माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त जिल्हा चर्चासत्राचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालयाअंतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती
केंद्र तसेच कृषि विभाग (जिल्हा परभणी व
हिंगोली) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी एकदिवसीय जिल्हा
मासिक चर्चासत्र व विविध संशोधन केंद्रांना प्रक्षेत्र भेटींचे आयोजन विद्यापीठ
परिसरात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली
आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली
करण्यात आले.
हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व
कृषि विभागामार्फत नियमितपणे दर महिन्याला परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतील
प्रत्येकी एका तालुक्यात आयोजित करण्यात येतो. यापैकी दरवर्षी एका महिन्यात दोन्ही
जिल्ह्यांचे संयुक्त जिल्हा मासिक चर्चासत्र विद्यापीठ स्तरावर आयोजित करण्याची
संकल्पना राबविण्यात येते. या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे कृषि विभागातील
अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांना प्रत्यक्ष भेटी
घडवून,
विद्यापीठात सुरू असलेल्या विविध संशोधन उपक्रमांची सविस्तर माहिती
देणे तसेच या संशोधनातून प्राप्त निष्कर्षांचा उपयोग पुढे विस्तार कार्यामध्ये
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रभावीपणे करता यावा हा आहे.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.
राकेश अहिरे, संचालक शिक्षण डॉ. भगवान असेवार, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष
वेणीकर, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
श्री. राजेंद्र कदम, परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी श्री. दौलत चव्हाण, विद्यापीठाचे मुख्य विस्तार
शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विस्तार कृषि
विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, कृषि विज्ञान केंद्राचे मुख्य
शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.
दिगंबर पटाईत, हिंगोलीचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री.प्रदीप
कच्छवे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री.अभिषेक घोडके यांची
प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांतर्फे विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांना
प्रक्षेत्र भेटी देण्यात आल्या. कोरडवाहू शेती संशोधन योजना येथे डॉ.आनंद गोरे,
डॉ. मदन पेंडके व डॉ. पपीता गौरखेडे यांनी कोरडवाहू शेतीतील संशोधन
व तंत्रज्ञानाची माहिती दिली. एकात्मिक शेती पद्धती योजना येथे डॉ. किरण जाधव,
डॉ. सुदाम शिराळे व डॉ. शरद चेनलवाड यांनी एकात्मिक शेती पद्धतीचे
महत्त्व स्पष्ट तसेच त्यांनी केलेल्या विविध शिफारसी बद्दल माहिती दिली. पाणी
व्यवस्थापन योजना येथे डॉ. हरीश आवारी यांनी पाण्याच्या कार्यक्षम वापराविषयी तसेच
विद्यापीठाद्वारे विकसित गोदावरी तुरीच्या विविध अंतरावरील लागवड प्रयोगाबद्दल
माहिती दिली. रेशीम संशोधन योजना येथे डॉ. धनंजय मोहोड यांनी रेशीम उत्पादनावरील
संशोधन तसेच रेशीम शेतीतील मुख्य समस्या ऊझीमाशीच्या जैविक नियंत्रण याविषयी चालू
असलेल्या संशोधनाबद्दल माहिती दिली. गहू व मका संशोधन योजना येथे डॉ. सुनील उमाटे
यांनी गहू पिकांवरील विद्यापीठात चालू असलेले विविध संशोधन निष्कर्ष मांडले. करडई
संशोधन योजना येथे डॉ.राजेश धुतमल व डॉ.संतोष शिंदे यांनी करडई पिकावरील विविध देश
व विदेशी वाणांच्या संकरातून विद्यापीठात विकसित करीत असलेल्या वाणांच्या
संशोधनाची माहिती दिली. तसेच बायोमिक्स निर्मिती केंद्रामार्फत डॉ. चंद्रशेखर
अंबाडकर यांनी जैविक घटकांच्या निर्मिती व उपयोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
दुपारी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात आयोजित
चर्चासत्रात शेतीतील सद्यस्थिती, पिक व्यवस्थापन,
भाजीपाला उत्पादन तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सखोल
व फलदायी चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभव
मांडले व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
या कार्यक्रमासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कृषि
विभागातील प्रकल्प संचालक (आत्मा), उपविभागीय
कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ
कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, सहाय्यक
कृषि अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक
तंत्रज्ञान व्यवस्थापक अशा एकूण २५० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी
व शेतकरी बांधव यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार कृषि
विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ
डॉ. दिगंबर पटाईत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मधुकर मांडगे,
कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दिपाली सवंडकर तसेच कृषि तंत्रज्ञान
माहिती केंद्र व विस्तार शिक्षण संचालनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम
घेतले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेतकरी बांधवांचा, विशेषतः भाजीपाला उत्पादक गटाच्या सदस्यांचा मोलाचा सहभाग व सहकार्य
लाभले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी, माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरला.

.jpeg)








