Tuesday, March 8, 2022

सोयाबीन बियाणात शुध्‍दता राखण्‍याकरिता न्‍युक्‍लीएस बीजोत्‍पादनावर विद्यापीठाचा भर ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादन पीक पाहणी कार्यक्रम संपन्‍न

देशातील सोयाबीन हे तेलवर्गीय पिकांमध्‍ये महत्‍वाचे पिक असुन महाराष्‍ट्र सोयाबीन उत्‍पादनात एक अग्रेसर राज्‍य आहे. राज्‍यात साधारणत: ४४ लाख हेक्‍टर पेक्षा जास्‍त क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होत असुन यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापैकी साधारणत: १५ ते २० लाख हेक्‍टर क्षेत्रावर परभणी कृषि विद्यापीठ विकसित वाणांची लागवड केली जाते. सोयाबीनच्‍या दर्जेदार बियाणे निर्मितीवर विद्यापीठ सातत्‍याने काम करित आहे. सोयाबीन बियाणात शुध्‍दता राखण्‍याकरिता न्‍युक्‍लीएस बियाणे निर्मिती करणे एक आव्‍हानात्‍मक काम आहे. याकरिता यावर्षी उन्‍हाळी हंगामात परभणी कृषि विद्यापीठाने एकाच ठिकाणी सलग ५० एकर प्रक्षेत्रावर सोयाबीनच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या वाणांचे बीजोत्‍पादन हाती घेतले असुन देशांतील याप्रकारे एकाच प्रक्षेत्रावर एवढया मोठया प्रमाणावर सोयाबीनाचे न्‍युक्‍लीएस बीजोत्‍पादन कार्यक्रम घेण्‍याची ही पहिलीच वेळ असेल, असे मत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.  


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वीयत सोयाबीन योजने अंतर्गत उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादन पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ७ मार्च रोजी करण्‍यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्रभारी विद्यापीठ नियंत्रक श्री किरण कोल्‍हे, सहयोगी संशोधन संचालक (बियाणे) डॉ के एस बेग, सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी म्‍हेत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


कुलगरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, विद्यापीठ राबवित असलेले न्‍युक्‍लीएस बीजोत्‍पादनाचे प्रारूप देशातील एकमेव प्रारूप असुन प्रत्‍येक सोयाबीन वाणाच्‍या बीजोत्‍पादनाकरिता स्‍वतंत्र प्रक्षेत्र राखुण ठेवण्‍यात आले आहे, यामुळे बियाणांची शुध्‍दता राखता येईल. विद्यापीठ विकसित दर्जेदार बियाणावर शेतकरी बांधवाचा मोठा विश्‍वास असुन सर्वांच्‍या सामुदायिक प्रयत्‍नातुन यावर्षी विविध पिकांचे दहा हजार क्विंटल बीजोत्‍पादनाचे लक्ष विद्यापीठ साध्‍य करेल, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.  


संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठातील सोयाबीन संशोधन केंद्राने २० हेक्‍टर नवीन प्रक्षेत्र विक‍सित केले असुन येथे विद्यापीठ विकसित अधिक उत्‍पादन देणारे एमएयुएस ७१, एमएयुएस १६२, एमएयुएस १५८, एमएयुएस ६१२ या मुख्‍य चार वाणांचे न्‍युक्लियस बीजोत्‍पादन कार्यक्रम हाती घेण्‍यात आला आहे. यामुळे शेतक-यांमध्‍ये सोयाबीनाचे नवीन बियाणे बदल कार्यक्रमास हातभार लाभणार आहे. सदरिल २० हेक्‍टर प्रक्षेत्र नव्‍यानेच विकसित करण्‍यात आले असुन अजुन ७० हेक्‍टर नवीन प्रक्षेत्र लागवडीखाली आणण्‍याकरिता विकासात्‍मक काम प्रगतीपथावर आहे.


डॉ के एस बेग म्‍हणाले की, परभणी विद्यापीठ विकसित सोयाबीन वाणांची लागवड संपुर्ण राज्‍यात केली जात असुन विद्यापीठ विकसित वाणांंनी राज्‍यात दबदबा निर्माण केला आहे. प्रास्‍ताविकात डॉ शिवाजी म्‍हेत्रे यांनी खरिप हंगामातील सोयाबीन काढणीच्‍या वेळी येणा-या पाऊसामुळे बियाणांची उगवणक्षमता कमी होते, यामुळे विद्यापीठाने दोनशे एकर प्रक्षेत्रात उन्‍हाळी बीजोत्‍पादनाचा हाती घेतल्‍याचे सांगितले. याप्रसंगी मान्‍यवरांनी उन्‍हाळी बीजोत्‍पादन प्रक्षेत्रावरील पीक पाहणी केली, सध्‍या हे पीक फुलोरा तसेच शेंगा लागण्‍याच्‍या अवस्‍थेत असुन पीक परिस्थिती समाधानकारक आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार श्री ऋषिकेश औंढेकर यांनी मानले. कार्यक्रमास विविध संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, शास्‍त्रज्ञ, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.