वनामकृवित आयोजित ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च आयोजन करण्यात आले असुन दिनांक ११ मार्च रोजी “अन्नधान्य व भाजीपाला पिकांतील जैविक रोग व्यवस्थापनावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. अण्णासाहेब नवले यांच्या व्याख्यानाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण आपेट हे होते तर मौजे ढोकसाळ (ता. मंठा, जि. जालना) येथील प्रगतशिल शेतकरी श्री. बंडुनाना देशमुख, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. संतोष फुलारी, डॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. कल्याण आपेट म्हणाले की, हवामान बदलामुळे पीक वाढीच्या काळात विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असुन पिक उत्पादनात मोठी घट होत आहे. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन योग्य बियाण्याची निवड करणे, बीजप्रक्रिया करणे, जमिनीची मशागत करणे, जमिन स्वच्छ ठेवणे, तसेच फेरोमन ट्रॅपचा वापर, नायलॉन जाळी, आच्छादनांचा वापर करणे, तण काढणे, रोगट झाडे उपटुन नष्ट करणे आदी गोष्टींचा सेंद्रीय शेतीमध्ये अवलंब करण्याचा सल्ला देऊन निरोगी राष्ट्र भक्कम राष्ट्र निर्माण करण्यासाठी विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी जैवकांचा वापर करणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवानी जमीन व मानवी आरोग्य संवर्धनासाठी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे ते म्हणाले.
प्रमुख वक्ते डॉ. अण्णासाहेब नवले म्हणाले की, रासायनिक कीडनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यसामध्ये आढळत असून त्यांचे विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. परदेशातील कीडनाशक अवशेषाबाबतचे धोरण कडक असून असे अवशेष आढळल्यामुळे नाकारला जात आहे. एकात्मिक रोग व्यवस्थापन पध्दतीमध्ये पीक लागवडीपासून रोग व्यवस्थापनाच्या विधि पध्दतीचा योग्य प्रकारे वापर करुन पिकांचे आर्थिकदृष्टया नुकसानीच्या पातळीखाली ठेवण्यासाठी आवश्यक विविध घटकांच्या विषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.
प्रगतशील शेतकरी श्री. बंडुनाना देशमुख यांनी आपले सेंद्रिय शेतीमघील अनुभव कथन करतांना म्हणाले की, मी सेंद्रीय पध्दतीने द्राक्ष, व इरत फळ पीके घेतो. त्यासाठी विद्यापीठ निर्मित बायोमिक्सचा वापर केल्यामुळे द्राक्ष चांगल्या प्रतिची येतात व त्यास चांलगा बाजार भाव मिळतो.
प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मिनाक्षी पाटील तर आभार डॉ. श्रध्दा धुरगुडे यांनी म्हणले. डॉ. आनंद दौंडे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, सुनिल जावळे, सतिश कटारे, भागवत वाघ, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.