Tuesday, October 13, 2026

कृषि महाविद्यालय, परभणीचे आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात घवघवीत यश!

 पाच कला प्रकारांत प्रथम, तर दोन कला प्रकारांत द्वितीय क्रमांक पटकावला


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, सेलू येथे दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात कृषि महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची प्रभावी छाप उमटवत घवघवीत यश संपादन केले. विविध कला प्रकारांतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर महाविद्यालयाने पाच कला प्रकारांत प्रथम, तर दोन कला प्रकारांत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली.

या युवक महोत्सवात कृषि महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी सुगम गायन, शास्त्रीय गायन, समूहगीत, स्किट (लघुनाटिका) आणि लोकनृत्य या पाच कला प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच मूक अभिनय (माईम) आणि एकांकिका या कला प्रकारांत द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेची आणि सांघिक कौशल्याची प्रचिती या महोत्सवातून आली.

या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि त्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, कलात्मक कौशल्य, जिद्द, सांघिक भावना आणि मार्गदर्शकांचे नियोजनबद्ध प्रयत्न महत्त्वाचे ठरले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, सांस्कृतिक सचिव डॉ. एस. एल. बडगुजर, महाविद्यालयाचे सांस्कृतिक प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. अमोल सोनकांबळे, डॉ. अनुराधा लाड आणि डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धेची तयारी, कलाप्रकारांची निवड, सादरीकरणाचा सराव आणि सांघिक समन्वय यांसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करता आले.

युवक महोत्सव हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असून, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो, आत्मविश्वास वाढतो आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्याची प्रेरणा मिळते. कृषि शिक्षणासोबतच कला, साहित्य, संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रांतही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, या दृष्टीने अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे.

कृषि महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थीवर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.