Friday, March 25, 2022

आदिवासी शेतकरी बांधवाकरिता विद्यापीठ राबवित असलेले कार्य समाधानकारक ....... महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचीत जाती – जमाती आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री. ज. मो. अभ्‍यंकर

महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचीत जाती – जमाती आयोगाची वनामकृवित बैठक संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील दिनांक २५ मार्च रोजी महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचीत जाती – जमाती आयोगाची बैठक पार पाडली. बैठकीस आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री ज. मो अभ्‍यंकर, कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, आयोगाचे सदस्‍य (सेवा) मा श्री आर डी शिंदे, सदस्‍य (सामाजिक व आर्थिक) मा श्री के आर मेढे, जनसंपर्क अधिकारी मा श्री रमेश शिंदे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

बैठकीत कुल‍सचिव डॉ धीरजकुमार कदम यांनी विद्यापीठातील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती यांच्‍या करिता राबविण्‍यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रम आदींची माहिती दिली तसेच पदभरती, बिंदु नामावली, मागासवर्गीय कक्ष, विविध समित्‍यांची अहवाल सादर केला.

मार्गदर्शनात मा श्री ज. मो. अभ्‍यंकर म्‍हणाले की, देशाच्‍या सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनातील शेती क्षेत्राचा केवळ १३ टक्के वाटा आहे, परंतु ६५ टक्के लोकसंख्‍या ही शेतीवर अवलंबुन आहे. हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. कृषि विद्यापीठ करित असलेले संशोधन कार्य अत्‍यंत कौतुकास्पद असुन आदिवासी शेतकरी बांधवासाठी असलेले उपक्रम अतिशय चांगल्‍या प्रकारे राबविण्‍यात येत आहेत. विद्यापीठातील मागासवर्गीय करिता असलेल्‍या तक्रार निवारण समितीने तक्रार नोंदविण्‍याकरिता महिन्‍यातील निश्चित एक दिवस ठरवावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.  

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यापीठाने नांदेड जिल्‍हयातील आदिवासी बहुल भागाकरिता किनवट तालुक्‍याकरिता स्‍वंतत्र कृषि महाविद्यालयाचा प्रस्‍ताव दाखल केला आहे. विविध आदिवासी उपयोजनेच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करून आदिवासी शेतकरी बांधवाच्‍या सामाजिक व आर्थिक स्‍तर उंचावण्‍याकरिता कार्य करत असल्‍याचे सांगितले. 

यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी शैक्षणिक कार्याबाबत तर संशोधन कार्याबाबत संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी माहिती दिली. बैठकीचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले. बैठकीस उपकुलसचिव श्री पी के काळे, सहाय्यक नियंत्रक श्री किरण कोल्‍हे, सहाय्यक कुलसचिव श्री पी एम पाटील, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ डि डि टेकाळे, डॉ रणजित चव्‍हाण, श्री नरेंद्र खरतडे आदींची उपस्थिती होती.