Tuesday, December 16, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात बदलत्या हवामान परिस्थितीवर राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन

 परिसंवादात बदलत्या हवामानात शाश्वत पिकांचे संरक्षण व शेती विकासावर भर


बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण व शाश्वत वनस्पती आरोग्य या विषयावर “Integrating Crop Care for Sustainable Plant Health under Changing Climatic Scenario” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद (पश्चिम विभाग) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आला. हा परिसंवाद विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील इंडियन फाइटोपॅथॉलॉजिकल सोसायटी (IPS) तसेच अकोला येथील कृषि वनस्पती रोगशास्त्रज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या राष्ट्रीय परिसंवादाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन पद्धतीने भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (ASRB) चे माननीय माजी अध्यक्ष तसेच माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी हे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, भाकृअप–भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा शर्मा, नवी दिल्ली येथील इंडियन फाइटोपॅथॉलॉजिकल सोसायटी (IPS) चे अध्यक्ष डॉ. दिनेश सिंग (ऑनलाईन), सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अकोला येथील कृषी वनस्पती रोगशास्त्रज्ञ संघाचे अध्यक्ष श्री. बी. टी. राऊत, परिसंवादाचे संयोजक डॉ. विक्रम घोळवे व सहसंयोजक डॉ. गजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाच्या कार्य व प्रगतीचा आढावा घेतला. मराठवाड्यासाठी उपयुक्त जैवतंत्रज्ञानावर आधारित वाण, गोदावरी तुरीचा वाण, विविध पिकांचे सुधारित वाण तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान विकसित करण्यात विद्यापीठाने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘बायोमिक्स’सारखी उत्पादने शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असून भविष्यात जैविक कीटकनाशके, रोगनाशके व खते निर्मितीवर भर दिला जाईल. रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

माननीय माजी अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी यांनी कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना संत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता तसेच नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांचे अर्थशास्त्र विषयावरील पुस्तक भेट म्हणून प्रदान केले. तसेच त्यांनी स्वतः लिखित कॉटन इम्प्रुव्हमेंट हे पुस्तक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांना भेट दिले.

या प्रसंगी त्यांनी विद्यापीठातील सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत शास्त्रज्ञांना समाजात मोठा सन्मान लाभतो, असे नमूद केले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात पायाभूत सुविधांचा भक्कम विकास व बाह्य निधीची मोठी प्राप्ती झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

संशोधन क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून कृषिशास्त्रात सखोल व प्रभावी कार्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अन्नधान्य निर्यातीमुळे हरितक्रांतीचे यश स्पष्ट होते, तसेच रोगप्रतिकारक वाण विकासात वनस्पती रोगशास्त्राचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शास्त्रज्ञांचे ज्ञान देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक असून हा परिसंवाद विद्यार्थ्यांसाठी व संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात हवामान बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने उभी राहिली असून, या पार्श्वभूमीवर परिसंवादातून मिळणारे ज्ञान शेती विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगितले. हवामान अनुकूल तंत्रज्ञान विकास तील विद्यापीठाच्या योगदान तसेच शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्याची दखल घेऊन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने विद्यापीठास ‘अ’ दर्जाची अधिस्वीकृती दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, सुधारित पीक वाण व तंत्रज्ञान विकास, तसेच बायोमिक्स उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ घडवून आणली आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि ‘महाॲग्री’ ॲपचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती तसेच शेतातील पिकांचे अवशेष शेतातच कुजविणे गरजेचे असून, यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात वाढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक असून, प्रत्येकाने आपल्या विभागाच्या चौकटीपलीकडे विचार करून शेतकरी-केंद्रित पीक पद्धती विकसित कराव्यात. या दृष्टीने हा परिसंवाद निश्चितच लाभदायक ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आयपीएसचे अध्यक्ष डॉ. दिनेश सिंग यांनी संस्थेतील सभासद संख्या आणि उपक्रमांचा आढावा सादर केला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा शर्मा यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे परिसंवाद यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले. माननीय माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी यांनी शास्त्रज्ञांमध्ये नवचेतना व परस्पर विश्वास निर्माण करण्यातील योगदानाची दखल घेतली, तसेच शेतकरी हितासाठी संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे यांनी विभागाच्या वारशाची महत्त्वाची माहिती दिली आणि परिसंवादाद्वारे विद्यार्थ्यांना व शास्त्रज्ञांना अद्ययावत ज्ञान मिळेल, जे संशोधन व उत्पादन विकासासाठी उपयोगी ठरेल असे सांगितले. परिसंवादाचे संयोजक सचिव डॉ. विक्रम घोळवे यांनी आयोजनाची भूमिका व विभागाच्या मागील वर्षातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली.

परिसंवादात इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटीच्या वतीने फेलो अवॉर्ड दिला गेला. यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील डॉ. विक्रम घोळवे, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. सुनीता मगर, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील डॉ. ए. एम. सरपे, डॉ. वाय. बी. इंगळे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. व्ही. एस. शिंदे यांची निवड झाली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी प्राध्यापक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. डी. निर्मळ, श्री रमेश देशमुख, डॉ. टी. बी. गरुड, डॉ. के. टी.आपेट, डॉ. ए. पी. सूर्यवंशी, डॉ. आर. व्ही. देशमुख, श्री अंकुश मोरे, श्री एस. के. देशमुख, डॉ. पी. ए. ठोंबरे, डॉ. के. एस. कुलथे, श्री एल. आर. खरवडे, डॉ. बी. पी.दंडनाईक, श्री टी. आर. मोगले, श्री एस. एस. घुगे, श्री व्ही. जी. मुळेकर, डॉ. बी. आर. कावळे, श्री अंकुश दहिवाल, डॉ. आर.बी. सोळंके, डॉ. ओ. डी. कोहिरे, डॉ. के. जी. राऊत, डॉ.व्ही व्ही दातार, डॉ. एम. एच. शेख व डॉ. के. एम. चव्हाणआदिंचा समावेश होता.

परिसंवादात विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशभरातून १३० शास्त्रज्ञ व १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, पुढील दोन दिवसांत या शास्त्रज्ञांमार्फत आपले संशोधन कार्य सादर करण्यात येणार आहे.

परिसंवादाचे आयोजन विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने केले, संयोजक सचिव डॉ. विक्रम घोळवे व सह-संयोजक सचिव डॉ. गजेंद्र जगताप यांनी कार्य पाहिले.