Thursday, March 10, 2022

निसर्ग नियमाच्या आधारे कार्यक्षम जैविक कीड व्यवस्थापन करावे ...... किटकशास्त्रज्ञ तथा कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने राज्यस्तरीय तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन मा. कुलगुरु डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन

दिनांक ९ मार्च रोजी “सेंद्रीय शेतीमध्ये जैविक कीड व्यवस्थापन आणि जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर’’ या विषयावर नवसारी, (गुजरात) येथील नवसारी कृषि विद्यापीठाचे किटकशास्‍त्रज्ञ डॉ. मुकेश सिद्धपारा यांच्या व्याख्यानाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव तथा किटकशास्‍त्रज्ञ डॉ. धीरजकुमार कदम, हे होते तर रा. दिग्रस (बु) (ता. पातुर जि. अकोला) येथील प्रगतशील शेतकरी श्री. राजेंद्र टाले, आयोजक प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. संतोष फुलारी, डॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय मार्गदर्शनात डॉ. धीरजकुमार कदम म्‍हणाले की, जैविक किड व्यवस्थापन म्हणजे निसर्गात आढळणा­या घटकांचा वापर करुन किड नियंत्रण करणे होय. जवळपास ९५ टक्के कीडींचे नियंत्रण हे निसर्गच करतो. निसर्गाने स्वता:ची एक नियंत्रण व्‍यवस्‍था असते. निसर्गाच्या या नियमानुसार जैविक किड व्यवस्थापन कसे करता येईल हे समजुन घेऊन सेंद्रीय शेतीमध्ये किड व्यवस्थापन करावे. आज रासायनिक किटकनाशकांवरील खर्च वाढला आहे, यामुळे पर्यावरणाची हाणी होत आहे, मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे.

प्रमुख वक्ते डॉ. मुकेश सिद्धपारा मार्गदर्शनात म्‍हणाले की, किडींचे नियंत्रण योग्यरित्या करावायचे असल्यास किडींचे जीवनक्रम समजुन घेणे गरजेचे आहे जीवनक्रमातील जी कमजोर कडी आहे त्या कडीवर आपण विविध उपाय योजना करुन त्या किडींचे योग्यरित्या व्यवस्थापन करु शकतो. असे सांगुन त्‍यांनी विविध किड व्यवस्थापन पध्दती विषयी माहिती दिली. तसेच परोपजिवी किटक ट्रायकोग्रामा प्रजातीची निर्मिती प्रयोगशाळेत कशी केली जाते याचे देखील सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रगतशील शेतकरी श्री. राजेंद्र टाले  यांनी घरात आढळणा­या विविध घटक जसे की, ताक, गुळ, अंडी, लसून, मिरची, आद्रक, तंबाखु यांचा वापर करुन किडींचे प्रभावी व्यवस्थापन कसे करता येईल यावर त्यांनी त्यांचे अनुभव सांगीतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. प्रितम भुतडा तर आभार श्रीमती सारीका नारळे यांनी मानले. डॉ. श्रध्दा धुरगुडे, यांनी संकलक म्हणुन काम पाहिले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, श्री. दिपक शिंदे, श्री. अभिजीत कदम, श्री. सतिश कटारे, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.