Saturday, November 22, 2025

नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांना परभणीत उत्साहात सुरुवात; वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते क्रीडा ज्योती प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन

 



पोलीस मुख्यालय, परभणी येथे ३० वी नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना मानवंदना दिली. त्यानंतर मशालधारकांच्या संचलनाने सोहळ्यास सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे पुष्पवृक्ष देऊन स्वागत केले. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते क्रीडा ज्योती प्रज्वलित करण्यात आली तसेच खेळाडूंची शपथ घेतली गेली.

या स्पर्धेत परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी-खेळाडूंच्या संघांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धा २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणार असून एकूण १९ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी खेळाच्या महत्त्वावर भर देताना सांगितले की, खेळ हा केवळ विरंगुळा नसून जीवनशैली घडवणारा संस्कार आहे. दैनंदिन कामाचा ताण कमी करण्यासाठी, शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी क्रीडा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, दवाखान्यापासून दूर राहायचे असेल तर नियमित व्यायाम, सकस आहार आणि कमीतकमी एका खेळाचा छंद मनापासून जोपासणे गरजेचे आहे. मानसिक चपळता, संघभावना, निर्णयक्षमता आणि शिस्त यांसारख्या गुणांचा विकास खेळातून होतो, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत खेळासाठी निश्चित वेळ राखून ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी पोलीस दलातील खेळाडूंच्या जिद्द, शिस्त आणि समर्पणाचे विशेष कौतुक करून उत्तम क्रीडापरंपरेद्वारे परिक्षेत्राचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक माननीय श्री. रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुंजाळ यांनीही सर्व खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन सत्रानंतर विविध क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली.

कार्यक्रमास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. जीवन बेणीवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) श्री. डंबाळे, परभणी ग्रामीणचे अधिकारी श्री. चंद्रशेखर देशमुख, पूर्णा विभागाचे श्री. समाधान पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. अनिरुद्ध काकडे तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी व मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.

उद्घाटनानंतर प्रथम पोलीस अधिकारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांमध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला. या सामन्यात पोलीस अधिकारी संघाने विजय मिळवला. या सामन्यात पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी यांनी तीन चौकारांसह २८ धावा केल्या, तर अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुंजाळ यांनी चार षटकार व दोन चौकारांसह ३८ धावा करत उल्लेखनीय कामगिरी केली.

या भव्य क्रीडा स्पर्धांमुळे चारही जिल्ह्यांतील पोलिस दलांमध्ये स्नेह, एकता आणि क्रीडा आत्मा बळकट होत असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.





Friday, November 21, 2025

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत उत्तम नागरिकत्व जपावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, गोळेगाव (ता. औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली) येथे सन २०२५-२६ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ शिवाजी शिंदे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता उत्तम आहार, चांगले आरोग्य, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि नैतिक मूल्यांसह सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी अभ्यासू, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडणे अत्यावश्यक असून, त्या दिशेने प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा, ग्रामीण कृषी समस्यांचे अध्ययन करून अभिनव उपाय शोधण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले. यानंतर माननीय कुलगुरूंच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रतीकात्मक स्वागत करण्यात आले.

आपल्या मनोगतात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मुळे कौशल्याधारित शिक्षण व मूल्याधिष्ठित शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे. कृषि क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान, स्टार्टअप्स, उद्योजकता आणि संशोधनाच्या संधींचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकतात. कृषि क्षेत्रातील ड्रोन टेक्नॉलॉजी, प्रिसिजन फार्मिंग, जलसंवर्धन पद्धती आणि नैसर्गिक शेतीतील संधी यांचीही त्यांनी माहिती दिली.

प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी नव्या उपक्रमांना प्रारंभ करण्यात येणार आहे. महाविद्यालय विद्यार्थी-केंद्रित, अभ्यासू तसेच प्रेरणादायी वातावरण घडविण्यास कटिबद्ध आहे.

नवप्रवेशित विद्यार्थी दुर्गा कल्याणकर व अस्मिता भालेराव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महाविद्यालयीन वातावरण, अध्यापन पद्धती आणि उपलब्ध सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शंकर नरवाडे, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. दशरथ सारंग, डॉ. राहुल भालेराव, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. पुंडलीक वाघमारे, डॉ. राजेंद्र जाधव, प्रा. वैशाली बास्टेवाड, प्रा. ज्योती गायकवाड, डॉ. डी. पी. देशपांडे, अधिकारी श्री. प्रवीण दंडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन ज्योती देवकर व महेश भुजबळ यांनी केले. वैभव कौशल्ये यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. एस. एम. ताटके, श्री. शेख सलीम, श्री. जी. एन. नाईक, श्री. सी. एल. ताटीकोंडलवार, श्री. एस. डी. आडे, श्री. बी. आर. खुडे, श्री. एम. डी. गुव्हाडे, श्री. बी. एम. खुडे, श्री. पी. बी. हंबर्डे, श्री. यु. बी. खटींग, श्री. जी. ए. जाधव, श्रीमती एम. एस. भिसे, श्रीमती आर. पी. बुरकुळे तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.







