Thursday, March 10, 2022

वनामकृवित शेती स्‍वयंचलनातील प्रगत डिजिटल तंत्रज्ञान यावरील आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

कार्यशाळेत अमेरिका, फ्लोरिडा, फिलिपाईन्‍स आणि भारतातील नामांकित संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ करणार मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) च्‍या वतीने दिनांक १४ ते १६ मार्च दरम्‍यान शेती स्‍वयंचलनातील प्रगत डिजिटल तंत्रज्ञान यावर आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन या कार्यशाळेचे उदघाटन दिनांक १४ मार्च रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात सकाळी १०.०० वाजता होणार आहे. उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन प्र‍मुख अतिथी म्‍हणुन राष्ट्रीय समन्‍वयक मा डॉ प्रभात कुमार यांची उपस्थिती लाभणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेड येथील स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ उद्धव भोसले व भारतीय अंतराळ संशोधन संस्थे अंतर्गत असलेल्‍या अहमदाबाद येथील  अंतराळ उपयोग केंद्राचे अंतराळ शास्‍त्रज्ञ मा डॉ राहुल निगम हे उपस्थिती लाभणार आहे. विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत शेतीचे स्‍वयंचलिकरण, कृषि यंत्रमानव, कृषि ड्रोन, शेतीत इटरनेट ऑफ थिंग्‍स चा वापर, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, माहिती तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोग, अन्‍न प्रक्रियेतील स्‍वयंचलिकरण, स्‍वयंचलित शेती यंत्र आदी विषयावर अमेरिका, फ्लोरिडा, फिलिपाईन्‍स तसेच देशातील नामांकित संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ डिटिजट शेतीतील विविध विषयावर मार्गदर्शन करणार असुन देशातील विविध विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. कार्यशाळेचे मुख्‍य आयोजक प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, आयोजन सचिव डॉ कैलास डाखोरे असुन, कार्यशाळेचे समन्‍वयक प्राचार्य डॉ यु एम खोडके, डॉ आर पी कदम, इंनि. एस एन पवार, डॉ एस आर गरूड आदीसह नाहेप प्रकल्‍पातील शास्‍त्रज्ञ परिश्रम घेत आहेत.