Sunday, December 14, 2025

विद्यार्थीहिताला प्राधान्य : वनामकृवित वसतिगृह सुधारणा व सुरक्षिततेवर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हे विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तारकार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन या तत्त्वांवर कार्यरत आहे. विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरणासोबतच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास विद्यापीठ प्रशासन प्राधान्य देत आहे.

याच अनुषंगाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे प्रत्यक्ष वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. सध्या काही महाविद्यालयांच्या वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, येत्या पंधरा दिवसांत ही वसतिगृहे नूतनीकरण करून सर्व सोयींनी युक्त स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित वसतिगृहांच्या देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे तात्काळ हाती घेण्यात येतील.

प्रत्येक वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक तयारीसाठी स्पर्धा मंच’ सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून, विद्यापीठ परिसरातील सर्व रस्त्यांवरील पथदिवे कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे कृषि प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनाही वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी यापूर्वीपासूनच आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून, ती अधिक प्रभावी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये मुलींची संख्या वाढल्यामुळे मुलांच्या वसतिगृहांतील विद्यार्थीसंख्या काही प्रमाणात कमी झाली होती. तसेच मागील काही वर्षांमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थी वसतिगृहात राहण्यास इच्छुक नसल्यामुळे काही वसतिगृहांच्या इमारती वापरात नव्हत्या. परिणामी, ठराविक कालावधीनंतरच साफसफाई होत असल्याने या इमारतींची दुरवस्था जाणवत होती. मात्र, या इमारतींची प्रभावी देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण करण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाने हाती घेतले आहे.

वसतिगृहांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौरऊर्जेच्या माध्यमातून गरम पाणी तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करून विद्यार्थीहितासाठी सातत्याने कार्य करण्यास विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध आहे.