Wednesday, November 19, 2025

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात उत्साहात संपन्न

 

भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते “पी. एम. किसान सन्मान निधी” योजनेअंतर्गत २१ व्या हप्त्याचे थेट लाभ हस्तांतरण दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तामिळनाडू राज्यातील कोयंबतूर येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना एकूण १८,००० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. यावेळी माननीय पंतप्रधानांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अनुभव आणि यशोगाथा जाणून घेतल्या. तसेच त्यांनी कृषी उत्पादने, विविध पिकांचे नमुने, नवनवीन शेती तंत्रज्ञान आणि कृषी यंत्रसामग्रीचे प्रदर्शन पाहून तेथील नवोन्मेषी उपक्रमांचे कौतुक केले. देशाला संबोधित करताना माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भविष्यातील शाश्वत कृषी विकासासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. आपल्या मातीतली सुपीकता टिकवण्यासाठी, पिकांची गुणवत्ता आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे विद्यापीठाच्या सिम्पोसियम हॉल (हॉल क्र. १८) मध्ये आयोजित करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री. ए. एस. घोडके यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या प्रेरणादायी भाषणाचा लाभ विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच उपस्थित मान्यवरांनी थेट प्रक्षेपणाद्वारे घेतला.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, शेतकऱ्यांकडे श्रम, परिश्रम आणि मातीवरचे निस्सीम प्रेम सर्व काही असते; परंतु आर्थिक मर्यादा मात्र नेहमीच भेडसावत असतात. अशा वेळी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरतो. पुढे ते म्हणाले की, शुद्ध आणि गुणवत्तायुक्त बियाण्यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे. बियाण्यातील फसवणूक टाळण्यासाठी देशपातळीवर कठोर उपाययोजना लागू करण्यात येत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ शुद्ध, प्रमाणित आणि विश्वासार्ह बियाणेच उपलब्ध होतील. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री. आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे नुकतीच नैसर्गिक शेती परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेतून बियाणे ते विक्रीपर्यंत नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक धोरणे आणि कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नैसर्गिक शेतीमध्ये बीजामृत, जीवामृत, आच्छादन यांसारख्या घटकांवर विशेष भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीतून शाश्वत, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत असल्याचे या परिषदेतील विविध अनुभवांमधून स्पष्ट झाले आहे. मात्र, यासाठी परंपरागत शेतीपद्धतीत काही बदल आवश्यक असून, शेतकऱ्यांनी यासाठी थोडा वेळ आणि प्रयत्न देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यापीठ ‘शेतकरी प्रथम’ या भावनेतून कार्यरत आहे. ‘शेतकरी देवो भवः’ ही वृत्ती अंगीकारून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नैसर्गिक शेतीची तत्त्वे आत्मसात करण्यासाठी नियमित मार्गदर्शन पुरविण्यात येत आहे. यावेळी कुलगुरूंनी शेतीतील नैसर्गिकरीत्या उपलब्ध साधन-सामग्रीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही केले. आज आपण विषमुक्त शेतीच्या संकल्पनेवर कार्य करत आहोत; मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यांना ‘कर्जमुक्त शेती’ करण्यासही चालना देणे तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच कृषि विभागातील अधिकारी आणि प्रगतशील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त वनामकृवितर्फे भव्य ‘एकता पदयात्रा’ संपन्न

 देश प्रथम ही भावना मनामनात रुजविणे हीच खरी राष्ट्रसेवा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, एनएसएस व एनसीसी  आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत (माय भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता विद्यापीठाच्या शेतकरी भवन मैदान येथून  वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत एकता पदयात्रा निघाली. या पदयात्रेसाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा (डॉ) इन्द मणि आणि माननीय जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पदयात्रेस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ राजेश कदम, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी श्री. शशांक रावुला, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे, जिल्हा माहिती अधिकारी श्री प्रमोद धोंडगे, उपशिक्षणाधिकारी श्री गोविंद मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, एकतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. जाती-धर्म, प्रदेश किंवा भाषा यापेक्षा वर जाऊन आपण सर्वप्रथम भारतीय आहोत” ही शिकवण त्यांनी देशाला दिली. त्यांनी पुढे म्हटले की, देशाबद्दल अभिमान व गर्व बाळगणे ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. ज्यांच्या मनात राष्ट्राभिमान नाही, ते जणू जिवंत असूनही मृत समान आहेत,” असे सार्थ उद्गारही त्यांनी व्यक्त केले.

