Friday, October 9, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे सनपुरी येथे ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात

 ग्रामीण जागरूकता कार्यानुभवांतर्गत विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांतून सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे - RAWE) कार्यक्रमांतर्गत मौजे सनपुरी, ता. जि. परभणी येथे दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी, जनजागृती, विविध तंत्रज्ञानांचे प्रदर्शन, रांगोळी व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनपुरीचे सरपंच श्री. बाळासाहेब शेंद्रे होते, तर सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रीता ब्रह्मनाथकर  धर्मपुरीकर, विषय विशेषज्ञ डॉ. कल्पना लहाडे, डॉ. ज्योती मुंडे, प्रा. अदिनाथ बेले आणि यंग प्रोफेशनल सादेक शेख यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रावे विद्यार्थी आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पाणी बचतीविषयी घोषणांद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू, पदार्थ, हस्तकला साहित्य आणि उपयुक्त तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून सादर केले. रांगोळी, मेंदी, चित्रकला, राखी निर्मिती, शैक्षणिक साहित्य आणि विविध कौशल्याधारित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता व कौशल्ये प्रदर्शित केली.

अध्यक्षीय मनोगतात सरपंच श्री. बाळासाहेब शेंद्रे यांनी विद्यार्थ्यांनी आनंदाने, जिद्दीने आणि मनापासून गावात काम केल्यामुळे गावामध्ये नवीन उत्साह निर्माण झाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी साधलेला संवाद आणि केलेले सामाजिक प्रबोधन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

कौशल्य विकासातून उद्योजकतेकडे वाटचाल करा – डॉ. नीता गायकवाड

उद्घाटनपर मनोगतात अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी सामुदायिक विज्ञान शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजाचा अभ्यास करून समाजाच्या गरजांनुसार उपयुक्त ज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करणे, हे सामुदायिक विज्ञानाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले सामाजिक ज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करता येतात तसेच स्वतःचा उद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधता येते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे, दृढनिश्चयाने ध्येय निश्चित करण्याचे आणि यशासाठी सातत्याने मेहनत घेण्याचे आवाहन केले. भविष्यात यशस्वी होण्यासाठी आजपासूनच प्रेरणादायी व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्याकडून शिकणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या काळात ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

श्रीमती रीता ब्रह्मनाथकर यांनी रावे विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आणि सनपुरी गावासाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना काहीसा संकोच वाटत होता; मात्र शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी सातत्याने संपर्क ठेवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले, असे त्यांनी सांगितले. रावे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि धाडस शालेय विद्यार्थ्यांमध्येही निर्माण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वी उद्योजक व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांना निरोप देताना त्या भावूक झाल्या.

ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे केले कौतुक

ग्रामस्थ श्रीमती सरसुबाई लुटे आणि अंगणवाडी सेविका श्रीमती मंदाताई घोडके यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे आणि ग्रामस्थांशी त्यांनी जपलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे कौतुक केले.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी सेजल सुगंधी हिने रावेच्या विद्यार्थिनींकडून राखी तयार करणे, रांगोळी काढणे, मेंदी काढणे आणि चित्रकलेचे ज्ञान मिळाल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थिनींकडून नवीन कविता ऐकण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. शंकर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली रावेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रावे विद्यार्थिनी श्रावणी जाधव हिने केले, तर अपूर्वा लांडगे हिने आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीमती व्ही. एन. दाभाडे, श्रीमती एस. आर. जोशी, श्रीमती व्ही. ए. मस्के, श्री. तळेकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, कौशल्य विकास आणि उद्योजकतेची प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच महाविद्यालयीन ज्ञानाचा समाजोपयोगी प्रसार करण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरले.