Wednesday, January 25, 2023

सक्षम बालिका सक्षम देश ---------- कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात संपन्न

राष्ट्र उभारणीत नारी शक्तीचा मोठा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. बालिका जर सक्षम असेल तरच राष्ट्र सक्षम होईल, असे विचार वनामकृविचे  मा. कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे आयोजित राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि हे अभासी पध्दतीने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीं म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. कैलास तिडके, स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्मिता मगर, सहयोगी अधिष्ठाता (कृषि अभियां‍त्रिकी) डॉ. उदय खोडके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे, व सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. जया बंगाळे हे उपस्थित होते.

मार्गदर्शनात डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, दिवसेंदिवस विद्यापीठीय शिक्षणामध्ये विद्यार्थीनींची संख्या वाढत असून, येथील अनेक विद्यार्थीनी उच्च पदावर उत्कृष्टपणे कार्य करत आहेत. विद्यापीठातील शिक्षणाचा उच्च दर्जा व अद्ययावत सोयीसुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थीनींनी आपले जीवन उज्ज्वल बनवावे असे ही त्यांनी यावेळी आवाहन केले.

श्री. कैलास तिडके यांनी परभणी जिल्ह्यात बाल  विवाहाचे प्रमाण अधिक असून बाल विवाहासारखी अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन बाल विवाह मुक्त परभणी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आपल्या ओघवत्या शैलीत केले. या दिनाचे औचित्य साधून ‘बाल विवाह प्रतिबंधक परभणी’ या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासंबंधी, समाजात प्रचार-प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता मगर यांनी बालिका दिनाचे महत्त्व सांगतांना स्त्रीरोग तज्ज्ञ  या नात्याने त्यांच्या क्षेत्रातील मुलीं विषयीचे अनुभव विषद करत, समाजात मुलींचे संगोपन देखील मुलांप्रमाणे होणे गरजेचे आहे, अशा भावना व्यक्त करुन बालिका दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचे महत्त्व विषद करतांना डॉ. जया बंगाळे यांनी आजची मुलगी हिच उद्याची माता होणार असल्याने, तिची सर्वतोपरी काळजी घ्यावी, विशेषत: तिचे आरोग्य, पोषण, शिक्षण या विषयी समाज जागरुक असणे नितांत गरजेचे  असल्याचे आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध क्षेत्रातील संपादणूकीसाठी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मध्ये श्री. शुभम पाचनकर या पदव्यूत्तर विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. कु. दिपाली संगेकर या आचार्य पदवी विद्यार्थीनीची निवड अविष्कार या संशोधनात्मक योजने अंतर्गत राजभवनात संशोधनकार्य सादर करण्यासाठी झाल्याबद्दल तसेच   कु. सुषमा माने या मानव विकास विषयातील पदव्यूत्तर विद्यार्थीनीची निवड बँकॉक येथे संशोधन कार्य करण्यासाठी झाल्याबद्दल या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता बालविवाह प्रतिबंधक शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमास डॉ. माधुरी कुलकर्णी, प्रा. निता गायकवाड, डॉ. इरफाना सिद्दीकी, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. संतोष फुलारी इत्यादींचे सहकार्य तथा उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. या वेळी विद्यार्थी- विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Tuesday, January 24, 2023

अल्‍पशिक्षीत श्री संभाजी शिराळे यांचे कृषि अवजारे निर्मितीचे कार्य कौतुकास्‍पद ...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृविचे कुलगुरू यांनी पेठ शिवणी येथील श्री संभाजी शिराळे यांच्‍या कृषी अवजार निर्मिती केंद्रास भेट देऊन केली अवजारांची पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी दिनांक २२ जानेवारी रोजी पेठशिवणी येथील श्री संभाजी शिराळे यांच्‍या विश्‍वदीप उद्योग व रिसर्च सेंटरला प्रत्‍यक्ष भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड देणारी वेगवेगळी कृषी अवजारे निर्माण केलेली पाहुन भारावुन गेले.

