Wednesday, December 31, 2025

विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाल्यास जीवन समृद्ध व आनंदी होते – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

लोहगाव (ता. जि. परभणी) येथील वारकरी संप्रदायातील थोर संत हरिबाबा महाराज ठाकुरबुवा लोहगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बांधवांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी मार्गदर्शन करताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाल्यास जीवन समृद्ध व आनंदी होते असे प्रतिपादन केले.

ते म्हणाले की, विज्ञान माणसाला भौतिक प्रगतीकडे घेऊन जाते, तर अध्यात्म माणसाला अंतर्मुख करते. या दोन्हींचा समतोल साधला गेला तरच जीवनात खरा आनंद, समाधान व सामाजिक समरसता निर्माण होते. शेतीसारख्या क्षेत्रात विज्ञानाची जोड आवश्यकच आहे; परंतु त्यासोबत मूल्याधिष्ठित जीवनशैली व नैतिकता जपणे तितकेच महत्त्वाचे आहे.

या कार्यक्रमात संचालक शिक्षण डॉ. भगवान असेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. नीरज मोरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, शेतकरी महिला, ग्रामस्थ व भाविक सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत हरिबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संतांच्या विचारांचा स्मरण करून देताना मान्यवरांनी साधेपणा, कष्ट, निसर्गाशी नाते आणि समाजहित या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.



संशोधन ते विस्तार - वनामकृवित जिल्हा मासिक चर्चासत्र; २५० हून अधिक अधिकारी व शेतकऱ्यांचा सहभाग

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त जिल्हा चर्चासत्राचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालयाअंतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र तसेच कृषि विभाग (जिल्हा  परभणी व हिंगोली) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी एकदिवसीय जिल्हा मासिक चर्चासत्र व विविध संशोधन केंद्रांना प्रक्षेत्र भेटींचे आयोजन विद्यापीठ परिसरात करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभागामार्फत नियमितपणे दर महिन्याला परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात आयोजित करण्यात येतो. यापैकी दरवर्षी एका महिन्यात दोन्ही जिल्ह्यांचे संयुक्त जिल्हा मासिक चर्चासत्र विद्यापीठ स्तरावर आयोजित करण्याची संकल्पना राबविण्यात येते. या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांना प्रत्यक्ष भेटी घडवून, विद्यापीठात सुरू असलेल्या विविध संशोधन उपक्रमांची सविस्तर माहिती देणे तसेच या संशोधनातून प्राप्त निष्कर्षांचा उपयोग पुढे विस्तार कार्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रभावीपणे करता यावा हा आहे.

या कार्यक्रमास विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, संचालक शिक्षण डॉ. भगवान असेवार, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. राजेंद्र कदम, परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण, विद्यापीठाचे मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, कृषि विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, हिंगोलीचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री.प्रदीप कच्छवे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री.अभिषेक घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांतर्फे विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांना प्रक्षेत्र भेटी देण्यात आल्या. कोरडवाहू शेती संशोधन योजना येथे डॉ.आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके व डॉ. पपीता गौरखेडे यांनी कोरडवाहू शेतीतील संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती दिली. एकात्मिक शेती पद्धती योजना येथे डॉ. किरण जाधव, डॉ. सुदाम शिराळे व डॉ. शरद चेनलवाड यांनी एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व स्पष्ट तसेच त्यांनी केलेल्या विविध शिफारसी बद्दल माहिती दिली. पाणी व्यवस्थापन योजना येथे डॉ. हरीश आवारी यांनी पाण्याच्या कार्यक्षम वापराविषयी तसेच विद्यापीठाद्वारे विकसित गोदावरी तुरीच्या विविध अंतरावरील लागवड प्रयोगाबद्दल माहिती दिली. रेशीम संशोधन योजना येथे डॉ. धनंजय मोहोड यांनी रेशीम उत्पादनावरील संशोधन तसेच रेशीम शेतीतील मुख्य समस्या ऊझीमाशीच्या जैविक नियंत्रण याविषयी चालू असलेल्या संशोधनाबद्दल माहिती दिली. गहू व मका संशोधन योजना येथे डॉ. सुनील उमाटे यांनी गहू पिकांवरील विद्यापीठात चालू असलेले विविध संशोधन निष्कर्ष मांडले. करडई संशोधन योजना येथे डॉ.राजेश धुतमल व डॉ.संतोष शिंदे यांनी करडई पिकावरील विविध देश व विदेशी वाणांच्या संकरातून विद्यापीठात विकसित करीत असलेल्या वाणांच्या संशोधनाची माहिती दिली. तसेच बायोमिक्स निर्मिती केंद्रामार्फत डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी जैविक घटकांच्या निर्मिती व उपयोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

