Saturday, May 10, 2025

वनामकृवितील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची नेपाळ येथील काठमांडू विद्यापीठात निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले इंजि. विशाल काळबांडे यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवीचे शिक्षण घेत असलेले इंजि. विशाल दशरथराव काळबांडे यांची निवड नेपाळ देशातील काठमांडू विद्यापीठात लघुकालीन संशोधन अभ्यासक म्हणून झाली आहे. ही निवड विद्यापीठासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.

या उल्लेखनीय निवडीबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, तसेच कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी इंजि. विशाल काळबांडे यांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

इंजि. विशाल हे काठमांडू येथे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. भीम प्रसाद श्रेष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबूवर्गीय पिकामधील बहुप्रकाशीय प्रतिमा माहिती (Multi Spectral Imagery Data in Citrus Crop)” या विषयावर पुढील पंधरा दिवस संशोधन करणार आहेत.

ही संशोधन मोहिम पूर्ण झाल्यानंतर इंजि. विशाल यांचे पुढील टप्प्यातील संशोधन थायलंड आणि जपान येथील नामांकित कृषि विद्यापीठांमध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे संशोधन त्यांच्यासाठी आणि विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे.