‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेवर माननीय केंद्रीय कृषि मंत्री नामदार श्री. शिवराज सिंह चौहान आणि माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री. चौधरी चरण सिंह यांच्या
जयंतीनिमित्त देशभरात दिनांक २३ डिसेंबर २०२५ हा दिवस ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ (National Farmers’
Day) म्हणून साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान भारतरत्न श्री. चौधरी
चरण सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक लोकहितकारी धोरणे राबवून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी
मोलाचे योगदान दिले. या दिवशी देशाच्या अन्नसुरक्षेसह ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात
शेतकऱ्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यात येतो तसेच त्यांच्या अथक
परिश्रमांचे गौरवपूर्ण कौतुक केले जाते.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान
परिषदेच्या भारतीय कृषि अनुसंधान संस्थेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
देशभरातील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सर्व संस्था, कृषि
विद्यापीठे तसेच कृषि विज्ञान केंद्रांमध्ये करण्यात आले.
या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने परभणी मुख्यालयासह विद्यापीठाच्या
कार्यक्षेत्रातील संपूर्ण मराठवाड्यातील एकूण १२ कृषि विज्ञान केंद्रांमध्ये मुख्य
कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासह ‘राष्ट्रीय
शेतकरी दिवस’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात माननीय केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री
नामदार श्री. शिवराज सिंह चौहान यांनी ऑनलाईन पद्धतीने देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करणाताना भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री. चौधरी चरण सिंह यांच्या कार्याची प्रशंसा
करून त्यांना अभिवादन केले. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांची सेवा हीच
खरी ईश्वरसेवा आहे. या सेवेत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, कृषि
विद्यापीठे व कृषि विज्ञान केंद्रे सक्रियपणे सहभागी असून, शेतकरी
हे या संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत.
आज भारत अन्नधान्य उत्पादनात सक्षम असून अनेक कृषि उत्पादनांची
मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात आहे. राष्ट्रीय पातळीवर कडधान्ये व तेलवर्गीय पिकांच्या
उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून, या क्षेत्रातही
आपण नक्कीच सक्षम होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
किडी, रोग व हवामान बदलामुळे उत्पादनावर होणारे
परिणाम कमी करण्यासाठी संशोधन कार्य अधिक बळकट करून शाश्वत शेती उभारली जाईल. यासोबतच
एकात्मिक शेती पद्धती, आंतरपीक पद्धती तसेच नैसर्गिक शेती पद्धतींना
प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी
महत्त्वपूर्ण असलेल्या ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेअंतर्गत १२५ दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात
येणार आहे. विशेषतः पेरणी व काढणीच्या काळात शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासते,
त्या अनुषंगाने या योजनेत ६० दिवस राखीव ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी
दिली.
या योजनेची जनमानसात अधिक प्रभावी ओळख निर्माण व्हावी, यासाठी
माननीय मंत्र्यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या विविध संस्था, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे तसेच ग्रामपंचायत
कार्यालयांना आवाहन केले की, मनरेगामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे
‘विकसित भारत जी-राम जी’ योजना कशी लाभदायक आहे, याची माहिती
प्रभावी प्रचार व प्रसार यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी.
यावेळी ऑनलाइन मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी सांगितले की, २०४७ मध्ये विकसित भारत घडवताना शेतकऱ्यांचे
कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे कल्याण झाले तरच शेतीचे कल्याण होऊ शकते.
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणा तसेच
कृषि संलग्न विभागांबरोबर एकजुटीने कार्य करत आहे. विद्यापीठ “शेतकरी देवो भव:”
या ध्येयवाक्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत आहे.
माजी पंतप्रधान भारतरत्न श्री. चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त
आयोजित राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नमूद केले की, त्यांच्या
स्मृतीला उजाळा देण्यासाठी विद्यापीठात दररोज ‘किसान दिन’ साजरा केला जातो. हवामान-अनुकूल
तंत्रज्ञानाबाबत विद्यापीठाने काळानुरूप व शास्त्रीय दृष्टिकोनातून शेतकरीहिताचे अत्यंत
उपयुक्त संशोधन केले असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितपणे
होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, भारत
सरकारने मनरेगा योजनेत सकारात्मक बदल करून “विकसित भारत – जी राम जी योजना” पुढे आणली
आहे. या योजनेद्वारे शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठे परिवर्तन घडवून आणले
जाणार आहे. या योजनेत प्रामुख्याने सिंचन सुरक्षा व व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकास, ग्रामीण रस्ते विकास तसेच ग्रामीण
भागातील जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकरी
उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण, कृषि प्रक्रिया उद्योगांची उभारणी,
हवामान-अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब आणि विशेषतः मृदा व्यवस्थापन यांना
महत्त्व देण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार
आहे. जी रामजी योजनेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी या योजनेतून मिळणारे फायदे तसेच
अंमलबजावणीत दिरंगाई झाल्यास करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली. भारतरत्न माजी
पंतप्रधान श्री. चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त या महत्त्वपूर्ण योजनेची सुरुवात
होत असल्यामुळे त्यांनी त्यांना अभिवादन केले आणि ही योजना पुढे आल्याबद्दल आनंद व्यक्त
केला.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी कार्यक्रमाचे
सविस्तर व अभ्यासपूर्ण प्रास्ताविक करत कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.
सुरवातीला मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख
यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न श्री चौधरी चरण सिंह यांच्या संक्षिप्त जीवनपरिचयाची
माहिती दिली.
तांत्रिक मार्गदर्शन करताना मुख्य कृषि विद्यावेत्ता डॉ. किरण
जाधव यांनी एकात्मिक शेती पद्धतीद्वारे शाश्वत प्रगती या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रिय व नैसर्गिक
शेती प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक
शेती या विषयावर मार्गदर्शन करताना रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करून जमिनीची सुपीकता, पर्यावरण
संतुलन व मानवी आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर कसा उपयुक्त ठरतो,
याबाबत मार्गदर्शन केले.
.jpeg)

.jpeg)




.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
