वनामकृविद्वारा हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत उजळंबा येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील अखिल
भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प तर्फे राबविण्यात येत असलेल्या
हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमाच्या (NICRA) अंतर्गत मौजे उजळंबा (ता.
जि. परभणी) येथे दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी शेतकरी संवाद मेळावा कार्यक्रम संपन्न
झाला. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे
होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएआर–क्रिडा, हैदराबादचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही.
एन. एस. प्रसाद उपस्थित होते. व्यासपीठावर बाभुळगावचे सरपंच श्री शिवाजी
दळवे, सोन्नाचे सरपंच श्री आवडाजी गमे, उजळंबाचे सरपंच श्री प्रभाकर मोगले, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मदन
पेंडके,
डॉ.
गणेश गायकवाड, डॉ. पापिता गौरखेडे, डॉ. अनंत लाड, प्रगतशील शेतकरी श्री.
ज्ञानेश्वर पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले
की हवामान बदलाचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवत असून अतिवृष्टी, अल्पवृष्टी, अनिश्चित पर्जन्यमान आणि तीव्र हवामान घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेती
क्षेत्रात या बाबी ‘न्यू नॉर्मल’ ठरत असून मराठवाड्यासारख्या कोरडवाहू प्रदेशात पीक
व पीकपद्धती, संपूर्ण शेती व्यवस्था, पशुधन
तसेच संबंधित व्यवस्थापन नव्या परिस्थितीनुसार नियोजित करणे अत्यावश्यक आहे. ते पुढे
म्हणाले की कोरडवाहू शेती ही एक व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना असून दुग्धव्यवसाय,
फळपिके, यांत्रिकीकरण, उपलब्ध
सिंचन पाण्याचा अचूक व कार्यक्षम वापर, मृद व जलसंधारण तसेच हवामानशास्त्रातील
आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यास शाश्वत उत्पादन शक्य होईल.
माननीय कुलगुरूंनी सांगितले की नवीन सर्वसमावेशक योजना ‘जी राम जी’ अंतर्गत
मृद व जलसंधारण, पाणी साठवण, पायाभूत सुविधा, बाजारपेठेशी
निगडित व्यवस्था, रस्ते सुविधा तसेच हवामान बदलानुरूप राष्ट्रीय
कृषि उपक्रम (NICRA) अंतर्गत विकसित तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात
आला आहे.
तसेच शेतीमध्ये
महिलांचे योगदान लक्षणीय असून प्रत्येक परिवारात स्त्री ही शेतीच्या केंद्रस्थानी असून
महिलांमुळेच घरातील एकोपा टिकून राहतो. मूल्यवर्धन व काढणीपश्चात प्रक्रिया (Post-harvest processing) यामध्ये महिलांची कार्यक्षमता व विचारशक्ती प्रभावीपणे वापरता येईल,
असेही त्यांनी अधोरेखित केले. याबरोबरच शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा पालक
व प्रचारक आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शेतकरी-केंद्रित संशोधन व विस्तार
उपक्रम विद्यापीठ ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून राबवत आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलाचे परिणाम
अधिक तीव्र स्वरूपात दिसून येऊ शकतात. त्यामुळे कोरडवाहू शेती करताना शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे
तंत्रज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात
थेट शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालक डॉ. विनोद कुमार सिंह यांनी सांगितले की, हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम
(NICRA) गावांतील
शेतकरी हे यशस्वी तंत्रज्ञानाचे ब्रँड अॅम्बेसेडर असून त्यांनी त्याचा प्रसार करावा.
सौरऊर्जा, बेड पद्धतीने उच्च घनता कापूस
लागवड व संपूर्ण यांत्रिकीकरणावर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले. कोरडवाहू शेतीत पशुधनाचे
महत्त्व लक्षात घेऊन पशु आरोग्य, निवारा
व पोषणाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अवजारे बँक, बियाणे बँक व बैलचालित अवजारांचा प्रसार करण्यावर
भर दिला. महिलांनी जैविक निविष्ठा व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून अर्थार्जन करावे
असेही त्यांनी आवाहन केले.
प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस.
प्रसाद यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांनी सांगितले की
कोरडवाहू शेतीतील उपयुक्त तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी स्वतः वापरावेच, परंतु
त्याचा इतर शेतकऱ्यांपर्यंतही प्रसार करावा.
यावेळी निक्रा (NICRA) गावांतील
श्री. आवडाजी गमे, श्री. प्रभाकर मोगले आणि श्री. ज्ञानेश्वर
माऊली पारधे या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. आंतरपीक पद्धत, सुधारित वाण
— जसे तूर पिकाचा बी.डी.एन. ७१६ तसेच सोयाबीन पिकाचे एम.ए.यु.एस. ६१२ व ७२५ — हे
वाण अधिक उत्पादन देणारे ठरल्याचे त्यांनी सांगितले. बीबीएफ (रुंद वरंबा–सरी)
पद्धत आणि बेड पद्धतीमुळे कमी व जास्त पावसाच्या परिस्थितीतही उत्पादनात वाढ होत
असल्याचे तसेच पशुधनासाठी सुरक्षित निवारा व पौष्टिक चाऱ्याचे महत्त्व असल्याचे
शेतकऱ्यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी श्री. ज्ञानोबा पारधे यांच्या बीबीएफ वरील
हरभरा पिकास तसेच विहीर पुनर्भरण संचास आणि श्री. गजानंद साखरे यांच्या बेडवरील
तूर पिकास मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य
शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले
तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमास शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पातील श्री. सादिक शेख, श्री. एस. पी. काळे,
श्री. व्ही. जे. रिठे, श्री. संतोष धनवे,
श्री. सुरेश खटिंग व श्री. मंगेश राऊत यांनी परिश्रम घेतले.





.jpeg)

.jpeg)
.jpeg)

