Saturday, November 22, 2025

नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांना परभणीत उत्साहात सुरुवात; वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते क्रीडा ज्योती प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन

 



पोलीस मुख्यालय, परभणी येथे ३० वी नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना मानवंदना दिली. त्यानंतर मशालधारकांच्या संचलनाने सोहळ्यास सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे पुष्पवृक्ष देऊन स्वागत केले. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते क्रीडा ज्योती प्रज्वलित करण्यात आली तसेच खेळाडूंची शपथ घेतली गेली.

या स्पर्धेत परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी-खेळाडूंच्या संघांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धा २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणार असून एकूण १९ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी खेळाच्या महत्त्वावर भर देताना सांगितले की, खेळ हा केवळ विरंगुळा नसून जीवनशैली घडवणारा संस्कार आहे. दैनंदिन कामाचा ताण कमी करण्यासाठी, शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी क्रीडा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, दवाखान्यापासून दूर राहायचे असेल तर नियमित व्यायाम, सकस आहार आणि कमीतकमी एका खेळाचा छंद मनापासून जोपासणे गरजेचे आहे. मानसिक चपळता, संघभावना, निर्णयक्षमता आणि शिस्त यांसारख्या गुणांचा विकास खेळातून होतो, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत खेळासाठी निश्चित वेळ राखून ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी पोलीस दलातील खेळाडूंच्या जिद्द, शिस्त आणि समर्पणाचे विशेष कौतुक करून उत्तम क्रीडापरंपरेद्वारे परिक्षेत्राचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक माननीय श्री. रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुंजाळ यांनीही सर्व खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन सत्रानंतर विविध क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली.

कार्यक्रमास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. जीवन बेणीवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) श्री. डंबाळे, परभणी ग्रामीणचे अधिकारी श्री. चंद्रशेखर देशमुख, पूर्णा विभागाचे श्री. समाधान पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. अनिरुद्ध काकडे तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी व मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.

उद्घाटनानंतर प्रथम पोलीस अधिकारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांमध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला. या सामन्यात पोलीस अधिकारी संघाने विजय मिळवला. या सामन्यात पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी यांनी तीन चौकारांसह २८ धावा केल्या, तर अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुंजाळ यांनी चार षटकार व दोन चौकारांसह ३८ धावा करत उल्लेखनीय कामगिरी केली.

या भव्य क्रीडा स्पर्धांमुळे चारही जिल्ह्यांतील पोलिस दलांमध्ये स्नेह, एकता आणि क्रीडा आत्मा बळकट होत असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.