Sunday, March 20, 2022

नॅनो यूरीयाचा वापर करून पारंपारिक यूरीयाची खत मात्रा ५० टक्क्यानी कमी करणे शक्‍य ........ वनामकृविचे डॉ. गजानन गडदे

मौजे जांब येथे आयोजित पिक परिसंवाद कार्यक्रमात प्रतिपादन

शेतकरी विविध पिकामध्ये यूरीया खताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात, ज्यामुळे कालांतराने जमिनीची पोत खराब होते. याला पर्याय म्हणून बाजारामध्ये उपलब्ध असलेला नॅनो यूरीया हा अतिशय उपयुक्त असा खत असून याचे वापरण्याचे प्रमाण पारंपारिक युरीयाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. नॅनो यूरीयाची ५०० मिली ची एक बॉटल एक बॅग यूरीयाचे काम करते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी दिनांक १६ मार्च रोजी आयोजित मौजे जांब येथे पार पाडलेल्या पिक परिसंवाद कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी जिल्हा परिषद सदस्य श्री.बाळासाहेब रेंगे होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे, परभणी कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. अमित तुपे, सरपंच श्री.रामभाऊ रेंगे, उपसरपंच श्री. बंडू लाड, प्रगतशील शेतकरी श्री. संग्राम भैया, प्रतिष्ठीत नागरीक श्री. कल्याणरावजी रेंगे, इफको कंपनीचे श्री.अजय वाढे, आयपीएल कंपनीचे श्री.खर्चे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. गडदे पुढे म्‍हणाले की, नॅनो यूरीयाचा २ ते ४ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणे पिक ३० ते ३५ दिवसाचे असताना पहीली फवारणी व ५० ते ५५ दिवसाचे असतानी दुसरी फवारणी करावी. तसेच पारंपारिक यूरीया खताचा पहिला डोस लागवडीच्या वेळेस देणे गरजेचे आहे आणि लागवडीनंतर लागणा-या यूरीयाचा पुरवठा नॅनो यूरीयाच्या फवारणी व्दारे  करावे. याचाच अर्थ असा आहे की ५० टक्के पारंपारिक यूरीयाची मात्रा कमी करता येते. कार्यक्रमात उन्हाळी सोयाबीन, ऊस, मोसंबी आदि पिकांच्या बाबतीत खत व पाणी व्यवस्थापन बाबत डॉ.गडदे व डॉ. तुपे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास १०० पेक्षा जास्‍त शेतकरी उपस्थित होते.