माननीय कुलगुरूंनी हेही नमूद केले की, अखंड भारताची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरदार पटेल यांनी केलेले अद्वितीय राष्ट्रनिर्माणकार्य आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. देश प्रथम ही भावना मनामनात रोवण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या आदर्शांवर चालणे ही खरी देशसेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण आपल्या मनोगतात म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ भारताचे लोहपुरुष नव्हते, तर अत्यंत दक्ष, दूरदर्शी आणि बॅरिस्टर म्हणून घडलेले मोठे  व्यक्तिमत्व होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व इतके उत्कृष्ट होते की, लॉर्ड माउंटबॅटन यांच्यापेक्षाही ते अधिक प्रभावी संवादक होते, हे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, जिद्दीचे आणि कार्यतत्परतेचे अनुकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. इंग्रजी ही जागतिक भाषा असून, भावी प्रगत भारतात स्पर्धात्मक राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ती मनापासून आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. यापुढे ते म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात तसेच भारतातील संस्थानांच्या विलीनीकरणासाठी सरदार पटेल यांनी केलेले अद्वितीय कार्य आहे. त्यांच्या धैर्यपूर्ण निर्णयांनी राष्ट्र एकसंघ झाले, आणि त्या प्रेरणेने आजची तरुण पिढीही देश बांधणीच्या कार्यात सक्रिय व्हावी, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजच्या पदयात्रेच्या माध्यमातून समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी ‘एकता’ हा मंत्र प्रत्येकाने अंगीकारावा, असे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. देशाचा विकास हा आपल्या वैयक्तिक विकासावर अवलंबून आहे, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होत परिश्रमांची तयारी ठेवावी, असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.

 

यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची आणि आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश शिंदे यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी मानले. या पदयात्रेत विद्यापीठाच्या एनसीसी चे आणि सर्व महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थी यांच्यासह शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

 





Tuesday, November 18, 2025

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या रावे उपक्रमाला इंदेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

 महिला सक्षमीकरणासाठी महाविद्यालयाचे तंत्रज्ञान उपयुक्त – सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉ. राहुल रामटेके

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मौजे  इंदेवाडी (ता. जि. परभणी) येथे भव्य शेतकरी मेळावा व तंत्रज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. राहुल रामटेके यांनी भूषविले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदेवाडीचे सरपंच श्री. अशोक कच्छवे उपस्थित होते. व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉ. राहुल रामटेके यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले की, महाविद्यालयाने विकसित केलेले अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान गावातील महिलांनी अवलंबल्यास त्या ‘चूल आणि मूल’ पलीकडे जाऊन स्वावलंबी बनू शकतील. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या स्वयंरोजगार उभारू शकतील आणि आपल्या कुटुंबाचा मजबूत आधार बनू शकतील. महिला हा कुटुंबाचा कणा असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच कुटुंबाची जडणघडण घडत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना हसत–खेळत कौशल्यविकासाचे आणि ज्ञानाचे धडे दिले. या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य, आकाश कंदील आदी साहित्य तयार करण्याची कला आत्मसात केली. या कार्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विकसित केलेल्या ‘महाविस्तार ॲप’ चे महत्त्व अधोरेखित करीत त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यापीठातील विविध तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांसाठी कशी उपयुक्त ठरू शकतात, याचेही त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. नीता गायकवाड यांनी महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प अंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या विविध श्रम बचत उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून सविस्तर माहिती दिली. या साधनांचा वापर केल्यास महिलांच्या दैनंदिन शेतीकामातील कष्ट कमी होऊन कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. वीणा भालेराव यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांची माहिती देताना विद्यार्थ्यांनी या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास मिळणाऱ्या कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगारसंधी आणि संशोधनाच्या संधींचे महत्व विशद केले. आधुनिक युगातील घरव्यवस्थापन, पोषण, वस्त्रनिर्मिती, बालविकास आणि विस्तार शिक्षण या क्षेत्रांमध्ये या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतात, असे त्यांनी सांगितले.

डॉ. शंकर पुरी यांनी मागील दोन महिन्यांपासून या उपक्रमाला मिळालेल्या ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाचे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, अंगणवाडी केंद्रे, शैक्षणिक संस्था व विविध शासकीय कार्यालयांकडून मिळालेल्या मोलाच्या सहकार्याचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी गावात राबविलेल्या सर्वेक्षण, जनजागृती, आरोग्य व पोषण प्रचार उपक्रमांना मिळालेला प्रतिसाद अत्यंत उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश कच्छवे आणि श्री. बालाजी बिरादार यांनी प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांनी मागील दोन महिन्यांत गावात पोहोचविलेल्या विविध तंत्रज्ञानाची तसेच त्यांनी केलेल्या परिश्रमांची मनापासून प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आधुनिक पद्धतींचे ज्ञान थेट घर आणि शेतात उतरले आहे. उत्पादन खर्च कमी होणे, मेहनत व वेळ वाचणे, तसेच घरकामासह पिकांची गुणवत्ता सुधारण्यास या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ होत आहे.

रावे उपक्रमास इंदेवाडी येथील सरपंच श्री. अशोक कच्छवे, ग्रामसेवक श्री. हनुमान कच्छवे, प्रगतशील शेतकरी श्री. शिवाजीराव कच्छवे, श्री. संजय सिसोदिया श्री. माधवराव कच्छवे, श्री.बन्सीधर लाड, ग्रामस्त,  जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रल्हाद जाधव, शिक्षक श्री. रामेश्वर वाघ, श्री. बाबर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम समन्वयक (रावे) तथा विभाग प्रमुख डॉ शंकर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या सर्व ग्रामकन्या व ग्रामदूत (रावे विद्यार्थी) यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने मेळावा अधिक प्रभावी झाला.