वनामकृविच्या तज्ज्ञांनी सुचविल्या उपाययोजना
सध्या हळद
पिकामध्ये अनेक ठिकाणी कंदमाशीचा वाढता प्रादुर्भाव तसेच करपा, पानांवरील ठिपके, कंदकुज
आणि पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. काही वेळा
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे करपा रोगासारखी दिसून येतात. त्यामुळे लक्षणांची
योग्य ओळख करून वेळेवर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि तंत्रज्ञान
माहिती केंद्राचे डॉ. गजानन गडदे, डॉ. दिगंबर पटाईत आणि
श्री. मधुकर मांडगे या तज्ज्ञांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना सुचविल्या आहेत.
कंदमाशीचे व्यवस्थापन
- कंदमाशीचा प्रादुर्भाव जास्त
असल्यास क्विनॉलफॉस २५% – २० मिली किंवा डायमेथोएट ३०% – १५ मिली प्रति १०
लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यकता असल्यास
१५ दिवसांनी दुसऱ्या गटातील कीटकनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना
चांगल्या प्रतीचे स्टिकर वापरावे.
- कंद उघडे पडले असल्यास त्यावर
मातीची भर देऊन वेळेवर भर लावावी. त्यामुळे कंदमाशीला कंदावर अंडी घालण्यास
प्रतिबंध होण्यास मदत होते.
- शेत तणमुक्त व स्वच्छ ठेवावे.
प्रादुर्भावग्रस्त व कुजलेले कंद शेतात पडून राहू देऊ नयेत.
- कंदमाशीचा प्रादुर्भाव असलेल्या
ठिकाणी क्लोरपायरीफॉस ५०% – ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण
तयार करून झाडांच्या बुंध्याभोवती आळवणी करावी.
- एकरी २ ते ३ पसरट तोंडाची भांडी
ठेवून प्रत्येक भांड्यात २०० ग्रॅम भरडलेले एरंडीचे बी व १ ते १.५ लिटर पाणी
घ्यावे. ८ ते १० दिवसांनी तयार होणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशीचे प्रौढ
आकर्षित होऊन त्यात पडून मरतात.
करपा व पानांवरील रोगांचे व्यवस्थापन
- रोगट पाने गोळा करून शेताबाहेर
नष्ट करावीत. शेतात रोगट अवशेष ठेवू नयेत व शेताची स्वच्छता राखावी.
- प्रादुर्भाव कमी असल्यास
कार्बेन्डाझिम ५०% – ४०० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५% – ५०० ग्रॅम किंवा कॉपर
ऑक्सिक्लोराईड ५०% – ५०० ग्रॅम प्रति एकर यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची
फवारणी करावी.
- प्रादुर्भाव जास्त असल्यास
ॲझॉक्सीस्ट्रोबिन १८.२% + डिफेनोकोनॅझोल ११.४% – २०० मिली किंवा
प्रोपिकोनॅझोल २५% – २०० मिली किंवा क्लोरोथॅलोनील ७५% – ५०० ग्रॅम प्रति एकर
यापैकी योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
कंदकुज रोगाचे व्यवस्थापन
- ट्रायकोडर्मा २ ते २.५ किलो
प्रति एकर चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे.
- शेतात पाणी साचणार नाही याची
काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा.
- कंदकुज आढळल्यास मॅन्कोझेब ७५% –
३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% – ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी यापैकी
योग्य बुरशीनाशकाचे द्रावण तयार करून बाधित झाडांच्या बुंध्याभोवती द्रेंचिंग
करावे.
पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता
सध्या अनेक
ठिकाणी हळद पिकामध्ये पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे.
पालाशाच्या कमतरतेमध्ये जुन्या पानांच्या कडा पिवळसर होऊन नंतर तपकिरी व
करपल्यासारख्या दिसतात. त्यामुळे अशा लक्षणांना केवळ करपा समजून बुरशीनाशकाची
फवारणी करू नये.
- विद्यापीठाने केलेल्या
शिफारसीनुसार खतांचा योग्य डोस द्यावा.
- पालाशाची कमतरता दिसून आल्यास
सल्फेट ऑफ पोटॅश (०:०:५०) – १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी
करावी.
- ग्रेड-II सूक्ष्म अन्नद्रव्ये – घन स्वरूपासाठी ५
ग्रॅम किंवा द्रवरूपासाठी ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
- आवश्यकता असल्यास आणि पिकाची
अवस्था विचारात घेऊन ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी पुन्हा एकदा करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
- फवारणीपूर्वी औषधाच्या बाटलीवरील
लेबल, वापराचे प्रमाण
व पिकासाठी दिलेल्या शिफारसी काळजीपूर्वक तपासाव्यात.
- सध्या कडक ऊन असल्याने भर उन्हात
फवारणी करू नये. फवारणी सकाळी ऊन सुरू होण्यापूर्वी किंवा दुपारी ऊन कमी
झाल्यानंतर करावी.
- फवारणीकरिता शिफारस केलेले
पाण्याचे प्रमाणच वापरावे. अत्यंत कमी पाण्यात फवारणी केल्यास औषधाचा पिकावर
योग्य व समान थर बसत नाही आणि अपेक्षित परिणाम मिळत नाही.
- कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य
खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये अनावश्यकपणे एकाच फवारणीत मिसळू नयेत.
- एकाच कीटकनाशकाची किंवा
बुरशीनाशकाची वारंवार फवारणी करू नये. चांगल्या प्रतीचे व पिकासाठी योग्य
स्टिकर वापरावे.
- फवारणी करताना अंग झाकणारे कपडे, रबरी हातमोजे, रबरी
बूट, संरक्षक चष्मा व मास्क/श्वसन संरक्षक साधनांचा
वापर करावा.
- औषधांची फवारणी करताना धूम्रपान, तंबाखू किंवा खाद्यपदार्थांचे सेवन करू
नये. फवारणीनंतर हात, चेहरा व वापरलेली साधने साबणाने
स्वच्छ धुवावीत.
अधिक
माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती
केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक
८३२९४३२०९७ यावर संपर्क साधावा. (कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून.)
वनामकृवि संदेश क्रमांक – ०६/२०२६, दिनांक : ०५/१०/२०२६
.png)



.jpeg)