दुपारी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात आयोजित चर्चासत्रात शेतीतील सद्यस्थिती, पिक व्यवस्थापन, भाजीपाला उत्पादन तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सखोल व फलदायी चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभव मांडले व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

या कार्यक्रमासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कृषि विभागातील प्रकल्प संचालक (आत्मा), उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अशा एकूण २५० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मधुकर मांडगे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दिपाली सवंडकर तसेच कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व विस्तार शिक्षण संचालनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेतकरी बांधवांचा, विशेषतः भाजीपाला उत्पादक गटाच्या सदस्यांचा मोलाचा सहभाग व सहकार्य लाभले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी, माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरला.










वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची शैक्षणिक सहल शैक्षणिक वर्ष २०२५-२६ नुकतीच यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही सहल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी (EDNT-231) या विषयांतर्गत आयोजित तीन दिवसीय शैक्षणिक सहलीचे सुरुवात दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी भारतीय ज्ञानपरंपरा व प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या अजिंठा लेण्यांचा सखोल अभ्यास केला. या लेणी इ.स.पू. २ रे शतक ते इ.स. ६ वे शतक या कालखंडात कोरलेली असून, बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान परंपरेचे दर्शन घडवतात. लेण्यांमधील भित्तीचित्रे, शिल्पकला, विहार व चैत्यगृहे ही प्राचीन भारतीय स्थापत्य व अभियांत्रिकी कौशल्याची उत्तम उदाहरणे आहेत. नैसर्गिक दगड कापणी तंत्रज्ञान, खडकात कोरलेली रचना, नैसर्गिक प्रकाश व्यवस्थापन तसेच पावसाच्या पाण्याचे नियोजन यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरला. तसेच जळगाव येथील जैन इरिगेशन आयोजित कृषि  महोत्सवात विद्यार्थ्यांनी आधुनिक, हायटेक, प्रिसिजन आणि क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. येथे बघितल्यावरच विश्वास बसतोया उक्तीचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. या वेळी सिंचन व निचरा व्यवस्था, मृद व जलसंधारण, शेती अवजारे, कृषि  प्रक्रिया, संरक्षित शेती, सौर ऊर्जा आदी विषयांवरील विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल अभ्यास करण्यात आला.

सहलीचे प्रमुख म्हणून डॉ. सुभाष विखे, विभाग प्रमुख, प्रक्षेत्र संरचना विभाग यांनी तर सहल अधिकारी म्हणून डॉ. संदीप पायाळ आणि डॉ. शैलेजा देशवेन्ना यांनी काम पाहिले. सहल यशस्वी करण्यासाठी अनिकेत माने, विठ्ठल झटे, अभिषेक गवळी, अभिषेक कुंडकर, दत्ता खेडकर, साक्षी पिडीआर, गीता टेगंसे, मधुरा बुचाले, श्री. हनुमंत ढगे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







वनामकृवितील कर्मचारी कवी पांडुरंग वागतकर यांना आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल – पुणे २०२६ चे अध्यक्षपद

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात कार्यरत कर्मचारी व कवी श्री. पांडुरंग वागतकर यांची पुणे येथील भिडेवाडा (देशातील मुलींची पहिली शाळा) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल – पुणे २०२६ या भव्य राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

हा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर, संविधानिक मूल्यांचा प्रसार तसेच सामाजिक समतेचा संदेश दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ साठी कवी वागतकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर व उपकुलसचिव श्री. पुरभा काळे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

या फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या काव्य महोत्सवामध्ये कविता सादर करण्यासाठी फुलेप्रेमी कवी–कवयित्रींची आयोजकांतर्फे निवड करण्यात आली आहे.

