Tuesday, March 8, 2022

वनामकृविच्‍या वतीने आंतरराष्‍ट्रीय शास्‍त्रज्ञांच्‍या उपस्थितीत साजरा करण्‍यात आला जागतिक महिला दिन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायीक विज्ञान महाविद्यालय आणि राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन ऑनलाईन पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपारानी देवतराज, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रमाच्‍या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील अॅड श्रीमती प्रज्ञा तळेकर या होत्‍या तर विशेष अतिथी मंडोर, जोधपूर (राजस्थान) येथील भा.कृ..प्र., .भा..सं.प्र. (बाजरी) प्रकल्‍पाच्‍या प्रकल्प समन्वयक डॉ. तारा सत्यवती सी., फ्रान्स मधील एफ.आय..आर. संस्‍थेच्‍या उपसंचालिका  डॉ. ग्वेन्डोलीन लिग्रँन, युक्रेन येथील युक्रेनियन इन्स्टिटयूट फॉर प्लॅन व्हरायटी एक्झामिनेशनाच्‍या  वरिष्ठ संशोधिका डॉ. ओरलॅन्को एन., अमेरीकेतील नासा शास्त्रज्ञा डॉ. अपर्णा फाळके, वाशिग्टंन स्टेट युनिर्वसिटीच्‍या प्राध्‍यापिका डॉ. सिंधुजा संकरण आदींनी सहभाग घेतला. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, समाजामधील कौंटुबिक हिंसाचार वाढु नये यासाठी सर्वानीच खबरदारी घेतली पाहिजे. कामकाजाच्या ठिकाणी महिला सुरक्षितता महत्वाची असुन शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन महिला ख-या अर्थाने आत्मनिर्भर होतील

तारा सत्यवती सी. यांनी “शाश्वत भविष्यासाठी कृषि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात लैंगिक समानता” या विषयावर मार्गदर्शन केले़. त्‍यांनी कुटुबांतुनच स्त्री-पुरुष समानतेचा धडा मिळायला हवा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. 

मुख्‍य वक्‍त्‍या अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी “कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना” या विषयावर मार्गदर्शन करून महिलाचे हक्क व कायदे याविषयी आपले विचार मांडलेयावेळी मार्गदर्शनात डॉ. ओरलॅन्को एन. या युक्रेनमधील वनस्पती प्रजनन या विभागात कार्यरत असुन त्यांनी सर्वासाठी शांततेचा संदेश देवून महिला दिनाच्या सर्व महिलानां सुभेच्छा दिल्या

कार्यक्रमात आंतरराष्‍ट्रीय शास्‍त्रज्ञा डॉ. अपर्णा फाळके, डॉ. ग्वेन्डोलीन लिग्रँन् आणि सिंधुजा सकंरण यांनी महिला व विद्यार्थींनीना प्रगती करण्यासाठी महिला सक्षमीकरण कसे महत्वाचे आहे व महिलानी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर करावा असे अवाहान केले

कार्यक्रमाचे मुख्‍य आयोजक सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ. जया बंगाळे आणि नोहप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. जया बंगाळे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. निता गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. गोदावरी पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजि. खेमचंद कापगाते, इंजि. रवी कुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, इंजि. अपुर्वा देशमुख, इंजि. धम्मज्योती पिपंळेकर, डॉ. श्वेता सोळंके, इंजि. संजीवनी कानवटे , मुक्ता शिंदे, जगदीश माने, गंगाधर जाधव, मारोती रणेर आदींनी परीश्रम घेतले.