Saturday, December 20, 2025

वनामकृवितील अमृत सरोवर व गोदावरी तूर बीजोत्पादन प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू व माननीय जिल्हाधिकारी यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (सिंचन जल व्यवस्थापन) अंतर्गत विकसित अमृत सरोवर तसेच गोदावरी तूर बीजोत्पादन प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी भेट दिली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील या योजनेच्या लगत असलेल्या नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (वनामकृवि – आरपीटीओ / VNMKV–RPTO) प्रशिक्षण केंद्राची तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षलागवड व वनीकरण उपक्रमांबाबत माहिती सांगून शेतकरी-केंद्रित संशोधन व उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा तसेच आतापर्यंत साध्य झालेल्या उल्लेखनीय यशांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सिंचन जल व्यवस्थापन, पाणी साठवण व कार्यक्षम वापर, तसेच दर्जेदार बियाणे उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत शेतीस चालना मिळत असल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांनी अमृत सरोवर तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्षेत्रावरील ठिबक सिंचानावर लागवड करण्यात आलेल्या गोदावरी तुरीच्या वाणावरील  विविध प्रयोगांची पाहणी केली. या सर्व उपक्रमांचा व तंत्रज्ञानाचा माननीय जिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले. परिसरातील नैसर्गिक वातावरण व समृद्ध साधनसंपत्ती लक्षात घेता येथे कृषि पर्यटनाची मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद करून, विद्यापीठाने या ठिकाणी कृषि पर्यटनाचे एक आदर्श मॉडेल विकसित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भेटीदरम्यान कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या ‘त्रिशूल तंत्रज्ञानाची’ प्रक्षेत्रावर उपयुक्तता प्रत्यक्ष दाखवण्यात आली. या तंत्रज्ञानामध्ये पावसाच्या पाण्याची शेततळ्यात साठवणूक, सिंचनासाठी सौर (ग्रीन) ऊर्जेचा वापर तसेच पाण्याच्या अचूक व कार्यक्षम वापरासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतींचा समावेश आहे. या प्रणालीमुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढून उत्पादनात लक्षणीय, सुमारे दुप्पट वाढ साध्य होत असल्याचे योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी यांनी मान्यवरांना सांगितले.

या भेटीदरम्यान शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी तसेच प्रक्षेत्र अधिकारी श्री. ऋषिकेश औंढेकर उपस्थित होते.