कृषि उद्योजक बनून नोकरी देणारे व्हा; माननीय कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांचे स्नातकांना आवाहन
शेतकरी
कल्याणासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध;
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक; माननीय पद्मश्री डॉ. अशोक कुमार सिंह यांचे प्रतिपादन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी
विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत
सभागृहात संपन्न झाला. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती
श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या निर्देशानुसार,
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम, १९८३ मधील
कलम १८(१) मधील तरतुदींनुसार या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले.
या समारंभाचे
सन्माननीय अतिथी महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे
प्रति-कुलपती श्री. दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन केले.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे (NAAS) सचिव तथा भाकृअप–भारतीय कृषी संशोधन
संस्थेचे (ICAR-IARI) माजी संचालक व माजी कुलगुरू पद्मश्री
डॉ. अशोक कुमार सिंह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी दीक्षांत अभिभाषण
केले.
अकोला येथील डॉ.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. विलास खर्चे, तसेच वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ.
वेदप्रकाश पाटील, डॉ. किसनराव गोरे आणि डॉ. अशोक ढवण यांची
प्रमुख उपस्थिती होती.
व्यासपीठावर
विधान परिषद सदस्य आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील,
विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा भारतीय कृषी संशोधन
परिषदेचे (ICAR) माजी उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर. सी.
अग्रवाल, कृषी परिषदेचे महासंचालक श्री. राहुल रंजन महिवाल
(भाप्रसे), कृषी परिषदेचे सदस्य श्री. जनार्दन कातकडे,
संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब
ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ
अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव,
उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रासह
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाचा २८ वा
दीक्षांत समारंभ अत्यंत साध्या स्वरूपात आयोजित करण्यात आला.
या दीक्षांत
समारंभात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विविध विद्याशाखांतील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी अभ्यासक्रम
पूर्ण करणाऱ्या एकूण ३,११४ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात
आल्या. यामध्ये आचार्य पदवीचे २९, पदव्युत्तर पदवीचे २९२ आणि
पदवी अभ्यासक्रमाचे २,७९३ स्नातकांचा समावेश होता.
याशिवाय, कृषी आणि शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या मान्यवरांना विविध मानद पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. राज्यसभा सदस्य
तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार श्री. अशोकराव चव्हाण यांना मानद
‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी (अनुपस्थित), तर प्रगतशील शेतकरी
श्री. चंद्रकांत वरपूडकर आणि श्री. चंद्रशेखर भडसावळे यांना मानद ‘कृषिरत्न’ उपाधी
प्रदान करण्यात आली. तसेच, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील
१५ प्रगतशील शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ आणि सहा प्रगतशील
शेतकऱ्यांना ‘नवोन्मेषी शेतकरी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
२८ व्या
दीक्षांत समारंभापर्यंत कृषी आणि संलग्न शाखांमधील एकूण ७२,१०१ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या
आहेत. याशिवाय, कृषी पदविका अभ्यासक्रमाची ६१,३८१ प्रमाणपत्रे तसेच उद्यानविद्या अभ्यासक्रमाची १,४२४
प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. अशा प्रकारे, एकूण १,३४,९०६ कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीत विद्यापीठाने
मोलाचे योगदान दिले आहे.
या समारंभात
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रावीण्य संपादन
करणाऱ्या गुणवंत स्नातकांना विद्यापीठ आणि दात्यांच्या वतीने सुवर्णपदके, रौप्यपदके, रोख
पारितोषिके आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. यामध्ये एकूण ६३
पदके व पारितोषिकांचा समावेश होता. त्यात विद्यापीठाची १४ सुवर्णपदके, दात्यांकडून प्रदान करण्यात येणारी १४ सुवर्णपदके, एक
रौप्यपदक, नऊ रोख पारितोषिके आणि २५ पदव्युत्तर पदवी
गुणवत्ता प्रमाणपत्रांचा समावेश होता.
माननीय
कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रति-कुलपती श्री. दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ
संदेशाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पदवी प्राप्त करणाऱ्या
विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की,
विद्यार्थ्यांना पदवीधर होताना जितका आनंद होत आहे, तितकाच आनंद त्यांच्या आई-वडिलांना होत आहे. त्यांच्या या यशाचा मला देखील
तितकाच आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून
आलो असल्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे आणि त्यांच्या यशाचे
महत्त्व मला चांगलेच ठाऊक आहे, असे त्यांनी नमूद केले.
वसंतराव नाईक
यांनी महाराष्ट्रात हरितक्रांतीचा पाया रचला असून,
ही हरितक्रांती पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने शिक्षण न घेता उद्योग-व्यवसाय
आणि कृषी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. आपण
सर्वजण ‘ॲग्रीकॉस’ म्हणून ओळखले जाता. या ओळखीचा गौरव अधिक उंचावण्यासाठी
विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे
महत्त्वपूर्ण कार्य आपण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त
केली.
