देशातील १५ राज्यातुन वनामकृवित नवप्रवेशित विद्यार्थ्यांशी साधला कुलगुरू यांनी संवाद
भारत हा वैविध्यपुर्ण परंपरा जोपासलेला देश असुन राज्याराज्यानुसार परंपरा, खानपान, राहणीमान, भाषा यात विविधता दिसुन येते. दिवाळी, ओणम, ख्रिशमस यासारखे सण देशभर साजरे केले जातात, याच प्रमाणे परभणी कृषि विद्यापीठात इतर राज्यातील विविध सण महोत्सव विद्यार्थी मोठया उत्साहाने साजरे करतात. भारताची संस्कृती विविधनेने नटलेले असुन भारत विविधतेत एकता असलेला देश आहे. याच एकतेचे दर्शन म्हणजे परभणी कृषि विद्यापीठातही दिसुन येते, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी मुख्यालयी असलेल्या कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या माध्यमातुन देशातील १५ पेक्षा जास्त राज्यातील विद्यार्थी – विद्यार्थींनीनी सन २०२० व सन २०२१ मध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असुन करोना रोगाच्या प्रादुर्भाव नंतर विद्यापीठाचे नियमित वर्ग प्रारंभ झाले. या नवप्रवेशित विद्यार्थी – विद्यार्थीनीनी यांच्याशी दिनांक २१ मार्च रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी एका कार्यक्रमात संवाद साधला. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, प्राचार्या डॉ जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात विद्यापीठात साधारणत: दोनशे पेक्षा विद्यार्थी देशातील १५ पेक्षा जास्त राज्यातुन प्रवेशित झाले आहेत. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातुन आलेले असुन विविध परंपरा आणि भाषाची पार्श्वभुमी आहे. सदरिल विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असतातच तसेच क्रीडा व कला गुणांनी निपुण असतात. या विद्यार्थी पासुन महाराष्ट्रातील विद्यार्थी अनेक बाबी आत्मसात करतात, तसेच इतर राज्यातील विद्यार्थी अनेक चांगल्या बाबी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडुन शिकतात. यामुळे संस्कृतीचेही देवाणघेवाण होते, व्यक्तीमत्व विकासित होते. विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीसह क्रीडा व सांस्कृतिक विकासाकरिता विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करते. विद्यार्थ्यांना येणा-या शैक्षणिक अडजणीबाबत विद्यापीठ सजग असल्याचे सांगुन त्यांनी वि़द्यार्थीच्या विविध शैक्षणिक समस्या व अपेक्षा जाणुन घेतल्या.
यावेळी मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, विद्यापीठात सुसज्ज ग्रंथालय असुन सर्व प्रयोगशाळा अद्यायावत आहेत. विद्यापीठाने अनेक अधिकारी व शास्त्रज्ञ देशाला व राज्याला दिले असुन परभणी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी गेल्या तीन वर्षापासुन पदव्युत्तर सामाजिक पात्रता परिक्षेत आघाडीवर आहे. विद्यार्थीच्या व्यक्तीमत्व विकासावर महाविद्यालयात विशेष भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सय्यद ईस्माईल यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ प्रविण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.