ग्रामीण भागात पेठ शिवणी सारख्‍या गावात राहुन अल्‍प शिक्षीत व्‍यक्‍ती शेतक-यांच्‍या हितासाठी मेहनतीने आधुनिक तंत्रज्ञानाचे माहितीचे आधारे नवनवीन कृषी अवजारे जसे सौर ऊर्जावर चालणारी कृषि अवजारे, इलेक्‍ट्रीक वर चालणारे शेती अवजारे निर्माण करण्‍याचे काम मागील २१ वर्षापासुन करित आहेत. राज्‍यातील शेतकत-यांच्‍या शेती निसर्गाच्‍या पावसावर अवलंबुन असल्‍याने व बदलत्‍या वातावरणमुळे शेती व्‍यवसायाच्‍या संबंधी अनेक समस्‍या उभ्‍या आहेत. शेती उत्‍पादन घेण्‍यासाठी वाढता खर्च, शेतमालाला खर्चाचा प्रश्‍न यामुळे शेतकरी अडजणीत येत आहे. या पार्श्‍वभुमीवर संभाजी शिराळे यांचे कार्य कौतुकास्‍पद असल्‍याचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ संशोधनात सर्वांचे सहकार्य घेण्‍याचे प्रयत्‍न करीत असुन प्रगतशील शेतकरी, कृषि उद्योजक, शेतकरी कंपन्‍या व खासगी कंपन्‍या यांचा सहभाग विद्यापीठाच्‍या संशोधन कार्यात घेण्‍यात येत आहे. विद्यापीठ शेतक-यांच्‍या हितासाठी देश-विदेशातील अग्रगण्‍य संस्‍था व खाजगी कंपन्‍या सोबत सामंजस्‍य करार करत आहे. संभाजी शिराळे सारख्‍या ग्रामीण संशोधन करणा-या व्‍यक्‍तीचा शोध घेऊन कृषी विद्यापीठाबरोबर काम करण्‍याची त्‍यांना संधी उपलब्‍ध करून देऊन शेतक-यांचे उन्‍नतीकरिता प्रयत्‍न करण्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

यावेळी त्‍यांनी संभाजी शिराळे यांनी निर्माण केलेल्‍या विविध कृषी अवजाराचे प्रात्‍यक्षिक करून अवजाराची कार्यक्षमता अधिक वाढविण्‍याकरिता मोल्‍याच्‍या सुचना केल्‍या. यावेळी पेठ शिवणी ग्रामस्‍थांच्‍या हस्‍ते कुलगुरू यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी डॉ दयानंद टेकाळे, डॉ प्रविण कापसे, डॉ शिवानंद शिवपुजे, श्री भगवान करंजे, श्री बालाजी बर्डे, श्री रूपेश शिनगारे, श्री रमेश शिनगारे, श्री साहेबराव ढगे, श्री गजानन चव्‍हाण, श्री संतोष पवार, श्री चांद तांबोळी, श्री बळीराम येवले, श्री रामेश्‍वर स्‍वामी, श्री बालाजी बर्डे, श्री दत्‍तराव करंजे, श्री शिवाजी पालमकर आदीसह परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Monday, January 23, 2023

जीवनात यशस्‍वी होण्‍याकरिता दुरदृष्‍टी, शिस्‍त आणि कठोर मेहनत याची जोड पाहिजे...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील परभणी कृषी महाविद्यालयात आयोजित नवप्रवेशित पदवीच्‍या विद्यार्थ्‍याचा स्‍वागत समारंभात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवानिमित्‍त शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्‍ये नवप्रवेशित पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍याकरिता स्‍वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रमुख मार्गदर्शक शिक्षण तज्ञ श्री महेश पाटील उपस्थित होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ पी आर झंवर, शिक्षण प्रभारी डॉ आर व्‍ही चव्‍हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ आर जी भाग्‍यवंत आदींची उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीला स्‍वत:ची जबाबदारी व कर्तव्‍याची जाणीव पाहिजे. जीवनात अनेक समस्‍या येतात, समस्‍यांना धीराने तोंड दिले पाहिजे. जीवनात यशस्‍वी होण्‍याकरिता दुरदृष्‍टी, शिस्‍त आणि कठोर मेहनत याची जोड पाहिजे. आपल्‍या मनात नकारत्‍मक विचार मोठया प्रमाणात येतात, परंतु नकारात्‍मक विचार जाणीवपुर्वक कमी करून सकारात्‍मक विचारांची पेरणी केली पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