कृषी
उद्योजकता, कृषी निर्यात,
कृषी स्टार्टअप आणि कृषी आधारित उद्योगांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध
आहेत. विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा. नोकरीच्या मागे न लागता नोकरी
देणारे उद्योजक बना. यासाठी महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,
अशी ग्वाही त्यांनी दिली. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन शेतीच्या विकासासाठी कार्यरत असून, दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे प्रयत्न सुरू
आहेत.
पदवी ही केवळ
विद्यार्थ्यांच्या कष्टांची फलश्रुती नसून,
ती आई-वडिलांच्या अथक परिश्रमांचे फळ आणि बळीराजाच्या
आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना आधार व धीर देत
त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे आणि शेतीच्या विकासासाठी योगदान द्यावे,
असे आवाहन करून त्यांनी सर्व स्नातकांना यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा
दिल्या.
माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व मान्यवरांचे स्वागत
करून विद्यापीठाच्या कार्याचा आणि शेतकरी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध
उपक्रमांचा आढावा घेतला. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माननीय राज्यपाल
महोदयांच्या मान्यतेने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार
माननीय श्री. अशोकराव चव्हाण यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने, तर प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांतदादा
वरपूडकर आणि श्री. चंद्रशेखर भडसावळे यांना मानद ‘कृषिरत्न’ उपाधीने सन्मानित
करण्यात आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
देश, राज्य आणि विद्यापीठ हे शेतकरी केंद्रित
दृष्टिकोनातून कार्य करीत आहेत. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या
मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार शेतकऱ्यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्याचे
निश्चित करण्यात आले. त्यानुसार मराठवाड्यातील २१ प्रगतशील शेतकऱ्यांना सन्मानित
करण्यात आले असून, त्यामध्ये १५ शेतकऱ्यांना ‘शेतकरी
शास्त्रज्ञ पुरस्कार’, तर सहा शेतकऱ्यांना ‘नवोन्मेषी शेतकरी
पुरस्कार’ प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार हे
केवळ आजवर केलेल्या कार्याची पावती नसून,
भविष्यात समाजोपयोगी आणि शेतकरी कल्याणाचे कार्य करण्याची जबाबदारी
वाढविणारे असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने
‘शेतकरी देवो भव’ ही भावना जोपासत सातत्याने शेतकरी हितासाठी कार्य केले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या कार्यात पुढे जाताना विद्यापीठ त्यांच्या पाठीशी सदैव उभे
राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारतीय
संस्कृतीत ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेतून
शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरही कृषी
क्षेत्राचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशाचे माननीय कृषिमंत्री शेतकरी देवतुल्य
असून, शेतकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा असल्याचे
सातत्याने सांगतात. मागील दीक्षांत समारंभात परभणी येथील प्रगतशील शेतकरी श्री.
श्रीरंग देवबा लाड यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले
होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
मराठवाड्यातील इतर शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारे प्रगती साधून राष्ट्रीय स्तरावर
आपली ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या दीक्षांत
समारंभात विद्यापीठाने एकूण ३,११४ स्नातकांना विविध पदव्या प्रदान केल्या असून, गुणवंत
विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, रौप्यपदके, रोख पारितोषिके आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे अशा एकूण ६३ पुरस्कारांनी
गौरविण्यात आले आहे. हे विद्यार्थी भविष्यात राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात मोलाचे
योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व
स्नातकांनी ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, देशदेवो भव’ ही संकल्पना प्रत्यक्ष जीवनात अंगीकारावी. आपल्या
आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना देशसेवा आणि शेतकरी कल्याणासाठी समर्पित
भावनेने कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन त्यांनी
केले. विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण सुमारे ९०
टक्क्यांच्या आसपास असून, हा मोठा सामाजिक बदल असल्याचे
त्यांनी नमूद केले. विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि
विस्तार कार्यामध्ये महिला शास्त्रज्ञांचे योगदानही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी
सांगितले.
सध्या
विद्यापीठ केवळ ३५ टक्के मनुष्यबळावर कार्यरत असून,
नवीन आकृतिबंधानुसार ९१० पदांना मंजुरी मिळाली आहे. विद्यापीठातील
रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंचावर उपस्थित आमदार डॉ.
प्रतापसिंह पाटील आणि कृषी परिषदेचे महासंचालक श्री. राहुल रंजन महिवाल यांनी
सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठातील
शास्त्रज्ञांना परदेशातील विविध संस्थांना भेटी देण्याची आणि आंतरराष्ट्रीय
स्तरावरील संशोधनाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन
कार्यात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. यासाठी कृषी शिक्षण क्षेत्रात डॉ. आर. सी.
अग्रवाल यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी
नमूद केले.
परभणी येथील
विद्यापीठ तीन बाजूंनी ग्रामीण परिसराने वेढलेले असून, एका बाजूला छोटे शहर आहे. त्यामुळे हे खऱ्या
अर्थाने ग्रामीण विद्यापीठ आहे. तसेच देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याचा
विद्यापीठाला भौगोलिक लाभ मिळतो. विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर अधिक चांगले
मानांकन मिळविण्यासाठी आवश्यक ते पाठबळ मिळणे गरजेचे आहे. विद्यापीठ यासाठी
सातत्याने प्रयत्नशील असून, अलीकडेच ११ संशोधन प्रकल्प
कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे १,०००
विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले
आहे. या सर्व प्रयत्नांमुळे विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे
त्यांनी सांगितले.
