माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शिफारशीनुसार CIMMYT कडून नामांकन; आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या प्रभावी अंमलबजावणीस मिळणार चालना
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील दोन शास्त्रज्ञांची
संवर्धनशील व पुनरुज्जीवनशील शेती (Conservation and Regenerative
Agriculture) या विषयावरील १४ व्या प्रगत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या शिफारशीनुसार आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधार केंद्र (CIMMYT),
भारत यांच्याकडून या शास्त्रज्ञांचे नामांकन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि
संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक तथा कृषिशास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार आणि
सहायक प्राध्यापक (कृषिशास्त्र) डॉ. एस. बी. कदम यांची निवड करण्यात आली आहे. हे
प्रशिक्षण दि. २८ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले
असून, त्यामध्ये ICAR–केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्था
(ICAR-CSSRI), कर्नाल, हरियाणा तसेच CIMMYT–BISA
संशोधन प्रक्षेत्र, लुधियाना, पंजाब येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निवडीचे पत्र आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यापीठास प्राप्त
झाले.
भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) आणि CIMMYT–BISA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा मुख्य
उद्देश हवामान बदलास सक्षम, शाश्वत आणि उत्पादक शेती पद्धती
विकसित करणे हा आहे. या प्रशिक्षणामध्ये संवर्धनशील शेती व पुनरुज्जीवनशील शेतीची
तत्त्वे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, मृदा आरोग्य सुधारणे, पाणी व खतांचा कार्यक्षम वापर,
शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे तसेच हवामानातील बदलांशी जुळवून घेणाऱ्या
शेती पद्धतींचा अवलंब याविषयी सैद्धांतिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात येणार
आहे.
या अभ्यासक्रमात भारतासह जागतिक दक्षिणेकडील विविध देशांतील संशोधक, शास्त्रज्ञ व कृषि
क्षेत्रातील तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत शास्त्रज्ञांकडून
मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून संशोधनातील नवीन दृष्टिकोन,
आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी सहभागी शास्त्रज्ञांना मिळणार आहे.
विशेष म्हणजे, CIMMYT,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि इंडो-मका व मिलेट्स
डेव्हलपमेंट असोसिएशन (IMMDA) यांच्या संयुक्त सहकार्याने
विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात मक्याच्या संशोधन व विकासासाठी उत्कृष्टता केंद्र
उभारण्याचे कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना
मिळणारे हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशिक्षणातून
प्राप्त होणारे ज्ञान व कौशल्ये विद्यापीठातील संशोधन, अध्यापन
आणि विस्तार शिक्षण कार्यात उपयोगात आणता येतील. तसेच आंतरराष्ट्रीय सहयोगी
कार्यक्रमांचा अधिक प्रभावी वापर करून संयुक्त संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान विकास आणि शाश्वत कृषि पद्धतींच्या प्रसाराला चालना देणे शक्य
होणार आहे.
या प्रशिक्षणासाठी सहभागी शास्त्रज्ञांचा प्रवास व इतर संबंधित व्यवस्थेचा
खर्च CIMMYT कडून करण्यात येणार आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांना अशा आंतरराष्ट्रीय
प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यापीठाची संशोधन क्षमता वृद्धिंगत
होण्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी असलेले सहकार्य अधिक दृढ होण्यास
मदत होणार आहे.
या निवडीबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन आणि
प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले असून, या प्रशिक्षणामुळे विद्यापीठाच्या
शास्त्रज्ञांची व्यावसायिक क्षमता वाढून मराठवाड्यातील शाश्वत, हवामान अनुकूल आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या शेती पद्धतींच्या
विकासाला निश्चितच बळ मिळेल.
