लोहगाव (ता. जि. परभणी) येथील वारकरी संप्रदायातील थोर संत हरिबाबा महाराज
ठाकुरबुवा लोहगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित शेतकरी
बांधवांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी मार्गदर्शन करताना वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विज्ञानाला
अध्यात्माची जोड मिळाल्यास जीवन समृद्ध व आनंदी होते असे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, विज्ञान माणसाला भौतिक प्रगतीकडे घेऊन जाते, तर
अध्यात्म माणसाला अंतर्मुख करते. या दोन्हींचा समतोल साधला गेला तरच जीवनात खरा
आनंद, समाधान व सामाजिक समरसता निर्माण होते. शेतीसारख्या
क्षेत्रात विज्ञानाची जोड आवश्यकच आहे; परंतु त्यासोबत
मूल्याधिष्ठित जीवनशैली व नैतिकता जपणे तितकेच महत्त्वाचे आहे.
या कार्यक्रमात संचालक शिक्षण डॉ. भगवान असेवार, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. नीरज मोरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड यांची
प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, शेतकरी
महिला, ग्रामस्थ व भाविक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत हरिबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संतांच्या विचारांचा स्मरण करून देताना मान्यवरांनी
साधेपणा, कष्ट, निसर्गाशी नाते आणि समाजहित या मूल्यांचे
महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित
मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

.jpeg)
