Tuesday, March 1, 2022

वनामकृवित करडई बियाणे साठवण गोदामाचे उदघाटन


भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालय पुरस्‍कृत आणि हैद्राबाद येथील भाकृअप – भारतीय तेलबिया संशोधन संस्‍था यांच्‍या मदतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात तेलबियांच्या दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी सीड हब निर्मिती प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन बांधण्‍यात आलेल्‍या करडई बियाणे साठवण गोदामाचे उदघाटन दिनांक २८ फेबुवारी रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी हैद्राबाद येथील हैद्राबाद येथील भाकृअप – भारतीय तेलबिया संशोधन संस्‍थेच्‍या संचालिका डॉ एम सुजाता या प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित होत्‍या तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, नोडल अधिकारी डॉ एस एन सुधाकर बाबु, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ के एस बेग, करडई बियाणे हबचे प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे, राज्‍य समन्‍वयक श्री साबळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, देशाला खाद्यतेलाची मोठया प्रमाणात आयात करावी लागते, तेलबिया पिकांखालील लागवड क्षेत्र वाढीकरिता शासन प्रयत्‍न करत आहे. परभणी विद्यापीठाने सोयाबीन, सुर्यफुल, करडई, भुईमुग, जवस आदी तेलबिया पिकांच्‍या अनेक चांगले वाण विकसित केली आहेत. करडई पिकांच्‍या विविध जातीच्‍या दर्जेदार बियाणांची विद्यापीठ निर्मिती करते, या बियाणांची साठवणुकी करता चांगल्‍या गोदामाची आवश्‍यकता होती, यामुळे दर्जेदार करडई बियाणे विद्यापीठ निर्मितीस बळकटी प्राप्‍त होईल. विद्यापीठाने दर्जेदार बियाणे निर्मितीकरिता लागणा-या सुविधा करिता कोठेही निधी कमी पडु दिला नाही. यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांच्‍या दहा हजार क्विंटल बियाणे निर्मितीचे लक्ष पुर्ण केले असल्‍याचे ते म्‍हणाले.

डॉ एम सुजाता म्‍हणाल्‍या की, महाराष्‍ट्रात तेलबिया पिकांच्‍या लागवडी करिता पोषक वातावरण असुन तेलबिया पिकांच्‍या मुल्‍यवर्धना करिता प्रयत्‍न करावे लागतील. करडई तेल मानवी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत गुणकारी  आहे. करडई बियाणेकरिता नवीन गोदाम निर्मिती मुळे विद्यापीठास दर्जेदार बियाणे साठवणुक शक्‍य होईल.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, करडई पिकांच्‍या विद्यापीठाने परभणी १२, शारदा, परभणी सुवर्णाआदी अनेक वाण विकसित केले आहेत. दोनशे मेट्रिक टन क्षमता असलेल्‍या नवीन गोदामामुळे विद्यापीठ विकसित करडई पिकांच्‍या बियाणाची साठवणुक करणे शक्‍य होईल. करडई पिकांत काढणीची मोठी समस्‍या असुन काढणीकरिता काढणी यंत्र विकसित करण्‍यावर भर दयावा लागेल.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एस बी घुगे यांनी केले, सुत्रसंचालन श्री ऋषिकेश औंढेकर यांनी केले तर आभार डॉ अरविंद पंडागळे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.