Tuesday, March 29, 2022

शेतक-यांचे कृषि विषयक प्रश्‍न सोडविण्‍यासाठी विद्यापीठ सदैव तत्‍पर ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ग्रामीण अर्थकारण हळद, कापूस व केळी या पीकांवर अवलंबून असुन या पीकांतील वाढते कीड-रोगांचे व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान विकसीत करणे आणि त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विद्यापीठ सदैव तत्पर असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेले नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये सहयोगी संचालक बियाणे कार्यालय, कापूस संशोधन केंद्र आणि केळी संशोधन केंद्र यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ मार्च रोजी आयोजीत हळद, केळी व कापूस पीक शेतकारी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्री प्रदीप कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री लतीफ पठाण, वनामकृविचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, परभणी येथून शेतकर्‍यांना मिळणारे विद्यापीठाचे बायोमिक्सया उत्पादनामुळे शेतकर्‍यांचे हळदीच्या उत्पादनामध्ये आमुलाग्र वाढ दिसून येत आहे. त्यामुळे या उत्पादनाचे वितरण विभागातील सर्व जिल्हयातील विद्यापीठाच्या केंद्रावर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीन पीकाचे महत्व वाढत आहे. राज्यामध्ये वनामकृविच्या सोयाबीन बियाण्यास सर्वाधिक प्रमाणात  मागणी आहे. याच्या जोडीला उन्हाळी हंगामातील सोयाबीन बिजोत्पादनातील उद्भवणारे प्रश्न ओळखणे व त्यावर उपाययोजना सुचविण्याची जवाबदारी आपल्यावर आहे अशी जाणीव त्यांनी व्यक्त केली.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, विद्यापीठाचे नवीन संकरीत वाण महाबीजच्या माध्यमातून लवकरच बीटी स्वरूपात उपलब्ध करण्यात येत असुन भविष्यात शेतकर्‍यांचा बियाण्यावरील खर्च कमी करण्यासाठी कापसाचे बीटी स्वरुपातील सरळ वाण विकसीत करण्यात येत आहेत. विद्यापीठ नियमित विस्तार व प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन राज्यातील हळदीतील व केळी पीकातील करपा रोगांबाबत व कपाशीवरील गुलाबी बोंडअळी या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याचे ते म्‍हणाले.

प्रमुख अतिथी श्री लतीफ पठाण यांनी विद्यापीठाचे प्रमुख पीकांचे संशोधन भरीव असे  योगदान असल्‍याचे म्‍हणाले तर निवासी उपजिल्हाधिकारी श्री प्रदीप कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील कृषि समस्यांचे निराकरणासाठी विद्यापीठाच्या कार्य कौतुकास्‍पद असल्‍याचे म्‍हणाले.

प्रगतीशील शेतकरी व कृषि विभागाचे माजी संचालक यांनी कृषि यांत्रिकीकरण व रबी-उन्हाळी हंगामातील सोयाबीन बाबत संशोधनाच्या आवश्यकतेची गरज असल्याचे सांगितले. तांत्रिक सत्रात नांदेड व हिंगोली जिल्ह्यामधील हळद व केळी पीकाचे वाढते क्षेत्र व त्यावरील समस्यांवर करावयाच्या उपाययोजनांबाबत या मेळाव्यामध्ये माहिती देण्यात आली. हळद लागवडीबाबत डॉ. विश्वनाथ खंदारे, केळी पीकातील व्यवस्थापनाबाबत डॉ. संतोष पिल्लेवाड तर विवीध पिकांतील कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापनाबाबत डॉ. बस्वराज भेदे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले तर डॉ. विजयकुमार चिंचाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अरूण गायकवाड, डॉ. अमोल मिसाळ, डॉ. राजेश धुतमाल, डॉ. सुजाता धुतराज, श्रीमती सुरेवाड, श्रीमती ताटीकुंडलवार, सर्वश्री पांचाळ, तुरे, गौरकर, अडकीने, सोनुले, जाधव, शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले.