Thursday, February 14, 2019

वनामकृवितील एलपीपी स्कूलचे विद्यार्थी गोल्डन व सिल्व्हर स्टार्स प्रमाणपत्राने सन्मानित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सामूदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व अभ्यास विभागाच्‍या एलपीपी स्कूल मधील अत्‍युत्‍कृष्‍ट ठरलेल्‍या विद्यार्थ्‍यांना गोल्डन स्टार प्रमाणपत्र तर उत्कृष्‍ट ठरलेल्‍या विद्यार्थ्‍यांना सिल्व्हर स्टार प्रमाणपत्र देऊन विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्‍यात आले. दर्जेदार बालशिक्षण देणारे एलपीपी स्कूलमध्ये विद्यार्थी तथा त्यांच्या पालकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बालविकास शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी एलपीपी स्कूलमधील जे विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या सर्व घटकांच्या मूल्यमापनात म्हणजेच त्यांच्या शारीरिक, क्रियात्मक, बौध्दिक, वाचा, भाषा, सामाजिक, भावनात्मक व नैतिक विकास तथा त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाशी निगडीत क्षमतांसाठी अत्‍युत्‍कृष्‍ट ठरले त्यांना गोल्डन स्टार प्रमाणपत्र तर जे विद्यार्थी उत्कृष्‍ट होते त्यांना सिल्व्हर स्टार प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. एलपीपी स्कूलमधील एकूण 125 विद्यार्थ्‍यांपैकी 63 विद्यार्थ्‍यांना गोल्डन स्टार आणि 62 विद्यार्थ्‍यांना सिल्व्हर स्टार प्राप्त झाले. पालकांना त्यांच्या पाल्याचा उच्चतम सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने गत चार वर्षापासून एलपीपी स्कूलमध्ये हा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्‍यात येतो. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मानव विकास विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Wednesday, February 13, 2019

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात शिवजयंती महोत्‍सवानिमित्‍त रक्‍तदान शिबिर संपन्‍न

एकुण 105 विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यीनी व प्राध्‍यापकांनी केले रक्‍तदान
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने शिवजयंती महोत्‍सवानिमित्‍त दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. रक्‍तदान शिबिराचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, यावेळी व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, वैद्यकिय अधिकारी डॉ सुब्‍बाराव, रक्‍त संक्रमण अधिकारी डॉ कनकदंडे, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ आर पी कदम आदींची प्रमुख उ‍पस्थिती होती. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, रक्‍तदान हे श्रेष्‍ठदान असुन सामाजिक बांधीलकी म्‍हणुन महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यीनी केलेले योगदान निश्चितच कौतुकास्‍पद आहे. शिबिरात 105 विद्यार्थ्‍या-विद्यार्थ्‍यीनी व प्राध्‍यापकांनी रक्‍तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाघमारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी छात्रसेना अधिकारी डॉ ए बी बागडे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ व्हि बी जाधव, डॉ पी एच गौरखेडे आदींच्‍या मार्गदर्शनाखाली राष्‍ट्रीय छात्रसेना योजना व राष्‍ट्रीय सेवा योजनेचे छात्रसैनिक व स्‍वयंसेवक तसेच शिवजयंती महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष आकाश थिटे, उपाध्‍यक्ष आकाश चव्‍हाण, सचिव विशाल राख व सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

मौजे उजळंबा येथील राजाभाऊ रगड यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार

मोजे उजळंबा येथील प्रगतीशील शेतकरी श्री. राजाभाऊ रगड यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत असलेल्‍या हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था यांचे वतीने उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने मौजे उजळंबा या गावात हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम प्रकल्प मागील दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे. श्री. राजाभाऊ रगड यांनी हवामान बदलानुरुप परिस्थितीत अनुकूल कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांच्या शेतावर करून शेतीत शाश्‍वत उत्‍पादन मिळविले. यात शेततळ्यात पावसाचे पाणी साठवून त्याचा कार्यक्षम वापर पिकाचे उत्पादन वाढीसाठी करणे, कोरडवाहू फळपिके लागवड जसे पेरु, सिताफळ यांची लागवड, विद्यापीठ विकसित सोयाबीन पिकाचे सुधारित वाण लागवड, आंतरपीक पध्दती, रुंद वरंबा सरी पध्दतीने सोयाबीन लागवड अशा विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करून कोरडवाहू शेतीत शाश्‍वत उत्‍पादन मिळविले, याबाबत त्‍याचा पुरस्‍कार देऊन गौरव करण्‍यात आला.
कोरडवाहु शेतीतील विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके यांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले. सदरिल पुरस्कार संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या हस्ते प्रदान करण्‍यात आला. यावेळी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, डॉ शिवाजी म्‍हेत्रे, डॉ अशोक जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

