वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणीस्थित अन्नतंत्र
महाविद्यालयाला “राष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन पुरस्कार” मिळाल्याने विद्यापीठाच्या
शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. चेंबर फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँडमिडियम
बिझनेस (CASMB) या संस्थेतर्फे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार दिनांक १५ मे रोजी प्रदान
करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन
सेंटरमध्ये पार पडला.
हा पुरस्कार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय ना. श्री. संजय सावकारे, राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री मा.ना. श्रीमती
मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार मा. श्री. हेमंत पाटील,
ऑम्निॲक्टिव्ह हेल्थ टेक्नॉलॉजीचे कार्यकारी अध्यक्ष आणि
व्यवस्थापकीय संचालक श्री संजय मारीवाला, चेंबर फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम
बिझनेसचे अध्यक्ष श्री. निलेश लेले आणि अधिकारी श्री.प्रबोध हळदे व श्री. उमेश
कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी, हा सन्मान परभणीच्या अन्नतंत्र
महाविद्यालयाने संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारांची आणि गुणवत्ता
धोरणाची पावती असून हे यश संपूर्ण विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून भविष्यातील
संशोधन कार्यासाठीही प्रेरणादायक ठरेल, असे प्रतिपादन केले आणि या यशाबद्दल
महाविद्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या पुरस्काराचे महाविद्यालयातर्फे प्रतिनिधित्व करत असलेले सहयोगी
अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर यांनी हा सन्मान स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त
करताना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बैग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे आणि कुलसचिव श्री. संतोष वेणिकार
यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच त्यांनी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी.चे विद्यार्थी, तसेच सर्व
शिक्षक व संशोधन सहकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सततच्या मेहनतीचे व संशोधनातील
योगदानाचे कौतुक केले.
विद्यापीठ परिवाराच्या वतीने महाविद्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आणि
विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.