Wednesday, December 31, 2025

वनामकृवितील कर्मचारी कवी पांडुरंग वागतकर यांना आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल – पुणे २०२६ चे अध्यक्षपद

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात कार्यरत कर्मचारी व कवी श्री. पांडुरंग वागतकर यांची पुणे येथील भिडेवाडा (देशातील मुलींची पहिली शाळा) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल – पुणे २०२६ या भव्य राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

हा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर, संविधानिक मूल्यांचा प्रसार तसेच सामाजिक समतेचा संदेश दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ साठी कवी वागतकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर व उपकुलसचिव श्री. पुरभा काळे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

या फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या काव्य महोत्सवामध्ये कविता सादर करण्यासाठी फुलेप्रेमी कवी–कवयित्रींची आयोजकांतर्फे निवड करण्यात आली आहे.

कवी पांडुरंग वागतकर हे सातत्याने शेतकऱ्यांचे सुख–दुःख कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांची शेतीमातीशी नाळ कायमची जोडलेली असून शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी ते आपल्या कवितांमधून सातत्याने करीत असतात.

विशेष म्हणजे, गेल्यावर्षी दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्लीत झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या करपलेली खोळ’ या कवितेची निवड झाली होती.

कवी श्री. पांडुरंग वागतकर