Friday, February 1, 2019

औरगांबाद येथे आयोजित राज्यस्तरिय कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचे विधानसभेचे अध्यक्ष मा ना. श्री हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उदघाटन

दिनांक 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान वनामकृवि अतंर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय परिसरात क्षेत्रीय पिक प्रात्‍यक्षिक व प्रदर्शनीचे आयोजन

औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाअॅग्रो यांच्या माध्यमातून दिनांक 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद येथील पैठण रोड वरील कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय परिसरात कृषि प्रदर्शन, क्षेत्रीय पीक प्रात्‍यक्षिक आणि चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 1 फेब्रुवारी रोजी महाराष्‍ट्र राज्‍य विधानसभाचे अध्यक्ष मा ना श्री हरिभाऊजी बागडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. व्यासपीठावर कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, औरंगाबाद मनपाचे महापौर मा. श्री नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा मा अॅड देवयाणीताई डोणगांवकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा आमदार मा. श्री सतिशभाऊ चव्हाण, मराठवाडा विकास वैधानिक मंडळाचे अध्यक्ष श्री भागवत कराड, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगाले, प्रगतशील शेतरकरी श्री विजयअण्णा बोराडे, महाअॅग्रोचे मुख्‍य समन्‍वयक अॅड वसंतराव देशमुख, संशोधन सहसंचालक डॉ सुर्यकांत पवार, प्राचार्य डॉ किरण जाधव, प्रा सौ दिप्ती पाटगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात विधानसभेचे अध्यक्ष मा ना. श्री हरिभाऊ बागडे म्हणाले की, मराठवाडयात मागील कित्येक वर्षापासून पाऊस हा कमी-अधिक प्रमाणात पडत असुन भुगर्भातील पाण्‍याचा होणारा उपसा चिंताजनक आहे. शेतीमध्‍ये पाण्‍याचा कार्यक्षम वापर करावा लागेल. दिवसेंदिवस जमिनीचे भाऊ हिस्से वाढत आहे, शेतक-यांचे जमिनधारण क्षेत्र कमीकमी होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या आधारे कमी क्षेत्रावरही शेतीत चांगले उत्‍पादन घेऊ शकतो. शेतक-यांनी विविध पिक पध्‍दतीचा अवलंब करून नवनवीन प्रयोग आपल्‍या शेतीत करण्‍याचा सल्लाही त्‍यांनी दिला.
कुलगुरु मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, कृषि प्रदर्शन हे कृषि तंत्रज्ञान प्रसाराचे मोठे माध्यम आहे, या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान प्रभावीरित्या शेतक-यांसमोर मांडता येते. प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्‍या विविध पिक प्रात्‍यक्षिक हे शेतकरी बांधवासाठी दिशादर्शक ठरतात. चर्चासत्रातुन कृषि शास्‍त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद साधता येतो. बदलत्या हवामानामुळे शेती प्रश्न उग्ररुप धारण करीत असुन बदलत्‍या हवामानास अनुकूल विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवानी अवलंब करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.
श्री विजयआण्णा बोराडे यांनी कृषि प्रदर्शन आणि चर्चासत्राच्‍या माध्‍यमातुन शेतकरी बांधव एकत्र येवून तंत्रज्ञान देवाण-घेवाण करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकात अॅड वसंतराव देशमूख यांनी कुलगुरु मा. डॉ अशोक ढवण व कृषि विद्यापीठाच्या सर्वच घटकांनी दिलेले सहकार्यामुळे क्षेत्रीय पिक प्रात्यक्षिक यशस्‍वीरित्‍या घेण्‍यात येऊन याचा निश्चितच लाभ शेतक-यांना होणार असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमात मराठवाडयातील विविध पिकांमध्ये विक्रमी उत्‍पादन घेणा-यां शेतक-यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची आखणी श्री प्रकाशजी उगले यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री साठे यांनी केले तर आभार डॉ किरण जाधव यांनी मानले. चार दिवस चालणा-या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय परिसरात विद्यापीठ व खाजगी कंपन्‍या विकसित विविध पिकांचे वाणांचे व तंत्रज्ञानाचे क्षेत्रीय पिक प्रात्‍यक्षिक घेण्‍यात आले असुन शेतकरी बचत गट निर्मित विविध पदार्थ विक्रीची दालनाचा समावेश प्रदर्शनीत आहे. कार्यक्रमास मराठवाडयातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