कवी पांडुरंग वागतकर हे सातत्याने शेतकऱ्यांचे सुख–दुःख कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांची शेतीमातीशी नाळ कायमची जोडलेली असून शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी ते आपल्या कवितांमधून सातत्याने करीत असतात.

विशेष म्हणजे, गेल्यावर्षी दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्लीत झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या करपलेली खोळ’ या कवितेची निवड झाली होती.

कवी श्री. पांडुरंग वागतकर



Tuesday, December 30, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या गोसंवर्धन कार्यास राज्यस्तरीय यश — ‘ॲग्रो टेक २०२५’ मध्ये द्वितीय क्रमांक

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांच्या दूरदृष्टीतून विद्यापीठाचा राज्यस्तरीय प्रदर्शनात गौरव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संकरित गोपैदास प्रकल्पातील देवणी व होलदेव जातीच्या गोवंशीय पशुधनास राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ॲग्रो टेक २०२५’ मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. हे प्रदर्शन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय प्रदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन व प्रेरणेतून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सक्रिय सहभाग नोंदविला होता. विद्यापीठाच्या संशोधनात्मक उत्कृष्टतेची दखल घेत सदर पारितोषिक प्रदान करण्यात आला.

हा पारितोषिक अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे माननीय प्रधान सचिव श्री. विकासचंद्र रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अकोला जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार मिळण्यासाठी परभणी कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचे मार्गदर्शन तसेच संकरित गोपैदास प्रकल्प व पशुसंवर्धन विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ तसेच दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखालील कार्य महत्वपूर्ण ठरले.

या सन्मानामुळे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विस्तार कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढून भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण संशोधन व शेतकरीहितकारी उपक्रम राबविण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा संकरित गोपैदास प्रकल्प सन १९७५ मध्ये स्थापन झाला असून, मराठवाडा भागातील देशी गायींचे संकरिकरण करून दुग्धोत्पादन वाढवणे तसेच देशी जातींचे संवर्धन करणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध देशी देवणी जात ही दुहेरी उपयुक्तता (दुग्धोत्पादन व शेतीकाम) यासाठी ओळखली जाते.

सद्यस्थितीत या प्रकल्पात होलदेव व देवणी वंशाचे एकूण २०२ पशुधन असून, त्यापैकी देवणी गोवंशाची संख्या ९५ आहे.

या यशस्वी सहभागासाठी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. डी. व्ही. बैनवाड तसेच शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. देशमुख, तसेच श्री. जी. पी. भोसले, श्री. रवी काळे, श्री. विश्वंभर शिंदे, श्री. निवृत्ती द्वारे, श्री. महेंद्र कचरे, श्री. माणिक शिंदे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



Saturday, December 27, 2025

हवामान बदल हे ‘न्यू नॉर्मल’; कोरडवाहू शेतीचे नव्या परिस्थितीनुसार पुनर्नियोजन आवश्यक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविद्वारा हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत उजळंबा येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प तर्फे राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमाच्या (NICRA) अंतर्गत मौजे उजळंबा (ता. जि. परभणी) येथे दिनांक २५ डिसेंबर २०२५  रोजी शेतकरी संवाद मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होतेतर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएआर–क्रिडाहैदराबादचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद उपस्थित होते. व्यासपीठावर बाभुळगावचे सरपंच श्री शिवाजी दळवे, सोन्नाचे सरपंच श्री आवडाजी गमे, उजळंबाचे सरपंच श्री प्रभाकर मोगले, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. पापिता गौरखेडे, डॉ. अनंत लाड, प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानेश्वर पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की हवामान बदलाचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवत असून अतिवृष्टी, अल्पवृष्टी, अनिश्चित पर्जन्यमान आणि तीव्र हवामान घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात या बाबी ‘न्यू नॉर्मल’ ठरत असून मराठवाड्यासारख्या कोरडवाहू प्रदेशात पीक व पीकपद्धती, संपूर्ण शेती व्यवस्था, पशुधन तसेच संबंधित व्यवस्थापन नव्या परिस्थितीनुसार नियोजित करणे अत्यावश्यक आहे. ते पुढे म्हणाले की कोरडवाहू शेती ही एक व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना असून दुग्धव्यवसाय, फळपिके, यांत्रिकीकरण, उपलब्ध सिंचन पाण्याचा अचूक व कार्यक्षम वापर, मृद व जलसंधारण तसेच हवामानशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यास शाश्वत उत्पादन शक्य होईल.

