देश प्रथम ही भावना मनामनात रुजविणे हीच खरी राष्ट्रसेवा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, एनएसएस व एनसीसी आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत (माय भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता विद्यापीठाच्या शेतकरी भवन मैदान येथून वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत एकता पदयात्रा निघाली. या पदयात्रेसाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा (डॉ) इन्द मणि आणि माननीय जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पदयात्रेस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ राजेश कदम, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी श्री. शशांक रावुला, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे, जिल्हा माहिती अधिकारी श्री प्रमोद धोंडगे, उपशिक्षणाधिकारी श्री गोविंद मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या प्रेरणादायी
भाषणात सांगितले की, एकतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे
सरदार वल्लभभाई पटेल. जाती-धर्म, प्रदेश
किंवा भाषा यापेक्षा वर जाऊन “आपण सर्वप्रथम भारतीय आहोत” ही
शिकवण त्यांनी देशाला दिली. त्यांनी पुढे म्हटले की, देशाबद्दल
अभिमान व गर्व बाळगणे ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. “ज्यांच्या मनात राष्ट्राभिमान नाही, ते जणू जिवंत
असूनही मृत समान आहेत,” असे सार्थ उद्गारही त्यांनी व्यक्त
केले.
माननीय कुलगुरूंनी हेही नमूद केले की, अखंड भारताची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरदार पटेल
यांनी केलेले अद्वितीय राष्ट्रनिर्माणकार्य आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी
आहे. देश प्रथम ही भावना मनामनात रोवण्यासाठी त्यांचे योगदान
अमूल्य असून, त्यांच्या आदर्शांवर चालणे ही खरी देशसेवा
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण आपल्या मनोगतात म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ भारताचे लोहपुरुष नव्हते,
तर अत्यंत दक्ष, दूरदर्शी आणि बॅरिस्टर म्हणून
घडलेले मोठे व्यक्तिमत्व होते. त्यांचे
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व इतके उत्कृष्ट होते की, लॉर्ड
माउंटबॅटन यांच्यापेक्षाही ते अधिक प्रभावी संवादक होते, हे
त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे,
जिद्दीचे आणि कार्यतत्परतेचे अनुकरण करावे, असे
आवाहनही त्यांनी केले. इंग्रजी ही जागतिक भाषा असून, भावी
प्रगत भारतात स्पर्धात्मक राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ती मनापासून
आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. यापुढे
ते म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात तसेच भारतातील
संस्थानांच्या विलीनीकरणासाठी सरदार पटेल यांनी केलेले अद्वितीय कार्य आहे. त्यांच्या
धैर्यपूर्ण निर्णयांनी राष्ट्र एकसंघ झाले, आणि त्या
प्रेरणेने आजची तरुण पिढीही देश बांधणीच्या कार्यात सक्रिय व्हावी, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजच्या पदयात्रेच्या माध्यमातून समृद्ध,
सशक्त आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी ‘एकता’ हा मंत्र
प्रत्येकाने अंगीकारावा, असे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी
स्पष्ट केले. देशाचा विकास हा आपल्या वैयक्तिक विकासावर अवलंबून आहे, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मानसिक, शारीरिक आणि
भावनिकदृष्ट्या सक्षम होत परिश्रमांची तयारी ठेवावी, असे आवाहन
करून त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची आणि आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश शिंदे यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी मानले. या पदयात्रेत विद्यापीठाच्या एनसीसी चे आणि सर्व महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थी यांच्यासह शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.


.jpeg)


.jpeg)

.jpeg)