संशोधन, विस्तारकार्य तसेच दैनंदिन कामकाजाचा आढावाही पत्रकारांसमोर मांडला.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी पावसाच्या खंडामुळे पिकांवर होणाऱ्या परिणामांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी विद्यापीठातील पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा सादर केला. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी 'एल निनो' या हवामान घटनेविषयी माहिती देत त्याचे संभाव्य परिणाम आणि आगामी पावसाचा अंदाज स्पष्ट केला. विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी मराठवाड्यातील पिकांची सद्यस्थिती, आवश्यक उपाययोजना तसेच आकस्मिक पीक नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

पत्रकार परिषदेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड तसेच मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर गणपत पुरी यांनी केले. पत्रकार परिषदेस विविध मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.