हळद पिकात यांत्रिकीकरण, प्रक्रिया व निर्यातीवर भर देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग व एकात्मिक फलोत्पादन
विकास अभियान (MIDH) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हळद काढणीपूर्व व काढणीपश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन’ प्रशिक्षण कार्यक्रम
दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते तर प्रमुख पाहुणे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी
अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे,
विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, विस्तार कृषी विद्यावेता डॉ. गजानन
गडदे व हिंगोलीचे जिल्हा कृषी अधीक्षक श्री. राजेंद्र कदम हे उपस्थित होते. यावेळी
सरपंच श्रीमती कमलबाई गंगाबुवा गिरी, उपसरपंच श्रीमती आशा अनंतराव
चव्हाण, पोलीस पाटील श्री. सचिन गुलाबराव चव्हाण, श्री. सुनील भिसे (ता.कृ.अ. वसमत), श्री. अजय सुगावे
(विषयतज्ञ कीटकशास्त्र, केविके, तोंडापूर),
श्री. गजानन वरुडकर (सुपरवायझर वसमत), श्री.
एकनाथ चव्हाण, सदस्य ग्रामपंचायत व श्री. सुरेश निवृतीराव
चव्हाण प्रगतशील शेतकरी हे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांच्या
सक्रिय सहभागाचे विशेष कौतुक करत हळद पिकाचे आर्थिक, औद्योगिक व निर्यातक्षम
महत्त्व सविस्तरपणे विशद केले. हळद पिकामध्ये यांत्रिकीकरणाचा अवलंब, शेतकरी उत्पादक कंपनीची (FPO) निर्मिती, काढणीपश्चात व्यवस्थापन व मूल्यवर्धनासाठी हळद उत्पादक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण
तसेच गावागावांमध्ये प्रक्रिया उद्योगांची स्थापना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी
नमूद केले. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल व ग्रामीण भागात
रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच
भारत देश कृषीसाठी प्रसिद्ध होता, आहे आणि पुढेही कृषीसाठीच प्रसिद्ध
राहील, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, नवीन
पीक पद्धती व बाजाराभिमुख शेतीचा अवलंब करून उत्पादनक्षमता आणि उत्पन्न वाढवावे,
असे आवाहन केले. कृषी ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा
कणा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रास्ताविकामध्ये डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी हळद पिकाचे महत्व व
मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून
शेतकरी बांधवांनी विद्यापीठांतर्गत विविध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे सांगितले.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेश क्षीरसागर यांनी हळद पीक काढणी
पश्चात व्यवस्थापन व मूल्यवर्धन यावर मार्गदर्शन करत बचत गटामार्फत विविध घरगुती
सूक्ष्म व लघु उद्योगातून आर्थिक सक्षम बनवण्याकरिता शेतकरी गट व महिला बचत गट
स्थापन करून हळद प्रक्रिया उद्योगास चालना देण्याबाबत आवाहन केले. तसेच डॉ. दिगंबर
पटाईत यांनी हळद पिक किड व्यवस्थापन, तर डॉ. आनंद दौंडे
यांनी हळद पीक रोग व्यवस्थापन विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. एस. बी. पव्हणे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. एस. जे. खंडागळे व
उद्यानविद्या महाविद्यालयातील अंतिम सत्रातील विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन वैष्णवी शितळे व नम्रता गिरी या विद्यार्थिनींनी केले तर आभार सहाय्यक अन्वेषक डॉ. अंशुल लोहकरे यांनी मानले. या
प्रशिक्षणासाठी मौजे तुळजापूर वाडी येथे २०० हून अधिक शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त
सहभाग नोंदविला.


.jpeg)
.jpeg)