माननीय कुलगुरूंनी सांगितले की नवीन सर्वसमावेशक योजना ‘जी राम जी’ अंतर्गत मृद व जलसंधारण, पाणी साठवण, पायाभूत सुविधा, बाजारपेठेशी निगडित व्यवस्था, रस्ते सुविधा तसेच हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम (NICRA) अंतर्गत विकसित तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच शेतीमध्ये महिलांचे योगदान लक्षणीय असून प्रत्येक परिवारात स्त्री ही शेतीच्या केंद्रस्थानी असून महिलांमुळेच घरातील एकोपा टिकून राहतो. मूल्यवर्धन व काढणीपश्चात प्रक्रिया (Post-harvest processing) यामध्ये महिलांची कार्यक्षमता व विचारशक्ती प्रभावीपणे वापरता येईल, असेही त्यांनी अधोरेखित केले. याबरोबरच शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा पालक व प्रचारक आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शेतकरी-केंद्रित संशोधन व विस्तार उपक्रम विद्यापीठ शेतकरी देवो भवः’ या भावनेतून राबवत आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र स्वरूपात दिसून येऊ शकतात. त्यामुळे कोरडवाहू शेती करताना शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात थेट शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संचालक डॉ. विनोद कुमार सिंह यांनी सांगितले की, हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम (NICRA) गावांतील शेतकरी हे यशस्वी तंत्रज्ञानाचे ब्रँड अॅम्बेसेडर असून त्यांनी त्याचा प्रसार करावा. सौरऊर्जा, बेड पद्धतीने उच्च घनता कापूस लागवड व संपूर्ण यांत्रिकीकरणावर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले. कोरडवाहू शेतीत पशुधनाचे महत्त्व लक्षात घेऊन पशु आरोग्य, निवारा व पोषणाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अवजारे बँक, बियाणे बँक व बैलचालित अवजारांचा प्रसार करण्यावर भर दिला. महिलांनी जैविक निविष्ठा व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून अर्थार्जन करावे असेही त्यांनी आवाहन केले.

प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांनी सांगितले की कोरडवाहू शेतीतील उपयुक्त तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी स्वतः वापरावेच, परंतु त्याचा इतर शेतकऱ्यांपर्यंतही प्रसार करावा.

यावेळी निक्रा (NICRA) गावांतील श्री. आवडाजी गमे, श्री. प्रभाकर मोगले आणि श्री. ज्ञानेश्वर माऊली पारधे या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. आंतरपीक पद्धत, सुधारित वाण — जसे तूर पिकाचा बी.डी.एन. ७१६ तसेच सोयाबीन पिकाचे एम.ए.यु.एस. ६१२ व ७२५ — हे वाण अधिक उत्पादन देणारे ठरल्याचे त्यांनी सांगितले. बीबीएफ (रुंद वरंबा–सरी) पद्धत आणि बेड पद्धतीमुळे कमी व जास्त पावसाच्या परिस्थितीतही उत्पादनात वाढ होत असल्याचे तसेच पशुधनासाठी सुरक्षित निवारा व पौष्टिक चाऱ्याचे महत्त्व असल्याचे शेतकऱ्यांनी अधोरेखित केले.