शिक्षण तज्ञ श्री महेश पाटील म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व विकसित होत असते. युवकांनी आपल्‍यातील ऊर्जा सकारात्‍मक कामाकरिता वापरावी. राष्‍ट्र बांधणीमध्‍ये युवकांचे मोठे योगदान आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले. सुत्रसंचालन विद्यार्थी अभिषेक खराडे आणि प्रेम कांबळे यांनी केले तर आभार डॉ. आर जी भाग्‍यवंत यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी आयोजित सांस्‍कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी कला सादर केल्‍या.


Sunday, January 22, 2023

अहमदाबाद येथील इस्रोचे अंतरिक्ष उपयोग केंद्र आणि वनामकृवित सामंजस्‍य करार

अचुक हवामान अंदाज व कृषी सल्‍लाकरिता तसेच अंतराळ विज्ञानाचा कृषि संशोधनात होणार लाभ

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्‍थेचे (इस्रो) अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यात १७ जानेवारी रोजी सामंजस्य करारावर झाला. करारावर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि अंतरीक्ष उपयोग केंद्राचे संचालक मा डॉ निलेश देसाई यांनी अहमदाबाद येथे स्‍वाक्ष-या केल्‍या. यावेळी बीपीएसजीचे समुह संचालक डॉ. बिमल कुमार भट्टाचार्य, परभणीचे कृषि हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे, बीपीएसजीचे डॉ. राहुल निगम, अँटेना विभागाचे ग्रुप डायरेक्टर डॉ मिलिंद महाजन, ग्रुप डायरेक्टर डॉ रश्मी शर्मा, डॉ गायत्री, डॉ डी आर रजक, डॉ मेहुल पंड्या, श्री विवेक पांडे, श्री अमित जैन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू मा डॉ. इन्‍द मणी म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानाचा कृषि क्षेत्रावर मोठा परिणाम होत असुन अचुक हवामान अंदाज व त्‍या आधारे ठोस कृषी सल्‍ला तालुकानिहाय शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याची आवश्‍यकता आहे. भविष्‍यात कृषि क्षेत्रात अंतराळ विज्ञानाच्या मोठा वापर होणार असुन अहमदाबाद अंतरिक्ष उपयोग केंद्राच्‍या माध्‍यमातुन परभणी कृषि विद्यापीठात संशोधनात्‍मक केंद्र स्‍थापन होणे गरजेचे आहे. अंतरीक्ष उपयोग केंद्राचे संचालक डॉ निलेश देसाई म्‍हणाले की, सामजंस्‍य करारामुळे अंतरिक्ष उपयोग केंद्र व परभणी कृषी विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त संशोधन कार्यास चालना मिळणार असुन विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि शेतकरी बांधव यांना लाभ होईल, अचुक हवामान अंदाज करिता इस्रोकडील उपग्रह प्राप्‍त आकडेवारी अत्‍यंत उपयुक्‍त ठरेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. 

