वनामकृवित आयोजित तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ मार्च रोजी सेंद्रीय शेतमालाचे बाजारपेठ व्यवस्थापन यावर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनाचे व्यवस्थापक श्री. आशिष मुडावदकर यांचे तर वर्धा येथील नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनीच्या सचिव श्रीमती सुनिता वाघमारे यांचे नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनीची विक्री व्यवस्थापनातील यशोगाथा यावर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालेगाव (जि. नाशिक) येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ शिंदे हे होते. ता. पुर्णा (जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी डॉ. दिलीप श्रृंगारपुतळे, आयोजक मुख्य अन्वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विश्वनाथ शिंदे म्हणाले की, शेतीमध्ये शेतकरी कष्ट करतात तांत्रिक ज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करतात परंतु विक्री व्यवस्थापनात कमी पडल्यामुळे हवा तसा आर्थिक लाभ होत नाही. यामुळे शेतकयांनी कष्टा सोबतच आपल्या शेती उत्पादनाचे रुपांतर उत्पन्नात करण्यासाठी विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य व तंत्र शिकले पाहिजे. देशात व परदेशात सेंद्रीय उत्पादनास मोठी मागणी आहे, हे करोना महामारीच्या काळात अधिक प्रकर्षाने दिसून आले. सेंद्रीय प्रमाणीकरणाच्या यंत्रणेमार्फत प्रमाणीकरण करुन घेऊन विक्री व्यवस्थापनासाठी शेतकयांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. सेंद्रीय तृणधान्य, कडधान्य, मसाला पीके यांची मोठी मागणी असून यासाठी योग्य पॅकींग, आकर्षक पध्दतीने माहिती, आकर्षक घोषणा व विक्री दालने या माध्यमातुन विक्री करावी.
मार्गदर्शनात प्रमुख वक्ते श्री. आशिष मुडावदकर म्हणाले की, बाजारपेठेत सेंद्रीय मालासोबतच बिगर सेंद्रीय माल बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे. अशावेळी ग्राहक व उत्पादक या दोन्ही घटकांची होणारी फसवणुक टाळण्यासाठी प्रमाणीकरण व उत्पादनाच्या सविस्तर माहितीसह विक्री प्रणाली विकसीत करणे गरजेचे आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेंद्रीय प्रमाणीकरणाची माहिती, किंमत, गुणवत्ता व इतर वैशिटये याबाबतची माहिती उत्पादनासोबत योग्य पॅकींगसह दिल्यास योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होते. चांगला बाजारभाव मिळण्यासाठी ग्राहकांची संख्या, उत्पन्न, अपेक्षा लक्षात घेऊन सेंद्रीय उत्पादन चांगल्या पॅकींग व गुणवत्तेसह उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
श्रीमती सुनिता वाघमारे यांनी नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनीची विक्री व्यवस्थापनातील यशोगाथा सांगतांना म्हणाल्या की, नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये एकूण ३५०० महीला काम करत आहेत. ही कंपनी केवळ महिलांनी उभी केली असून आज या कंपनीची उलाढाल ३ कोटी पेक्षा अधिक आहे. शेतकरी जो माल उत्पादन करतो त्या मालास पाहिजे तसा भाव मिळत नाही. किंवा उत्पादीत केलेला माल त्याच दिवशी आहे त्या भावात विकावा लागतो. या सर्व अडचनी लक्षात घेऊन आम्ही कंपणी स्थापन केली त्यानुसार आम्ही गाव पातळीवर बैठका घेतो. शेतकयांकडील माल विकत घेतो, यामुळे शेतकरी ते ग्राहक यांच्यातील मध्यस्थांची साखळी कमी केली. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक असा थेट संपर्क होऊन शेतकयांना योग्य बाजारभाव मिळतो. शेतकयांनी त्यांच्या शेती मालाची वयक्तीक किंवा गटा मार्फत एकत्र येऊन प्रक्रिया केली तर मुल्यवर्धन होऊन अधिक बाजरभाव मिळु शकतो.
प्रगतशील शेतकरी डॉ. दिलीप श्रृंगारपुतळे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीते नुसार आम्ही ग्रामीण पातळीवर काम करत आहोत. आज शेती समोर अनेक समस्या आहेत. यामुळे यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच शेतकयांनी मानसीकता बदलने आवश्यक आहे. आम्ही शेती सेवा ग्रुम च्या माध्ययामातुन शाश्वत शेती करत असुन स्वत:चा शेतमाल स्वत: विक्री करत आहेत. यामध्ये आमचे सदस्य आंबा, टरबुज, केळी, मोसंबी, संत्री इ. फळांची स्वत: पँकीग करुन विशिष्ट ग्राहक वर्गापर्यंत पोहचुन विक्री करतात. शेतामधील चांगल्या प्रतिच्या मालाला जो पर्यंत चागला भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकयांची प्रतीष्ठा वाढणार नाही.
प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सुत्रसंचलन डॉ. संतोष फुलारी यांनी केले तर आभार श्री. मंगेश मांडगे यांनी मानले. डॉ. संतोष कांबळे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संतोष बोरगावकर, श्री. सतिश कटारे आदींनी परिश्रम घेतले.