विद्यापीठात
कार्य करताना आपल्याला कधीही परकेपणाची भावना जाणवली नाही, असे सांगून त्यांनी राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे सहकार्याबद्दल आभार
मानले. कार्य करताना येणाऱ्या अडचणींना आव्हान म्हणून स्वीकारून त्यांचे संधीत
रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रगतीला गती मिळाली,
असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी
उत्कृष्ट कार्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. केवळ इच्छा व्यक्त करून यश मिळत नाही, तर त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी कृती करणे
आवश्यक आहे. आपण केलेले कार्य भविष्यातील ५० वर्षांपर्यंत स्मरणात राहील, असे असावे, असे आवाहन त्यांनी केले. जीवनात सदैव
आनंदी राहून मनःशांती जपावी, इतरांच्या भावनांचा आदर करावा,
कोणाचाही उपहास करू नये, तसेच करुणा, सद्भावना आणि दयाभाव जोपासावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याजवळील
ज्ञान, धर्म आणि शक्ती यांचा योग्य उपयोग करावा. यातूनच
व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे सांगून
त्यांनी सर्व स्नातकांना यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी
पद्मश्री डॉ. अशोक कुमार सिंह यांनी आपल्या दीक्षांत अभिभाषणात वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव
केला. विद्यापीठाच्या या कार्यामुळे राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची उंची आणि ओळख
वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी
त्यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या स्थापनेपासून देशातील कृषी
विद्यापीठांच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार
कार्याच्या विकासातील योगदानाचा आढावा घेतला. मागील दशकात भारतीय कृषी क्षेत्राने
उल्लेखनीय प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या सकल राष्ट्रीय
उत्पन्नात (GDP) कृषी क्षेत्राचा सुमारे १८.२ टक्के वाटा
असून, देशातील ४५.६ टक्के लोकसंख्येच्या उपजीविकेचा आधार
कृषी क्षेत्र आहे. सन २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १.६४ अब्ज होण्याची शक्यता
असून, त्या अनुषंगाने अन्नधान्याची मागणी मोठ्या प्रमाणात
वाढणार आहे. त्याचवेळी नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणेही आवश्यक आहे. हवामान
बदलामुळे शाश्वत शेतीसमोर निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेता, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करून अधिक उत्पादनक्षम आणि
शाश्वत शेती विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हवामान बदल हा
भविष्यातील शेतीसमोरील अत्यंत महत्त्वाचा विषय असून,
त्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी
कौतुक केले. शून्य मशागत तंत्रज्ञान (Zero Tillage), गव्हातील
कमी मशागत पद्धती, जमीन सपाटीकरण (Laser Land
Levelling), भाताचे थेट पेरणी तंत्रज्ञान (Direct Seeded
Rice), खतांचा कार्यक्षम वापर, जैविक खतांचा
वापर तसेच सेंद्रिय व नैसर्गिक शेती या तंत्रज्ञानांचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च
कमी होण्यासोबतच हरितगृह वायूंचे उत्सर्जनही कमी करता येईल. तसेच कार्बन
क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होऊ
शकते, असे त्यांनी सांगितले.
अचूक शेतीसाठी
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जीपीएस आधारित
तंत्रज्ञान, उपग्रह आधारित तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि ड्रोन
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानांच्या माध्यमातून अचूक
माहिती उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना कीडनाशके, खते आणि इतर कृषी
निविष्ठांच्या व्यवस्थापनाबाबत योग्य निर्णय घेणे शक्य होईल. यासाठी माननीय
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी अलीकडेच सुरू केलेल्या मोबाईल ॲपचाही
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांचे
कृषी विकासातील योगदान अत्यंत मोलाचे असल्यामुळे विद्यापीठाने यंदाच्या दीक्षांत
समारंभात शेतकऱ्यांचाही विशेष सन्मान केला आहे,
ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी
शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केली असली, तरी ही त्यांच्या
नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. शिक्षणाचा प्रारंभ जसा होतो, तसाच
दीक्षांत समारंभातून कुलगुरूंच्या हस्ते दीक्षा घेऊन एका नव्या प्रवासाचा प्रारंभ
होतो. या प्रसंगी स्नातकांनी दूरदृष्टी आणि दृढनिश्चय ठेवून राष्ट्रनिर्मितीसाठी
महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. तसेच गुरु-शिष्य नात्याचे पावित्र्य आणि महत्त्व
आयुष्यभर जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यापीठाच्या प्रगती अहवालाचे वाचन केले. यामध्ये त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (NEP) विविध तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी केली असून, देशातील २० राज्यांमधील विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण व प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून नऊ विविध देशांना भेटी देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अनुभव घेतला आहे. विद्यापीठाचे संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्यही अग्रगण्य असून, या क्षेत्रांत विद्यापीठाने अनेक महत्त्वपूर्ण यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजित चव्हाण यांनी केले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)
.jpeg)

.jpeg)
