Saturday, October 10, 2026

वनामकृविच्या गोळेगाव कृषि महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि दूरदृष्टीच्या बळावर यशाची शिखरे गाठावीत – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्त, सातत्य आणि स्पष्ट ध्येयाच्या बळावर आयुष्यात यश संपादन करावे. केवळ पदवी मिळविणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नसून, ज्ञान, कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून राष्ट्राच्या विकासात योगदान देणे हे विद्यार्थ्यांचे खरे ध्येय असावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दिनांक ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाची शैक्षणिक वाटचाल, संशोधनातील प्रगती आणि भविष्यातील विकासात्मक संकल्पनांवर प्रकाश टाकला. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी विविध सुविधा उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांनी या संधींचा प्रभावी उपयोग करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे त्यांनी सांगितले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची ओळख अधिक दृढ झाली आहे. विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (IIRF) अंतर्गत विद्यापीठाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला असल्याचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या प्रगतीचा लाभ घेत शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनवृत्ती विकसित करावी, असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रउभारणीची प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षणासोबतच शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून अंधश्रद्धेपासून दूर राहावे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे व मैत्रीपूर्ण नाते निर्माण करावे आणि उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी ‘शिस्त आणि संयम’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिदशा ही व्यक्तिमत्त्व घडविण्याची महत्त्वपूर्ण अवस्था असून, या काळात वेळेचे योग्य नियोजन, नियमित अभ्यास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयम या गुणांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक प्रगतीसोबतच सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

प्रारंभी कृषि महाविद्यालय, गोळेगावचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महाविद्यालयाची पार्श्वभूमी, शैक्षणिक वाटचाल, राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि भविष्यातील विकासात्मक योजनांची माहिती उपस्थितांना दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषि शिक्षण, संशोधनाच्या संधी आणि कौशल्यविकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांवर त्यांनी भर दिला.

या प्रसंगी डॉ. एस. व्ही. गोसावी, डॉ. व्ही. एस. मनवर, डॉ. आर. व्ही. भालेराव, डॉ. आर. एफ. ठोंबरे, प्रा. व्ही. एस. बासटेवाड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. पी. ए. दंडे, श्री. जी. जी. नाईक, श्री. सी. एल. ताटीकोंडलवार, श्री. डी. के. पवार, श्री. एस. एम. ताटके, श्री. एस. आर. शेख, श्री. एम. डी. आडे, श्री. बी. बी. खुडे यांच्यासह महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारीवृंदाने विशेष परिश्रम घेतले.

या दीक्षारंभ सोहळ्यास नवप्रवेशित विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शैक्षणिक प्रवासाची प्रेरणा, विद्यापीठाच्या विकासदृष्टीची ओळख आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्यांची शिकवण देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.