डॉ. बिमल कुमार भट्टाचार्य यांनी शेतीच्या वास्तविक समस्या ओळखण्यासाठी अॅग्रोमेट युनिटसोबत ड्रोन आधारित तंत्रज्ञान आणि उपग्रह आधारित प्राप्‍त होणारी आकडेवारीचा शेती क्षेत्रात वापराबाबत विद्यापीठासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तर डॉ. कैलास डाखोरे यांनी परभणी कृषी विद्यापीठाकडुन दर आठवडयास प्रसारीत करण्‍यात येणारा कृषि हवामान सल्‍लाचा शेतकरी बांधवा चांगला लाभ होत आहे. भविष्‍यात इस्रोकडुन उपग्रहाच्‍या माध्‍यमातुन येणा-या विविध आकडेवारीचा अतिवृष्टीमुळे शेतमाल उत्‍पादनाचे अचुक नुकसान ओळखणे शक्‍य होईल.

सदर सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांना मोठा फायदा होणार असुन मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अचुक व काटेकोरपणे कृषि हवामान अंदाज व त्‍यावर आधारित कृषी सल्‍ला सेवा तत्‍परतेने व प्रभावीपणे  देणे शक्‍य होणार आहे. परभणी विद्यापीठ विभागवार आणि जिल्हानिहाय कृषी हवामान सल्ला तयार करण्यासाठी उपग्रह कडुन प्राप्‍त विविध स्‍वरूपाची आकडेवारीचा लाभ होणार आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनासही याचा लाभ होणार आहे. परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना विभागावर आणि जिल्हा स्तरावर २०१९ पासून स्थानिक कृषि सल्‍ला तयार करते, यास अधिक बळकटी प्राप्‍त होईल. सदर कराराचा लाभ विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांचे संशोधन कार्य आणि शेतकरी बांधवा होणार आहे.










Saturday, January 21, 2023

वनामकृवि विकसित ज्‍वारीचे वाण सुपरमोती चांगलाच बहरला



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित ज्‍वारीचे वाण सुपरमोती औरंगाबाद जिल्‍हयातील गंगापर तालुक्‍यातील मौजे टाकळयाची वाडी येथील शेतकरी श्री सीताराम जारवाल यांच्या शेतात चांगलाच बहरला आहे.

Tuesday, January 17, 2023

आंतरराष्‍ट्रीय परिषदेत लातूर येथील शेतकरी श्री अशोक चिंते आणि श्री संजय नाडे यांचा गौरव

सन्‍मान शेतकरी बांधवाचा, सन्‍मान परभणी कृषी विद्यापीठाचा

हैद्राबाद येथील भारतीय तेलबीया संशोधन संस्‍थेच्‍या वतीने दिनांक १७ ते २१ जानेवारी दरम्‍यान वनस्‍पती तेल याविषयावर आंतरराष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. यात देश-विदेशातील शास्‍त्रज्ञांचा सहभाग नोंदविला होता. सदर परिषदेत लातूर जिल्‍हयातील तेलबीया पिक उत्‍पादक शेतकरी मौजे मुरूड येथील श्री संजय नाडे आणि जवस उत्‍पादक शेतकरी मौजे चौर येथील श्री अशोक चिंते यांना पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. यावेळी भारतीय तेलबीया संशोधन केंद्राचे महासचिव डॉ सतिश कुमार, परिषदेचे आयोजन अध्‍यक्ष डॉ संजीव गुप्‍ता, कार्यकारी अध्‍यक्ष डॉ आर के माथुर, आयोजन सचिव डॉ एम सुजाथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री चिंते आणि श्री नाडे हे गेल्‍या ३ ते ४ वर्षापासुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या लातूर येथुन प्रसारित झालेले जवसाचे वाण एलएसएस-९३ यांची लागवड करून चांगले उत्‍पादन घेत आहेत. श्री चिंते गेल्‍या ३ ते ४ वर्षापासुन जवसाची लागवड करित असुन केवळ ९० दिवसात येणा-या एलएसएस-९३ वाणापासुन त्‍यांना चांगला आर्थिक लाभ झाला, ते इतरही शेतक-यांना जवस लागवडीबाबत मार्गदर्शन करतात. गेल्‍या वर्षी त्‍यांनी जवसाचे हेक्‍टरी १७.५ क्विंटलचे उत्‍पादन घेतले. तर श्री संजय नाडे हे गेल्‍या ३ वर्षापासुन विद्यापीठ विकसित करडई पिकाचे वाण पीबीएनएस-१२ आणि जवसाची एलएसएल-९३ या तेलवर्गीय पिकांची लागवड करतात. करडई पासुन त्‍यांनी हेक्‍टरी २५ क्विंटल तसेच ऊस पिकांत जवसाचे आंतर पिक पध्‍दतीतुन १० क्विंटल चांगले उत्‍पादन घेतले आहे. ते करडई पिकांची लागवड पासुन काढणीपर्यतंची संपुर्ण कामे यांत्रिकीकरणाच्या माध्‍यमातुन करतात. या शेतकरी बांधवांना लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ एम के घोडके आणि त्‍यांचे सहकारी हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

