कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित “कृषी प्रक्रीयेद्वारे उद्योजगता विकास” या तीन दिवसीय प्रशिक्षणात प्रतिपादन
परभणी कृषी विद्यापीठाने अधिक लोह आणि झिंक युक्त ज्वारी आणि
बाजरी यांच्या जाती संशोधित केलेल्या आहे. जे विकेल ते पिकविणे अत्यंत गरजेचे आहे.
मराठवाडा विभागात सोयबीन प्रक्रिया, डाळ मिल, तृणधान्य प्रक्रिया आणि मुल्यवर्धन
यासाठी मोठा वाव असुन यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द, सातत्य, आत्मविश्वास आणि
परिश्रम यांची गरज असल्याचे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर
यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या
वतीने दिनांक 28 ते 30 मार्च दरम्यान आयोजित “कृषी प्रक्रीयेद्वारे उद्योजगता
विकास” या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर
नांदेड येथील सर्वज्ञ हर्बल न्यूटरासीटीकल प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष उद्योजक डॉ.
कन्हैय्या कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, प्रशिक्षण आयोजक कृषी प्रक्रिया
अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ स्मिता खोडके आदीची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनपर भाषणात डॉ. कन्हैया कदम यांनी आरोग्य आणि
अर्थकारण या दोन्ही विषयांचा समतोल फ़क़्त योग्य प्रकारच्या शेती उत्पादित घटक व
त्यांच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. शेतमालावर योग्य प्रकारची प्रक्रिया करून
समाजास पोषणयुक्त उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हर्बल
औषधांच्या माध्यमातून विविध दुर्धर आजारांसाठी आयुर्वेद शास्त्राच्या आधारे रसायन
व विषविरहित उत्पादने उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल,
असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्हणाले
की, कृषी क्षेत्रात कृषी अभियांत्रिकीचे अनन्य साधारण महत्व असून कृषी मालावर
प्रक्रिया करून मुल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. कृषीमाल
प्रक्रियेवर आधारित छोटे छोटे उद्योग उभारण्यास मोठ्या संधी असुन शासन देखिल अन्नप्रक्रिया
उद्योगावर प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात डॉ. स्मिता खोडके यांनी प्रशिक्षणा मागील
भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले तर आभार
प्रदर्शन प्रा. प्रमोदिनी मोरे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी,
विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. श्याम गरुड, शंकर शिवणकर, हेमंत रुपनर, निल्झा ओझेस,
शलाका कलमनुरीकर, तेस्वीविनी कुमावत, सीमा आखाडे, पल्लवी वैद्य, रचना जाधव, आदित्य
खिस्ते, माउली खातिंग, रीन्केश जाधव आदींनी परिश्रम घेतले.
सदरिल तीन दिवसीय प्रशिक्षण भारतीय कृषी अनुसंधान परिषद,
नवी दिल्ली यांचे अर्थसहाय्याने अनुसूचित जाती या प्रवर्गातील व्यक्तींसाठी आयोजित
केलेले असून यामध्ये विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रशिक्षणार्थी
सहभागी झालेले आहेत. तांत्रिक मार्गदर्शनासोबतच वित्त पुरवठा, प्रकल्प अहवाल तयार
करणे, प्रक्रिया उद्योगाची उभारणी आदी विषयावर या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात
येणार आहे.