Thursday, March 3, 2022

ज्‍वारी पिकांस पुर्नवैभव प्राप्‍त होईल ......... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवितील ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या वतीने आयोजित ज्‍वार महोत्‍सवात प्रतिपादन


काही दिवसापुर्वी ज्‍वारी हे दुर्लक्षित पिक होते, परंतु आज ज्‍वारीचे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने आहारातील महत्‍व लक्षात आल्‍या मुळे ज्‍वारीची मागणी वाढत आहे. ज्‍वारी पिक बदलत्‍या हवामानात तग धरणारे पिक आहे. ज्‍वारी व त्‍यांचे मुल्‍यवर्धीत पदार्थाकरिता हमखास बाजारपेठ व विक्री व्‍यवस्‍था निर्माण केल्‍यास ज्‍वारीला पुर्नवैभव प्राप्‍त होईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या ज्‍वार संशोधन केंद्रातील अखिल भारतीय समन्‍वयीत ज्‍वार सुधार प्रकल्‍पाच्‍या वतीने दिनांक ३ मार्च रोजी आयोजित ज्‍वार महोत्‍सवाच्‍या उदघाटन प्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, वरिष्‍ठ ज्‍वार पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ के आर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्र हे स्‍वातंत्र्यपुर्वी स्‍थापन झालेले राज्‍यातील सर्वात जुने संशोधन केंद्र असुन या केंद्राने अनेक चांगले रब्‍बी ज्‍वारी, खरीप ज्‍वारी आणि हुरडा पिकांची वाणे विकसित केले आहेत, तसेच ज्‍वार लागवड तंत्रज्ञान शिफारसी दिल्‍या आहेत. ज्‍वारी उत्‍पादक हे बहुतांशी लहान-मध्‍यम शेतकरी, कोरडवाहु शेतकरी, आदिवासी शेतकरी आदी समाजातील दुर्लक्षित घटक आहेत, त्‍यांच्‍या आर्थिक विकासाकरिता ज्वार संशोधन महत्‍वाचे आहे. आज संशोधनात अधिक उत्‍पादन देणा-या ज्‍वारीचे वाण निर्मितीसोबतच दर्जेदार ज्‍वारी, दर्जेदार कडबा, ज्‍वारीचे मुल्‍यवर्धनाच्‍या माध्‍यमातुन विविध पदार्थ तयार करण्‍याचे तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. ज्‍वारी पिकांची काढणी व मळणी करिता मजुरांवर मोठा खर्च करावा लागतो, त्याकरिता प्रभावी व सुलभ यंत्र विकसित करण्‍यावर भर दिला जात असल्‍याचे ते म्‍हणाले.

 

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, ज्‍वार महोत्‍सवात संशोधन केंद्राने विकसित केलेल्‍या रब्‍बी ज्‍वारी वाणांचे तसेच दहा विविध हुरडा वाणांचे ठिंबक सिंचनासह प्रात्‍यक्षिके आयोजित केली असुन ज्‍वार संग्रहलयात ज्‍वारी वरील किड व रोगाचे नमुने, ज्‍वारीपासुन विविध मुल्‍यवर्धीत पदार्थ आदीचे प्रदर्शन शेतकरी बांधवाना पाहाता येणार आहे. परिसरातील शेतकरी बांधवानी ज्‍वार संशोधन केंद्रास आर्वजुन भेट देण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

  

यावेळी प्रगतशील शेतकरी श्री मदन महाराज शिंदे, श्री संजय मासळकर यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात आदिवासी उपयोजने अंतर्गत मौजे वाळक्‍याची वाडी व गारगोट वाडी येथील आदिवासी शेतकरी गटांना मिर्ची कांडप, शेवाई मिशन, पापड मिशन, सायकल कोळपे, पेरणी यंत्र आदीसह विविध औजारांचे वाटप करण्‍यात आले. तसेच ज्‍वार संग्रहालयाचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ के आर कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ विक्रम घोळवे यांनी मानले. मौजे जाबं, ब्राम्‍हणगांव, उमरी, माडांखळी, वाळकयाची वाडी, गारगोठ वाडी आदीं गावांतील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. तसेच डॉ काळंपाडे (डॉ.पंदेकृवि, अकोला), डॉ डी डी दुधाडे (मफुकृवि, राहुरी), डॉ गोपाल ठोकरे, प्रशांत पवार, डॉ लक्ष्‍मण जावळे, डॉ मोहम्‍मद ईलियास, डॉ व्‍ही एम घोळवे आदींसह विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.