Wednesday, December 31, 2025

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची शैक्षणिक सहल शैक्षणिक वर्ष २०२५-२६ नुकतीच यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही सहल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी (EDNT-231) या विषयांतर्गत आयोजित तीन दिवसीय शैक्षणिक सहलीचे सुरुवात दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी भारतीय ज्ञानपरंपरा व प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या अजिंठा लेण्यांचा सखोल अभ्यास केला. या लेणी इ.स.पू. २ रे शतक ते इ.स. ६ वे शतक या कालखंडात कोरलेली असून, बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान परंपरेचे दर्शन घडवतात. लेण्यांमधील भित्तीचित्रे, शिल्पकला, विहार व चैत्यगृहे ही प्राचीन भारतीय स्थापत्य व अभियांत्रिकी कौशल्याची उत्तम उदाहरणे आहेत. नैसर्गिक दगड कापणी तंत्रज्ञान, खडकात कोरलेली रचना, नैसर्गिक प्रकाश व्यवस्थापन तसेच पावसाच्या पाण्याचे नियोजन यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरला. तसेच जळगाव येथील जैन इरिगेशन आयोजित कृषि  महोत्सवात विद्यार्थ्यांनी आधुनिक, हायटेक, प्रिसिजन आणि क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. येथे बघितल्यावरच विश्वास बसतोया उक्तीचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. या वेळी सिंचन व निचरा व्यवस्था, मृद व जलसंधारण, शेती अवजारे, कृषि  प्रक्रिया, संरक्षित शेती, सौर ऊर्जा आदी विषयांवरील विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल अभ्यास करण्यात आला.

सहलीचे प्रमुख म्हणून डॉ. सुभाष विखे, विभाग प्रमुख, प्रक्षेत्र संरचना विभाग यांनी तर सहल अधिकारी म्हणून डॉ. संदीप पायाळ आणि डॉ. शैलेजा देशवेन्ना यांनी काम पाहिले. सहल यशस्वी करण्यासाठी अनिकेत माने, विठ्ठल झटे, अभिषेक गवळी, अभिषेक कुंडकर, दत्ता खेडकर, साक्षी पिडीआर, गीता टेगंसे, मधुरा बुचाले, श्री. हनुमंत ढगे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.