सौजन्‍य
श्री रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद

Wednesday, January 30, 2019

कृषि विद्यापीठ तंत्रज्ञानाचे खंद्दे प्रचारक प्रगतशील शेतकरी कै शहाजीराव गोरे यांना भावपुर्ण श्रध्‍दांजली

उस्‍मानाबाद जिल्‍हयातील मौजे गोरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी शहाजीराव संभाजीराव गोरे यांचे मुंबई येथे दिनांक २९ जानेवारी रोजी अल्‍पशा आजाराने दु:खद निधन झाले. कृषि विद्यापीठ विकसित विविध कृषि तंत्रज्ञानाचा ते स्‍वत: च्‍या शेतीत अवलंब करून चांगले उत्‍पादन काढीत असत, तसेच त्‍यांच्‍या कृषि ज्ञानाचा फायदा परिसरातील इतर शेतकरी मोठया प्रमाणात घेत असत. ते परिसरातील इतर शेतक-यांसाठी शेती उत्‍पादन वाढविण्‍यासाठी सातत्‍याने मार्गदर्शन व प्रोत्‍साहित करित असत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कार्यकारी परिषदेचे ते माजी सदस्‍य होते, त्‍यांना १९९४ मध्‍ये महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने शेतीमित्र पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले आहे. ते आंबेडकर कारखान्‍याचे चेअरमन अरविंददादा गोरे यांचे लहान बंधु होत. कृषि विद्यापीठ तंत्रज्ञानाचा एक खंद्दे प्रचारक व पुरस्‍कर्ते विद्यापीठाने गमवला असल्‍याचे भावना शब्‍दात व्‍यक्‍त करून कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या वतीने त्‍यांना भावपुर्ण श्रध्‍दांजली वाहली.



संग्रहित छायाचित्र
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाचे कुलगुरूपद स्‍वीकारल्‍या नंतर कै शहाजीराव गोरे यांची मौजे गोरेवाडी येथे जाऊन भेट घेतली असता जनसामान्‍यात व शेतक-यांमध्‍ये कृषि विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्‍यासाठी अनेक सुचना त्‍यांनी केल्‍या.

Tuesday, January 29, 2019

शेती व शेतकरी केंद्रबिदु ठेऊनच शाश्‍वत विकास शक्‍य....माजी मुख्‍य सचिव मा श्री रत्‍नाकर गायकवाड