याप्रसंगी श्री. ज्ञानोबा पारधे यांच्या बीबीएफ वरील हरभरा पिकास तसेच विहीर पुनर्भरण संचास आणि श्री. गजानंद साखरे यांच्या बेडवरील तूर पिकास मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमास शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पातील श्री. सादिक शेख, श्री. एस. पी. काळे, श्री. व्ही. जे. रिठे, श्री. संतोष धनवे, श्री. सुरेश खटिंग व श्री. मंगेश राऊत यांनी परिश्रम घेतले.










Friday, December 26, 2025

कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासासाठी संशोधन, तंत्रज्ञान व समन्वय आवश्यक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कोरडवाहू शेतीवर शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने कोरडवाहू शेतीवर शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद दिनांक २५ डिसेंबर रोजी माननीय कुलगुरू यांच्या बैठक दालनात पार पडला. या संवादादरम्यान कोरडवाहू शेतीतील उपयुक्त तंत्रज्ञान, कोरडवाहू शेतीतील समस्या तसेच भविष्यातील विकास आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या संवाद सत्राच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएआर– क्रीडा, हैदराबादचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद उपस्थित होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. प्रफुल घंटे, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रभारी अधिकारी डॉ. दयानंद टेकाळे, डॉ.किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कोरडवाहू शेती ही एक व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना आहे. या शेती पद्धतीमध्ये कोरडवाहू फळपिके, पशुधनाची जोड म्हणजेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, मृद व जलसंधारण, यांत्रिकीकरण, कृषी सिंचनशास्त्र तसेच हवामानशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, हवामान बदल, अनिश्चित व असमतोल पर्जन्यमान, कधी पावसाचे दीर्घकालीन खंड तर कधी अतिपाऊस व अतिवृष्टी, जमिनीचे ढासळलेले आरोग्य, जमिनीची होणारी धूप, नैसर्गिक संसाधनांची झालेली घट तसेच वाढता उत्पादन खर्च यामुळे कोरडवाहू शेतीसमोर अभूतपूर्व आव्हाने उभी ठाकली आहेत. मराठवाड्यासारख्या कोरडवाहू शेतीचे अधिक प्रमाण असलेल्या प्रदेशात शेती अधिकाधिक जोखमीची होत असताना, कोरडवाहू शेती यशस्वी करण्यासाठी संशोधनाधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतीपूरक जोड व्यवसायांची जोड, शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग तसेच शासन व संशोधन संस्थांमधील सुसूत्र समन्वय हाच शेतीच्या शाश्वत विकासाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू यांनी केले.

