छत्रपती
संभाजीनगर येथील एमजीएममध्ये दिनांक २५ ते २९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित एआययू
सेंट्रल झोन युथ फेस्टिव्हल (UNIFEST) २०२५ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने
उत्कृष्ट कलाकौशल्य, प्रभावी सादरीकरण आणि भक्कम स्पर्धात्मक
क्षमतेचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले. मध्यप्रदेश, छत्तीसगड, मराठवाडा आणि विदर्भ येथील एकूण २३
विद्यापीठांमधील ११०० विद्यार्थ्यांमध्ये चमकदार कामगिरी करत विद्यापीठाने नऊ
पारितोषिके पटकावून ऐतिहासिक यश नोंदविले.
या निमित्त विद्यापीठात
विद्यार्थी कल्याण कार्यालयाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव समारंभ दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी
अधिष्ठाता
डॉ. राहुल रामटेके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ.
संघर्ष शृंगारे आणि फाइन आर्ट्स प्रभारी श्री. अमोल सोनकांबळे, डॉ विशाल इंगळे आदींची
उपस्थिती होती.
या उल्लेखनीय
यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व विजेत्या
विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. एआययूच्या स्पर्धेत विद्यापीठाने
केलेल्या या चमकदार कामगिरीचे त्यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रीय युवक
महोत्सवासाठी पात्र ठरलेल्या वैष्णवी शिंदेचा त्यांनी विशेष सत्कार करून आगामी
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यामध्ये
सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लक्षणीय कामगिरी केली. सिद्धी
रासवे हिने कार्टूनिंगमध्ये चौथा क्रमांक,
तर प्रांजल भंडे आणि अपूर्वा लांडगे यांनी लोकनृत्य स्पर्धेत चौथा
क्रमांक मिळवला. वैष्णवी शिंदे हिने कोलाज स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत
राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्रता मिळवली. पोस्टर मेकिंग स्पर्धेत वैष्णवी
शिंदे आणि रांगोळी स्पर्धेत वैष्णवी दूरतकर यांनी चौथा क्रमांक मिळवला.
“मराठवाडा, भूमी संतोकी भूमी कलावंतोकी भूमी कृषकोंकी” या अभिनव संकल्पनेवर आधारित
विद्यापीठाच्या सांस्कृतिक शोभायात्रेस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच सुगम
गायनमध्ये अनुजा पारशेट्टीला चौथा क्रमांक, समूह गायन
स्पर्धेत पाचवा क्रमांक, तर इंग्रजी वादविवाद स्पर्धेत
आराध्या सिंग आणि रईस सिद्दीकी यांनी पाचवा क्रमांक पटकावला.
विद्यापीठाच्या या यशस्वी कामगिरीने विद्यापीठाचा कला, संस्कृती आणि स्पर्धात्मक क्षेत्रातील लौकिक अधिक उज्ज्वल केल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.





.jpeg)
