वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बदनापुर (जि जालना) येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या अर्थसहाय्याने अनुसूचित जाती उपयोजना कार्यक्रमांतर्गत १५ मार्च ते ३० मार्च दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात असुन दिनांक १५ मार्च रोजी व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले. दिनांक १५ मार्च रोजी बँकिंग क्षेत्रातील संधी व त्या संबंधित विविध स्पर्धा परीक्षा या विषयावर औरंगाबादच्या सारथी एज्युकेशनचे संचालक प्रा. राहुल मिसाळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ राकेश अहिरे हे होते. व्याख्यानमालेत महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, भाषा विषयक मार्गदर्शन, विविध स्पर्धा परीक्षेसाठीची पूर्वतयारी, राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या संधी व त्यासंबंधित स्पर्धा परीक्षा, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या परीक्षा, कृषी विषयक रोजगार संधीच्या स्पर्धा परीक्षा, बँकिंग क्षेत्रातील उपलब्ध रोजगाराच्या संधी व त्यासंबंधीच्या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी, बँकिंग क्षेत्रातील संधी आदी विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. गणेश गायकवाड, डॉ. एन. डी. देशमुख यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.