Monday, March 28, 2022

मौजे सायाळा खटिंग येथे रासेयोचे विशेष शिबीराचे आयोजन

 

देशाच्‍या स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या स्‍थापनेचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औजित्‍य साधुन परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने मौजे सायाळा खटिंग येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक २८ मार्च रोजी शिबीराचे उदघाटन प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन सरपंच्‍या श्रीमती वत्‍सलाताई काळे या होत्‍या तर शिक्षण प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, श्री तुकाराम काळे, कार्यक्रमाधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ मधुकर खळगे, डॉ अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्‍यमातुन सामाजिक बांधिलकी म्‍हणुन कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी समाजाची व शेतकरी बांधवाची सेवा करावी. कृषि विद्यार्थ्‍यांनी पदवी अभ्‍यासक्रमात प्राप्‍त केलेल्‍या शास्‍त्रीय ज्ञानाचा शेतकरी बांधवामध्‍ये प्रसार करावा. विद्यार्थ्‍यांनाही शेतकरी बांधवाकडुन शेतीविषयक अनेक बाबी शिकण्‍यासारख्‍या आहेत. शिबिराच्‍या माध्‍यमातुन विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे, असे ते म्‍हणाले.

डॉ गोपाल शिंदे यांनी यंत्रमानव, ड्रोन आणि कृत्रिम बुध्‍दीमत्‍ताचा शेती क्षेत्रात वापराबाबत माहिती देतांनी सांगितले की येणारे युग हे डिजिटल शेतीचे युग असुन याकरिता कुशल मनुष्‍यबळाची आवश्‍यकता लागणार आहेत. यात कृषिचे विद्यार्थी मोलाची भुमिका बजावु शकतात. डिजिटल शेतीच्‍या माध्‍यमातुन कृषि पदवीधरांना रोजगाराच्‍या अनेक संधी प्राप्‍त होणार आहेत, असे सांगुन ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्‍याक्षिकाव्‍दारे मार्गदर्शन केले.

रासेयोचे हे विद्यार्थ्‍यांतील समाज सेवेची आवड करणारे व्‍यासपीठ असल्‍याचे आपल्‍या मनोगतात डॉ रणजित चव्‍हाण म्‍हणाले. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रविण कापसे यांनी केले. सुत्रसंचालन स्‍वयंसेवक प्रद्युघ्न जांगिलवाड यांनी केले तर आभार डॉ अनुराधा लाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रोसेयोचे स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले.