कमी पाण्यातील पौष्टिक तृणधान्ये आरोग्य व शाश्वत शेतीसाठी उपयुक्त : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
राष्ट्रीय कृषि
विकास योजना – महाराष्ट्र पौष्टिक गुणधर्म अभियान सन २०२५-२६ अंतर्गत वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन
प्रकल्प व कृषि विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिनांक १९ व २० डिसेंबर २०२५ दरम्यान
दोन दिवसीय तृणधान्य
चे महत्व लागवड व मुल्यवर्धन या विषयावर
ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २० डिसेंबर २०२५ ऑनलाइन
पद्धतीने मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना
माननीय कुलगुरूंनी सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात, कमी खतांवर तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने
कमी असलेली बाजरी व ज्वारी ही पौष्टिक तृणधान्ये अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
ही पिके शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत समाविष्ट करावीत तसेच दैनंदिन आहारात वापर
केल्यास निरोगी आरोग्यास चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.विद्यापीठाने
बाजरी व ज्वारीचे अधिक लोह व जस्तयुक्त सुधारित वाण विकसित केले असून, हे वाण तसेच पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे
अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य कृषि सहाय्यक अधिकारी प्रभावीपणे करू शकतात, कारण त्यांचा शेतकरी बांधवांशी थेट संपर्क असतो. या पिकांखालील क्षेत्र विस्तारासाठी
शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) व महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन
मूल्यवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी
केले. तसेच बाजरी व ज्वारी पिकांमध्ये काढणी प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने संशोधन
करून त्याचे निष्कर्ष शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
क्लस्टर पातळीवर प्रात्यक्षिकांचे आयोजन करून कमी खर्चिक निविष्ठांच्या वापरातून उत्पादनवाढ
साधता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीही उपस्थितांना
मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात पोषक तृणधान्यांचे
क्षेत्र व उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कृषि विभागामार्फत विशेष प्रयत्न केले
जातील,
असे त्यांनी यावेळी सांगितले.
तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. चंद्रकांत पाटील यांनी बाजरी लागवडीविषयी, श्री.
कुलकर्णी यांनी पोषक तृणधान्यांचे मूल्यवर्धन, डॉ. योगेश बन यांनी
नाचणी, वरी व भगर लागवड तंत्रज्ञान, तर
डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे व डॉ. दिलीप हिंगोले यांनी किड व रोग व्यवस्थापन या विषयावर
सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सूर्यकांत पवार यांनी बियाणे उपलब्धता व जैविक खताच्या
वापराविषयी माहिती दिली.
माजी ज्वारी पैदासकार डॉ. लक्ष्मण जावळे यांनी ज्वारी व हुरडा
लागवडीद्वारे अधिक उत्पन्न कसे मिळविता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर
नरसापूर व सारंगपूर येथे श्री. आनंद गंजेवार यांनी हुरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांना
भेट देऊन त्यांच्या अनुभवांबाबत व अडचणींबाबत माहिती घेतली तसेच योग्य मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांपर्यंत
विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच
शेतकऱ्यांना दर्जेदार वाण उपलब्ध होण्यासाठी पैदासकारांनी सातत्याने प्रयत्न करावेत,
असे यावेळी आवाहन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगी
संचालक (संशोधन)डॉ. सूर्यकांत पवार आणि छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषि अधिकारी श्री.
आनंद गंजेवार, कार्यक्रम समन्वयक श्री. काकासाहेब सुकासे, तसेच राष्ट्रीय
कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र, गांधेली
येथील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण ८० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


