Thursday, March 17, 2022

सेंद्रीय फळे व भाजीपाला लागवडीमध्ये एकात्मिक पध्दतीचा अवलंब करावा ... विभाग प्रमुख डॉ. गिरधारी वाघमारे

वनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरिय तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या राज्यस्तरीय तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन मा. कुलगुरु डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ.दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५ मार्च रोजी “सेंद्रीय शेतीमध्ये  फळे व भाजीपाला पिकांचे लागवड तंत्रज्ञान’’ यावर मोदीपुरम, मीरत (उत्तर प्रदेश) येथील भाकृअप - भारतीय संशोधन संस्था एकात्मिक शेतीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (फळ विज्ञान) डॉ. पुनम कश्यप यांचे व्याख्यानाने आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उद्यानविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गिरधारी वाघमारे, मौजे गोला पांगरी (ता.जि.जालना) येथील प्रगतशिल शेतकरी श्री. अर्जुन मोरे, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. गिरधारी वाघमारे म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये करतांना सेंद्रीय शेती संकल्पना समजुन घेणे आवश्यक आहे. विविध ठिकाणी सेंद्रीय शेती विविध पध्दतीने केली जाते. त्यामुळे व्यापक स्वरुपाने सेंद्रीय शेती या संकल्पनेमध्ये स्पष्टता असने व सेंद्रीय शेतीचा उल्लेख वस्तुस्थितीनुसार करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्यशासनातर्फे राबविण्यात येणा­या विविध योजना सेंद्रीय शेतीसाठी उपयोगात आणता येतील. आज पीक उत्पादनात सेंद्रीय शेतीचे सर्वमान्य असे किंवा सिध्द झालेले लागवडीपासुन काढणी पर्यंतचे लागवड तंत्रज्ञान किंवा लागवडीचे पॅकेज विकसीत झालेले नाही परंतु त्यावर संशोधन सुरु आहे. अशावेळी सेंद्रीय पध्दतीने पीक उत्पादन घेतांना शास्त्रीयदृष्टया सिध्द झालेले तंत्रज्ञान एकात्मिक पध्दतीने वापरने गरजेचे आहे. रोग व कीडींना प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. सेंद्रीय शेतीत अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी विविध पर्यांयांचा उदा. शेणखत, गांडुळखत, गोमुत्र, जिवामृत, पंचगव्य यांचा परिस्थिती नुसार एकात्मिक पध्दतीने वापर करावा. कीड नियंत्रणासाठी गोमुत्र, निमअर्क, दशपर्णीअर्क यांचा वापर करावा. 

मार्गदर्शनात प्रमुख वक्ते डॉ. पुनम कश्यप म्‍हणाल्‍या की, सेंद्रीय शेतीमधील चार सिध्दांत सांगीतले ते म्हणजे  स्वास्थ सिधांत, परिस्थितीचा सिद्धांत, निपक्षतेचा सिद्धांत, देखभाल सिद्धांत आहेत. आपल्याला गुणवत्तापुर्ण अन्नधान्य निर्माण करण्याची गरज आहे. सेंद्रीय शेती ही मृदा, पशु, मानवी आरोग्य व स्थिरतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशात दिवसंेदिवस सेंद्रीय शेती खालील क्षेत्र वाढत चालले आहेे. भाजीपाला पिकांत सेंद्रीय उत्पादन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मानावाच्या दैनंदिन आहारात फळ व भाजीपाला याचा प्रामुख्याने समावेश होतो. तसेच भाजीपाला व फळ पिकांमध्ये कृषि रसायनांचा वापर खुप मोठया प्रमाणावर होतो. परिणामी मानवी, पशु व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सेंद्रीय पध्दतीने भाजी व फळ उत्पादन घेण्यासाठी जैविक खत तसेच कीड नाशक व बुरशी नाशक यांचा वापर करणे अनिवार्य आहे.

प्रगतशील शेतकरी श्री.अर्जुन मोरे यांनी आपले सेंद्रिय शेतीमघील अनुभव सांगाताना म्हणाले की, मागील १० वर्षापासून सेंद्रीय शेती करत आहे. सेंद्रीय शेती मध्ये मोसंबी, टरबुज, खरबुज, ही पिके घेत आहे. यास ग्राहाकंची खुप मागणी आहे. सेंद्रीय शेतीमध्ये उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केली तर चांगला बाजारभाव मिळतो व चांगला फायदा होतो. पिकांसाठी लागणा­या निविष्ठा हया मी माझ्या शेतावरच तयार करतो जसे की, जीवामृत, गांडुळ खत, व्हर्मीव्हाश, इत्यादी पासून खुप चांगल्या प्रकारे सेंद्रीय शेती करता येते.

प्रशिक्षण कार्यक्रमात मोठया प्रमाणावर शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सुत्रसंचलन डॉ. जयश्री एकाळे तर आभार प्रदर्शन डॉ. अनुराधा लाड यांनी केले. डॉ. राहूल बघेले, यांनी संकलक म्हणुन काम पाहिले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, डॉ. संतोष बोरगावकर, श्री. दिपक शिंदे, श्री. सुनिल जावळे, श्री. सतिश कटारे यांनी परिश्रम घेतले.