वनामकृवित ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत बैठक संपन्‍न
देशाच्‍या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) कृषि क्षेत्राचा वाटा केवळ १७ टक्के असला तरी आजही ५० टक्के लोकांचा रोजगार हा शेतीवरच अवलंबुन आहे. त्‍यामुळे देशाचा किंबहूना ग्रामीण भागातील शाश्‍वत विकास करण्‍यासाठी शेती व शेतकरी केंद्रबिंदु ठेऊनच विकास करावा लागेल, यासाठी माननीय मुख्‍यमंत्री महोदय यांच्‍या संकल्‍पेतुन महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राज्‍यातील एक हजार गावात राबविण्‍यात येत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्‍य सचिव मा श्री रत्‍नाकर गायकवाड यांनी केले. महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत दिनांक २९ जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित बैठकित ते बोलत होते. बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर अभियानाचे कार्यकारी संचालक तथा माजी विभागीय आयुक्‍त मा श्री उमाकांत दांगट, जिल्‍हाधिकारी मा श्री पी शिवशंकर, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री बी पी पृथ्‍वीराज, मुख्‍य परिचालन अधिकारी श्री धनंजय माळी, अभियान व्‍यवस्‍थापक श्री दिलीपसिंग बयास, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, केरवाडी येथील स्‍वप्नभुमी प्रकल्‍पाचे प्रमुख श्री सुर्यकांत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्‍ठान व कृषि विद्यापीठ यांची शाश्‍वत ग्राम साम‍ाजिक परिवर्तनासाठी संभाव्‍य ज्ञान व तंत्रज्ञान भागीदारी याबाबत चर्चा करण्‍यात आली.
सदरिल अभियांनाबाबत माहिती देतांना माजी मुख्‍य सचिव मा श्री रत्‍नाकर गायकवाड पुढे म्‍हणाले की, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत गावे सक्षम करणे व गावांचा अंतर्गत व बाहय परिवर्तन घडविण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार आहेत. ग्रामीण भागांमध्‍ये केवळ मुलभुत सुविधा निर्माण करणे एवढाच या अभियानाचा हेतु नसुन शाश्‍वत विकासासह गावे सक्षम बनविणे हे मुख्‍य उदिष्‍टे आहे. यासाठी कृषी व कृषी संलग्‍न क्षेत्राचा विकासावर भर द्यावा लागेल, यात कृषि विद्यापीठाची कृषि ज्ञानात्‍मक व तंत्रज्ञात्‍मक भुमिका महत्‍वाची राहणार आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी जिल्‍हा प्रशासन, जिल्‍हा परिषद, कृषि विद्यापीठ, कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्‍या, गैर शासकीय संस्‍था, इतर सर्व यंत्रणासह लोकांचे सहकार्य घेण्‍यात येणार आहे. यात अनेक कंपन्‍या त्‍यांच्‍या संस्‍थात्‍मक सहभाग देणार असुन खाजगी संस्‍थेचे आर्थिक व तांत्रिक सहकार्य देणार आहेत. अभियानीची प्रभावीपणे व कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा अभियान परिषदेची स्‍थापन करण्‍यात आली आहे. अभियानांतर्गत राज्‍यातील एक हजार गावांची निवड करण्‍यात आली असुन निवडलेल्‍या गावांत विकास योजना व धोरण निश्चितीसाठी ग्राम विकास सुक्ष्‍म आराखडा तयार करण्‍यात येऊन नियोजनात ग्रामस्‍थाच्‍या सहभाग घेण्‍यात येणार आहे. सदरिल गावांत शासकीय योजनांतर्गत प्राप्‍त निधीचा प्रभावीपणे वापर करण्‍यात येणार आहे. अभियांनात निवडण्‍यात आलेली गावे शासनाच्‍या सर्व योजनांतर्गत संरक्षित केली जाणार आहेत, अशी माहिती त्‍यांनी दिली.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हे माननीय मुख्‍यमंत्री यांच्‍या संकल्‍पनेतुन राज्‍यातील एक हजार गावामध्‍ये राबविण्‍यात येणारा एक महत्‍वकांक्षी कार्यक्रम आहे, यामुळे गावांचा शाश्‍वत विकास साध्‍य करणे शक्‍य होणार आहे. हे अभियान म्‍हणजे गावांचा आर्थिक व सामाजिक कायापालट करण्‍याची संधीचे दालन असुन गावांतील कृषि व कृषि संलग्‍न क्षेत्रातील विकासासाठी परभणी कृषि विद्यापीठाचे संपुर्ण सहकार्य राहील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
माजी विभागीय आयुक्‍त मा श्री उमाकांत दांगट आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मराठवाडयास मोठा सांस्कृतिक वारसा असुन मोठया प्रमाणात सुपिक जमिन उपलब्‍ध आहे. परंतु जागतिककरणामुळे शहरीकरण व औद्योगिककरणाच्‍या काळात शेती पुढे अनेक प्रश्‍न निर्माण झाल्या आहेत. औरंगाबाद वगळता इतर जिल्‍हयाचा मानवी विकास निर्देशांक कमी असुन गावांचा शाश्‍वत विकासासाठी कृषि व कृषि संलग्‍न क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. लोकसहभागातुन सार्वजनिक खाजगी तत्‍वावर सदरिल अभियांन राबविण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी मानले. बैठकीस विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख व संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, January 26, 2019

वनामकृवित ७० वा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७० वा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी कुलसचिव श्री रणजित पाटील, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उद्य खोडके, प्राचार्य डॉ हेमांगिनी सरंबेकर, प्राचार्य डॉ तुकाराम तांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माननीय कुलगुरू यांनी सर्वांना प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या तर राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी छात्रसेना अधिकारी लेफ्ट डॉ आशिष बागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्य वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.