या सन्‍मानाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी त्‍यांचे अभिनंदन केले. सन्‍मानाबाबत कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्‍हणाले की, मराठवाडा विभागात तेलबिया पिकांचे लागवड क्षेत्राचे प्रमाण घट होत असतांना श्री अशोक चिंते आणि श्री संजय नाडे यांनी घालुन दिलेला आदर्श इतर शेतकरी बांधवाना प्रेरणादायी ठरेल. तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, अनेक शेतकरी विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञानाचा अवलंब करून चांगले उत्‍पादन घेतात, यासारख्‍या प्रगतशील शेतकरी बांधवांचा विद्यापीठ संशोधनात योगदान घेण्‍यात येणार असुन तेलबिया लागवडीखालील क्षेत्र वाढी करिता प्रयत्‍न केला जात आहे.

Monday, January 16, 2023

आरोग्यदायी जीवनासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करावा ....... डॉ. जी.डी. गडदे

मौजे साटला येथे पौष्टिक तृणधान्‍य दिवस साजरा

संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ वर्ष हे आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषित केले असुन यावर्षी पासून महाराष्ट्र शासनाने संक्रांत-भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक १५ जानेवारी रोजी मौजे साटला (ता. जि. परभणी) येथे पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. जी. डी. गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ डि डि पडाईत, रिलायन्स फाउंडेशनचे श्री. रामजी राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ जी डी गडदे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व यावर मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा यांसारख्या पौष्टिक तृणधान्याचा रोजच्या आहारात सर्वांनी समावेश केला पाहिजे. ही पौष्टिक तृणधान्ये ग्लुटेन मुक्त असून ती कॅल्शियम, लोह, झिंक, आयोडीन इत्यादी सारख्या सुक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असतात. ही तृणधान्ये डायरिया, बद्धकोष्ठता, आतड्यांच्या आजारास प्रतिबंध करतात, तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदय विकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक आहे. सदर पीकाकरीता आपल्या भागातील हवामान अनुकूल असल्यामुळे शेतकरी या पिकांची लागवड आपल्या भागात मोठ्या प्रमाणात करू शकतात. ज्वारीची परभणी शक्ती व बाजरी मध्ये एएचबी-१२००, एएचबी-१२६९ हे परभणी विद्यापीठ विकसित जैवसंपृक्त वाणांमध्‍ये लोह आणि जस्‍ताचे प्रमाण इतर वाण पेक्षा जास्‍त आहे, याची लागवड करावी. राजगिऱ्यासारखे पीक सुद्धा आपल्या भागात लागवड करून त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून अधिक उत्पन्न मिळु शकते.

किटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत यांनी विद्यापीठाच्या कृषी माहिती वाहिनी, विविध सेवांचा तसेच समाज माध्यमांचा वापर करून विद्यापीठ तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये कसा वापर करता येईल याविषयी विस्तृत माहिती दिली. विद्यापीठ तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाला यांनी सहभाग नोंदविला. सदरील कार्यक्रमास गावातील ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाद्वारे प्रकाशित कृषी दिनदर्शिका २०२३ चे वाटप करण्यात आले.