संचालक डॉ. विनोद कुमार सिंह म्हणाले की, आजच्या काळात कोरडवाहू शेती ही केवळ कमी पावसावर अवलंबून असलेली शेती न राहता ती हवामान बदलाच्या थेट परिणामांना सामोरे जाणारी शेती बनली आहे. पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी–अल्पवृष्टीची चक्रे, तापमानातील वाढ, मृदेतील सेंद्रिय घटकांचे कमी झालेले प्रमाण, जलस्रोतांची घट आणि निविष्ठांच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम (NICRA) कोरडवाहू शेतीला नवदिशा देणारा ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरडवाहू शेती क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे शेती उत्पादनक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली असून सरासरी उत्पादनात १.२ ते २.४ टन प्रति हेक्टर इतकी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात या उत्पादनक्षमतेत आणखी वाढ करण्यासाठी वैज्ञानिक व क्षेत्रनिहाय प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले की, क्षेत्रनिहाय (Area-specific) नियोजन अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक भागाच्या हवामान, माती व सामाजिक परिस्थितीनुसार तंत्रज्ञान व उपाययोजना राबविल्या पाहिजेत. राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा व तंत्रज्ञानाचा राज्य व जिल्हा स्तरावर प्रभाव (Impact Assessment) मोजला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सिंह यांनी कोरडवाहू शेतीसाठी संशोधन, विकास व विस्तार क्षेत्रात पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता दर्शविली. संशोधन व विस्तार उपक्रम हे शेतकरी-केंद्रित असावेत तसेच शेतकऱ्यांच्या गरजांशी सुसंगत असले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. आगामी काळात शेतकरी समुदायासाठी उपयुक्तता (Relevance to Farming Community) ही केंद्रस्थानी ठेवून कार्य करणे गरजेचे आहे. याबरोबरच गावपातळीवर कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून आधुनिक शेती अवजारे उपलब्ध करून देण्यावर भर दिला. नव्या यंत्रांची प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान स्वीकार वाढवावी व यासाठी संस्था सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. मृदा आरोग्याबाबत त्यांनी गंधक, जस्त व बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता वाढत असल्याने मृदा तपासणीवर आधारित खत वापर आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मका पिकाच्या उदाहरणातून त्यांनी सांगितले की, कॉम्पोझिट मक्यासाठी सुमारे ७५ कि.ग्रॅ. तर संकरीत मक्यासाठी सुमारे १५० कि.ग्रॅ. खत लागते, त्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च–उत्पन्नाचा विचार करून योग्य पर्याय निवडावा,असा सल्ला दिला.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी बीटी कापूस व्यवस्थापन, करडई तेलाचे पोषणमूल्य आणि जमिनीच्या खोलीनुसार योग्य ज्वारी वाणांची निवड यावर मार्गदर्शन केले. संशोधनाधारित पीक नियोजन केल्यास उत्पादन व उत्पन्नात निश्चित वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे, तसेच रुंद वरंबा-सारी पद्धत, कमी कालावधीचे वाण व फवारणीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन यांसारख्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता तपासणे हा उद्देश असल्याचे सांगितले. तसेच शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन व पूरक व्यवसाय जोडल्यास उत्पन्न अधिक स्थिर राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. श्री. सुनील शेळके यांनी कृषि तंत्रज्ञान अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्षम विस्तार उपक्रम व माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. राजेश मगर यांनी बीबीएफ (रुंद वरंबा–सरी) तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे तसेच सोयाबीनचे एमएयुएस-७२५, एमएयुएस-६१२ व किमया हे वाण चांगले आढळल्याचे नमूद केले. श्री. रमाकांत पोशेट्टी यांनी कोरडवाहू शेतीसोबत पशुधनाची जोड व त्यासाठी संरक्षित जागा व पौष्टिक चारा आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. गजानन अंभोरे यांनी कमी व जास्त पावसातही बेड पद्धतीमुळे उत्पादन वाढल्याचे सांगितले.

यावेळी उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यानंतर मान्यवरांनी कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रासह विद्यापीठाच्या विविध केंद्रांना भेट दिली. आंतरपिक पद्धती, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व शेततळे यावरील संशोधन प्रयोगांची माहिती डॉ. आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके, डॉ. गणेश गायकवाड व डॉ. पापिता गौरखेडे यांनी दिली.

बायोमिक्स उत्पादन व संशोधन केंद्रात डॉ. चंद्रशेखर आंबाडकर यांनी बायोमिक्स निर्मिती, वापर व प्रसाराबाबत माहिती दिली. सिंचन जल व्यवस्थापन प्रकल्पातील अमृत सरोवर (शेततळे), सौरपंप, ठिबक सिंचन व तूर प्रक्षेत्रास भेट देण्यात आली, तसेच त्रिशूल तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. हवामान वेधशाळेत दीर्घकालीन हवामान बदल व त्याचा शेतीवरील परिणाम याबाबत डॉ. कैलास डाखोरे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. गणेश गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. हरीश आवारी, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. पी. व्ही. पडघन, डॉ. अंबिका मोरे, डॉ. अनंत लाड, डॉ. राजेश धुतमल, डॉ. सवाई यांच्यासह विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञ व मान्यवर शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील श्री एस. पी. काळे, श्री व्ही. जे. रिठे, श्री संतोष धनवे, श्री सुरेश खटिंग, श्री. मंगेश राऊत व श्री सादिक शेख यांनी परिश्रम घेतले.