Sunday, March 13, 2022

सकारात्‍मक दृष्‍टीकोनच यशस्‍वी जीवनाचा पाया ....... प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षणात प्रतिपादन

व्‍यक्‍तीमत्‍त्‍व विकास म्‍हणजेचे अंतरंगात व बाहयरंगात सकारात्‍मक बदल होय. विद्यार्थ्‍यांनी आपले बलस्‍थान व कमकुवत बाजुचा अभ्‍यास करून आपले ध्‍येय निश्चित करावे. आपले आयुष्‍य हे आपल्‍या विचारांवर अवलंबुन असते. सकारात्‍मक दृष्‍टीकोनच यशस्‍वी जीवनाचा पाया आहे. विचारातील परिवर्तन केल्‍यास जीवनात परिवर्तन होते. आपल्‍यातील सकारात्‍मक ऊर्जाचा वापर विधायक कार्यासाठी करावा, असा सल्‍ला प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष आणि देशाच्‍या स्‍वांतत्र्याचा अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधुन परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत विद्यार्थ्‍यांकरिता व्‍यक्‍तीमत्‍व विकास आणि संवाद कौशल्‍य यावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक ११ व १२ मार्च रोजी आयोजन करण्‍यात आले होते, त्‍या प्रशिक्षणाच्‍या समारोपीय कार्यक्रमात अध्‍यक्षीय भाषणात  ते बोलत होते.

व्‍यासपीठावर प्रशिक्षक पुणे येथील कम्‍युनिकेअर ट्रेनिंग अॅण्‍ड कटेंट सोल्‍युशनचे संचालक प्रा कुशल राऊत, प्रा. संजीव राणे, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण, डॉ प्रविण कापसे, डॉ संतोष फुलारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्‍य प्र‍शिक्षक प्रा कुशल राऊत म्‍हणाले की, जीवनात अनेक चांगल्‍या संधी येतात, आलेल्‍या संधीचे सोने करण्‍या‍करिता आपण तयार राहीले पाहिजे. व्‍यक्‍तीमत्‍व विकासातील संवाद कौशल्‍य हा महत्‍वाचा घटक असुन जाणीवपुर्वक संवाद कौशल्‍य आत्‍मसाद करण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे.

कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, सदरिल दोन प्रशिक्षणामुळे आत्‍मविश्‍वासात वाढ झाली असुन भविष्‍यात याचा जीवनात सकारत्‍मक बदल घडुन आणण्‍यास मदत होईल.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ संतोष फुलारी यांनी केले. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन दोन सत्रात घेण्‍यात आले, पहिल्‍या सत्र दिनांक ९ व १० मार्च रोजी ६० अनुसुचित जातीच्‍या विद्यार्थी करीता आयोजित करण्‍यात आले होते, त्‍याचे उदघाटन किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ संजीव बंटेवाड यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.