Thursday, November 19, 2026

वनामकृवित आयसीएआर, डीएसटी, पोकरा व एएनआरएफ पुरस्कृत ११ संशोधन प्रकल्पांचा शुभारंभ; संशोधनाचा नवा अध्याय सुरू – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

शाश्वत शेती, खतांचा संतुलित वापर, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि पीक उत्पादकता वाढविण्यावर संशोधनाचा भर


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (DST), पोकरा (PoCRA) आणि राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (ANRF) पुरस्कृत एकूण ११ संशोधन प्रकल्पांचा शुभारंभ तसेच दोन विषयांवरील विशेष व्याख्यानांचा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली १९ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील परिसंवाद सभागृहात उत्साहात पार पडला. या प्रकल्पांसाठी एकूण ८५०.७३ लाख रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाला आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे (MCAER), पुणे माननीय महासंचालक श्री. राहुल रंजन महिवाल (भा.प्र.से.) उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते. यावेळी जी.जी.एस. इंद्रप्रस्थ विद्यापीठ, नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सस्टेनेबल नायट्रोजन अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचे प्रमुख प्रा. डॉ. एन. रघुराम यांनी ‘पोषकद्रव्यांमुळे होणारे प्रदूषण, त्रिस्तरीय ग्रहीय संकट आणि कृषि क्षेत्रातील शाश्वत अन्नद्रव्य व्यवस्थापन’ या विषयावर, तर हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (ICRISAT) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ (तूर पैदास) डॉ. प्रकाश गंगाशेट्टी यांनी ‘पुढील पिढीतील कडधान्य पिकांच्या सुधारित वाण विकासासाठी स्पीड ब्रीडिंग आणि प्रिसिजन फिनोटायपिंग यांचे एकत्रीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.

११ संशोधन प्रकल्पांमधून कृषि संशोधनाला नवी दिशा

या कार्यक्रमात भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत राष्ट्रीय उच्च उत्पादक बियाणे अभियानांतर्गत तूर, मूग, स्वीट ज्वारी आणि सूर्यफूल या पिकांवरील संशोधन प्रकल्पांसाठी २०० लाख रुपये, कापूस उत्पादकता अभियानांतर्गत (कापस कांती) प्रकल्पासाठी ५५.०१ लाख रुपये, तसेच सुधारित कृषि पद्धतींच्या साहाय्याने पाणथळ परिस्थिती सहनशील कमी कालावधीच्या तुरीच्या जाती व संकरित वाण विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी ३३ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (DST) पुरस्कृत डिजिटल कृषि तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी ४१८ लाख रुपये, आफ्रिकन जॉइंट स्नेल (Achatina fulica) या गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पर्यावरणपूरक जैविक कीटकनाशके व विषारी आमिषे विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी ६३.८७ लाख रुपये, तर अतिसूक्ष्म आकाराच्या खतांच्या निर्मितीसाठी स्वदेशी दळण प्रणाली विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी १४.३६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

पोकरा (PoCRA) पुरस्कृत महाराष्ट्रातील पोकरा समूहातील शेतकऱ्यांसाठी क्षेत्रस्तरीय, वास्तविक वेळेतील स्वयंचलित कृषि सल्ला प्रणालीला सहाय्य करण्यासाठी पीक हवामान दिनदर्शिका आणि स्वयंचलित कृषि सल्ले विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी ३२.४९ लाख रुपये, तर राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानच्या (ANRF-ARG) पुरस्कृत वनस्पती पेशीभित्तिकेतील बदल आणि रोगप्रतिकारशक्ती यामध्ये ऑलिगोसॅकराइड-मध्यस्थ संकेतांची भूमिका अभ्यासण्याच्या संशोधन प्रकल्पासाठी ३४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रा. डॉ. एन. रघुराम यांच्या मार्गदर्शनाचा संदर्भ देत सांगितले की, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पीएम-प्रणाम योजना भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विद्यापीठामार्फत बायोमिक्ससारखी जैविक घटकांवर आधारित समृद्ध उत्पादने विकसित केली जात असून, शेतकऱ्यांकडून त्यांना चांगली मागणी आहे. या उत्पादनांची उपलब्धता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यापीठाच्या कार्यालयांमार्फत करून देण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक प्रभावी बनविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यापीठातील शास्त्रज्ञांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठात संशोधनाचा नवा अध्याय सुरू झाला असून, राष्ट्रीय स्तरावरील विविध संशोधन निधी देणाऱ्या संस्था विद्यापीठाची आवर्जून निवड करीत आहेत. विद्यापीठाला नुकतेच ११ संशोधन प्रकल्प प्राप्त होणे ही साधी बाब नसून, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने निर्धारित केलेल्या निकषांवर आणि कार्यप्रदर्शनाच्या कसोटीवर विद्यापीठाने मिळविलेल्या यशाचे हे प्रतीक आहे, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा उंचावत असून, आयसीएआरची ‘अ’ श्रेणी मानांकन तसेच आयआयआरएफ क्रमवारीत महाराष्ट्रात प्रथम स्थान मिळविणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठातील प्रत्येक अधिकारी, शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक कठोर परिश्रम घेऊन कामात पुढाकार घ्यावा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि सातत्यपूर्ण कार्यातून विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधिक उंचवावे, असे आवाहनही त्यांनी केले. काम करताना केवळ औपचारिकता न ठेवता प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने आणि नियोजनपूर्वक कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

माननीय महासंचालक श्री. राहुल रंजन महिवाल (भा.प्र.से.) म्हणाले की, विद्यापीठाला प्राप्त झालेले ११ नवीन संशोधन प्रकल्प हे केवळ आर्थिक यश नसून विद्यापीठाने घेतलेल्या परिश्रमांची आणि राष्ट्रीय स्तरावर निर्माण केलेल्या विश्वासार्ह प्रतिमेची पावती आहे. विद्यापीठ शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य करीत आहे. पीक उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबीन, कापूस आणि तूर या महत्त्वाच्या पिकांच्या सुधारित वाण विकासावर विद्यापीठाचा भर आहे. तसेच गोगलगायींच्या निर्मूलनासाठीही विद्यापीठाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

संशोधन प्रकल्पांचे यश केवळ त्यासाठी मिळालेल्या निधीवर अवलंबून नसून, त्या निधीचा योग्य व प्रभावी वापर करून त्यातून विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होणारा लाभ यावर अवलंबून असते, असे त्यांनी स्पष्ट केले. जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती हाच कृषि विकासाचा मुख्य उद्देश असावा, असे सांगून त्यांनी विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी स्वागतपर भाषणातून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी त्यांनी नव्याने मंजूर झालेला संशोधन प्रकल्प शेतकरीहिताचे संशोधन करण्यास तसेच विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विविध संधी व लाभ उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राजेश कदम, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. नीता गायकवाड आदी मान्यवरांसह विविध विभागांचे विभागप्रमुख, संशोधन केंद्रांचे प्रभारी अधिकारी, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले, तर आभार संशोधन उपसंचालक डॉ. सुनीता पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण आणि संशोधन संचालनालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.