Wednesday, March 2, 2022

तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास सेंद्रीय शेतीही व्यवसायितत्वावर करता येणे शक्‍य ..... डॉ. प्रशांत बोडके, दापोली

वनामकृवित आयोजित ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक  मार्च रोजी रोजी “व्यावसायीक सेंद्रीय शेती-काळाची गरज’’ या विषयावर दापोली येथील डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागचे विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बोडके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बापुसाहेब भाकरे हे होते डॉ. प्रशांत बोडके तर मौजे असलदे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील प्रगतशील शेतकरी श्री. सचिन लोके, आयोजक प्रमुख अन्‍वेशषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

अध्यक्षीय भाषणात डॉ. बापुसाहेब भाकरे म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीला शास्त्रीय ज्ञानाची जोड दिली तर सेंद्रीय शेती शाश्वत करता येईल व त्यातही उत्पादन वाढ होऊन निश्चितच आर्थिक नफा शेतक­यांना मिळेल. भावी काळात अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्या सोबतच विषमुक्त अन्न लोकसंख्येस पुरवठा करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शेतक­यांना सेंद्रीय शेतीचे तांत्रिक मार्गदर्शन वेळोवेळी मिळणे आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञान व मार्गदशनाच्या बळावरच सेंद्रीय शेतीमध्ये येणा­या अडचणींवर मात करुन सेंद्रीय शेती यशस्वीपणे करता येईल. 

प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत बोडके आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, आपल्या देशात हरीत क्रांती नंतर अन्नधान्याचे उत्पादन पाच पटीने वाढले, दुधाचे उत्पादन ८.५ टक्‍क्यांनी वाढले आहे. लोकसंखा आणि त्यांना करण्यात येणारा अन्नधान्य पुरवठा याची योग्य सांगड घालणे ही प्राथमीक गरज असल्याचे प्रतिपादन केले. परंतु पर्यावरणाचे संरक्षण, जमिनीचे व मानवी आरोग्य संवर्धनासाठी त्याच बारोबर मृदा संर्वधन, सौरउर्जेचा वापर, जैवविविधता संवर्धन, बायोगॅस आदींचा वापर करुन सेंद्रीय शेती करता येईल. पर्यावरण संरक्षणासाठी व गुणवत्ता धारक सेंद्रीय उत्पादने घेण्यासाठी नैसर्गिक तत्वावर आधारीत असलेली नैसर्गिक शेती, बायोडायनामिक शेती, झीरो बजेट शेती, योगीक शेती पंचगव्य शेती, होमा शेती इत्यादी प्रकारच्या शेतीचा अवलंब करावा लागेल असे नमुद केले. सेंद्रीय शेतीत योग्य तंत्रज्ञान व निविष्ठा यांचा शास्त्रीय पध्दतीने वापर आणि बाजारपेठेतील मागणी यांचा ताळमेळ घातल्यास सेंद्रीय शेती व्यावसायीक तत्वावर करुन ती शेती फायदयाची करता येईल असे ते म्हणाले.

प्रगतशील शेतकरी श्री. सचिन लोके आपले सेंद्रीय शेतीतील अनुभव सां‍गतांना म्हणाले की, मी माझ्या शेतावर सेंद्रीय पध्दतीने हळद, भेंडी, कारली, तोंडली इ. पीके घेतो. ज्यामुळे विषमुक्त अन्न तयार करुन घरी वापरुन उर्वरीत उत्पादन बाजारपेठेत विक्री करुन चांगला नफा मिळतो. बाजारपेठेमध्ये विविध सेंद्रीय निविष्ठां उपलब्ध असून त्यांचा वापरा बद्दल शेतक­यांमध्ये संदिग्धता आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीवरील प्रशिक्षण कार्यक्रम हे वारंवार व्हायला हवेत.

प्रशिक्षणात शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदी मोठया सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. दिपक शिंदे यांनी केले तर आभार श्री. सतिश कटारे यांनी म्‍हणाले आणि प्रा.पुंडलीक वाघमारे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.